Sunday, December 07 2025 | 11:20:20 AM
Breaking News

राष्ट्रपतींच्या हस्ते स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 च्या विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण

Connect us on:

नवी दिल्ली, 17 जुलै 2025. निकालांची घोषणा झाली! केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार (एमओएचयुए) मंत्रालयाने नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात आयोजित केलेल्या कार्यक्रमात, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 च्या विजेत्यांना पारितोषिके प्रदान केली. केंद्रीय मंत्री मनोहर लाल आणि गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार राज्यमंत्री तोखन साहू यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात सुपर स्वच्छ लीग मधील 23 शहरांचा गौरव करण्यात आला. अहमदाबाद, भोपाळ आणि लखनौ ही शहरे स्वच्छ शहरांच्या यादीत वरच्या स्थानी असून त्यामुळे भारतात स्वच्छ शहरांच्या नव्या पिढीचे आगमन झालेले दिसले. या कार्यक्रमात 43 राष्ट्रीय पुरस्कारांसह महाकुंभाला विशेष मान देण्यात आला.

प्रतिष्ठीत अशा स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 पारितोषिक वितरण सोहोळ्यात केंद्रीय मंत्री मनोहर लाल यांनी गंगेच्या किनाऱ्यावरील सर्वोत्तम शहराचा पुरस्कार प्रयागराज शहराला दिला तर सिकंदराबाद छावणीने केलेल्या अनुकरणीय स्वच्छता उपक्रमांसाठी या शहराला सर्वोत्तम छावणी मंडळाचा पुरस्कार देण्यात आला. जीव्हीएमसी विशाखापट्टणम, जबलपूर आणि गोरखपूर या शहरांनी सफाई कामगारांची सुरक्षितता आणि सन्मान यांच्याप्रती दाखवलेल्या अभूतपूर्व कटिबद्धतेसाठी ही शहरे सर्वोत्कृष्ट सफाईमित्र सुरक्षित शहरे म्हणून घोषित करण्यात आली. एकूण 66 कोटी लोकांच्या अंदाजित सहभागासह जगातील सर्वात मोठा मेळावा ठरलेल्या महाकुंभ मेळ्याच्या आयोजनादरम्यान अत्युत्कृष्ट रीतीने शहरी कचरा व्यवस्थापन केल्याबद्दल उत्तर प्रदेश राज्य सरकार, प्रयागराज मेळ्यात कार्यरत अधिकारी तसेच प्रयागराज महानगरपालिकेला विशेष सन्मान देऊन गौरवण्यात आले.

10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्येच्या श्रेणीत महाराष्ट्रातील नवी मुंबई शहर सुपर स्वच्छ लीग पुरस्काराचे मानकरी ठरले. तर 50,000 ते 3 लाख लोकसंख्येच्या श्रेणीत लोणावळ्याला पुरस्कार मिळाला. 20,000  ते 50,000 लोकसंख्येच्या श्रेणीत महाराष्ट्रातील विटा, सासवड, देवळाली प्रवरा या तीन शहरांचा सुपर स्वच्छ लीग या प्रतिष्ठेच्या यादीत समावेश करण्यात आला. 20,000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या श्रेणीत पांचगणी आणि पन्हाळ्याने स्थान पटकावले. महाराष्ट्रातील मीरा-भाईन्दर  3 ते 10 लाख लोकसंख्या श्रेणीतील स्वच्छ शहर ठरले. तर 50,000 ते 3 लाख लोकसंख्येच्या श्रेणीत कराडचा आणि 20,000 ते 50,000 लोकसंख्येच्या श्रेणीत गोव्यातील पणजीचा समावेश आहे. विशेष श्रेणीत मंत्रीस्तरीय पुरस्कारांतर्गत गोव्यातील साखळी (सांकलिम) आणि महाराष्ट्रातील पिंपरी चिंचवडने आश्वासक स्वच्छ शहर पुरस्कार पटकावला.

या वर्षीच्या स्वच्छ सर्वेक्षणाने मोठ्या शहरांचे आराखडे आकर्षक आणि सुव्यवस्थित केलेच पण त्याचसोबत या सर्वेक्षणाने अशा आराखड्यांना लहान शहरांसाठी सुलभीकृत करून त्यांना स्पर्धेत उतरण्यासाठी आणि स्वच्छतेच्या पायऱ्या चढत जाण्यासाठी प्रोत्साहित देखील केले. या  सर्वेक्षणात छोट्या शहरांना मोठ्या शहरांसह समान पातळीवर स्पर्धेत उतरता आले. एक शहर, एक पारितोषिक तत्वाला अनुसरत प्रत्येक राज्यातील उत्तम कामगिरी करणाऱ्या शहरांचा आश्वासक स्वच्छ शहरे म्हणून सन्मान करण्यात आला. विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील एकूण 34 शहरांनी शहरी स्वच्छता आणि सफाईविषयक उत्कृष्टतेमध्ये उल्लेखनीय प्रगती दर्शवत हा मान मिळवला.

कार्यक्रमाला संबोधित करताना राष्ट्रपतींनी कचरा व्यवस्थापनाचे तीन आर-(3R), म्हणजेच रिड्यूस (कमी करणे), रीयूज (पुनर्वापर) आणि रीसायकल (पुनर्प्रक्रिया) या दृष्टीकोनाला प्रोत्साहन दिल्याबद्दल मंत्रालयाची प्रशंस केली, आणि त्यांना सादर केलेल्या वेस्ट टू वेल्थ स्मृतिचिन्हाची देखील प्रशंस केली.  वेस्ट ईज बेस्ट म्हणजेच कचरा सर्वोत्तम आहे हा मंत्र असून, तो चक्राकार अर्थव्यवस्थेला बळ देतो, असे त्या म्हणाल्या. तरुणांना सक्षम बनवणे, हरित रोजगार निर्माण करणे आणि स्वयंसहायता गटांना सहभागी करून  उद्योजकीय संधी निर्माण करणे, यामधील  त्याची भूमिका राष्ट्रपतींनी अधोरेखित केली. स्वच्छ शहर भागीदारी उपक्रमाचा शुभारंभ करताना केंद्रीय मंत्री मनोहर लाल यांनी पीअर लर्निंग (परस्परांकडून शिकणे) च्या महत्त्वावर भर दिला. ते म्हणाले की, सर्व लोकसंख्या श्रेणींमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारी सर्व 78 शहरे संबंधित राज्यांमधून प्रत्येकी एका सुमार  कामगिरी करणाऱ्या शहराला दत्तक घेतील आणि त्यांना मार्गदर्शन करतील. सर्वांना बरोबर घेऊन जायला हवे, असे ते म्हणाले. इच वन क्लीन वन, अर्थात प्रत्येक जण स्वच्छ, या मंत्राच्या अनुषंगाने ते म्हणाले, विजेती शहरे इतरांना मार्गदर्शन करतील, आणि आपल्या बरोबर पुढे घेऊन जातील. सुमार  कामगिरी करणाऱ्या शहरांना वर आणण्याची हीच वेळ आहे. अ‍ॅक्सिलरेटेड डंपसाईट रिमेडिएशन प्रोग्रामची घोषणा करताना केंद्रीय मंत्री म्हणाले, “15 ऑगस्ट 2025 पासून सुरू होणारा हा 1 वर्षाचा विशेष कार्यक्रम केवळ वर्षानुवर्षे साचून राहिलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावून शहरी भागातील मोठी जागा उपलब्ध करणार नाही, तर वैज्ञानिक पद्धतीने कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता देखील वाढवेल.”

उपस्थित प्रतिनिधींचे स्वागत करताना, गृहनिर्माण आणि नगर विकास मंत्रालयाचे सचिव श्रीनिवास काटिकीथला म्हणाले, “स्वच्छ भारत अभियानाने 10 वर्षे यशस्वीपणे पूर्ण केल्यावर    आता आपण केवळ पुढील दशकासाठीच नव्हे, तर 2047 पर्यंत विकसित भारताचे उद्दिष्ट गाठण्यासाठी पथदर्शक आराखडा निश्चित करायला हवा.”

या प्रसंगी स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 निकाल डॅशबोर्ड डिजिटल पद्धतीने अनावरण करण्यात आले, ज्यामध्ये क्रमवारी आणि कामगिरीचा परस्परसंवादी आढावा घेण्यात आला आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 ची ठळक वैशिष्ट्ये आणि सुपर स्वच्छ लीग सिटीजच्या  कामगिरीचे आकर्षक दृकश्राव्य सादरीकरणांद्वारे प्रदर्शन करण्यात आले, ज्यामध्ये देशव्यापी स्वच्छता चळवळीची भावना आणि व्याप्ती दिसून आली.

About Matribhumi Samachar

Check Also

पश्चिम नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ व्हाइस ऍडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी नौदल दिनाच्या वार्षिक पत्रकार परिषदेत माध्यमांशी साधला संवाद

मुंबई , 2 डिसेंबर 2025 व्हाइस ऍडमिरल कृष्णा स्वामीनाथन, एव्हीएसएम एनएम, फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ वेस्टर्न …