Saturday, December 06 2025 | 08:30:16 AM
Breaking News

आयएनएस तमाल या युद्धनौकेने इटलीतील नेपल्स बंदराला दिली भेट

Connect us on:

आयएनएस तमाल ही भारतीय नौदलाची रडारला चकवा देणाऱ्या स्टेल्थ तंत्रज्ञानाने युक्त असलेली अत्याधुनिक युद्धनौका भारतात परत येताना 13 ते 16 ऑगस्ट 2025 या कालावधीत इटलीतील नेपल्स येथे दाखल झाली. या भेटीद्वारे भारत आणि इटली यांच्यातील दृढ द्विपक्षीय संबंध अधोरेखित झाले, जे औपचारिकरीत्या2023 मध्ये रणनीतिक भागीदारी या स्तरावर उंचावले गेले.

नेपल्स बंदरात प्रवेश करण्यापूर्वी आयएनएस तमाल इटालियन नौदलात नव्याने दाखल झालेल्या हेलिकॉप्टर उतरवण्याचा डेक असलेली युद्धनौका (एलएचडी) आयटीएस ट्रीएस्ट सोबत संयुक्त युद्धसरावामध्ये  सहभागी झाली. या संयुक्त सरावामध्ये संचार सराव, समुद्रामध्ये जहाजाच्या हालचाली व उड्डाण परिचालन, सागरी सैनिकांना एकमेकांच्या नौकांवर पाठवणे यांचा समावेश होता आणि अखेरीस स्टीम पास्टने त्याचा समारोप झाला.

नेपल्स बंदरातील या भेटीदरम्यान या जहाजाने भारत आणि इटली यांच्यातील संरक्षण सहकार्य व सहयोग वृद्धिंगत करण्यावर केंद्रित अनेक उपक्रमात भाग घेतला. वरिष्ठ लष्करी अधिकारी आणि स्थानिक अधिकाऱ्यांसोबत द्विपक्षीय चर्चा तसेच व्यावसायिक देवाणघेवाण हे या भेटीचे प्रमुख मुद्दे ठरले. जहाजाच्या कमांडिंग ऑफिसरने इटालियन नौदलाच्या लॉजिस्टिक्स कमांडचे चीफ ऑफ स्टाफ व्हाइस ॲडमिरल पीअरपाओलो बद्री आणि नेपल्सच्या उपमहापौर लॉरा लिएटो यांची भेट घेतली. दोन्ही पक्षांनी भारत – इटली रणनीतीक कृती आराखडा 2025-2029 अंतर्गत विविध उपक्रमांवर चर्चा केली.

आयएनएस तमाल आणि रोममधील भारतीय दूतावासाने संयुक्तपणे जहाजावर एक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला. यामध्ये स्थानिक सरकारचे अधिकारी, इटालियन नौदलाचे अधिकारी, रोमस्थित राजनैतिक प्रतिनिधी, इटलीतील संयुक्त राष्ट्रांचे प्रतिनिधी तसेच इटली संरक्षण उद्योगातील नेते सहभागी झाले. इटली प्रजासत्ताकातील भारताच्या राजदूत वाणी राव यांनी देखील जहाजाच्या तुकडीशी आणि इटालियन नौदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी जहाजावर संवाद साधला.

15 ऑगस्ट 2025 रोजी भारताच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जहाजावर एक औपचारिक संचलन आयोजित करण्यात आले. जहाजाच्या तुकडीने रोममधील भारतीय दूतावासातील स्वातंत्र्य दिन साजरा करण्याच्या कार्यक्रमातही सहभाग घेतला.

आयएनएस तमालच्या या भेटीतून भारताने इटलीशी असलेल्या संबंधांना दिलेले महत्त्व स्पष्ट झाले तसेच दोन्ही राष्ट्रांतील वाढत्या संरक्षण सहकार्यास बळकटी देण्याचा प्रयत्न दिसून आला. या भेटीमुळे दोन्ही नौदलांना परस्पर विचार विनिमय करता आला आणि संयुक्त उपक्रमांसाठी संधी  साधता आल्या. 16 ऑगस्ट 2025 रोजी नेपल्सहून प्रस्थान केल्यानंतर हे जहाज भारतातील आपल्या मूळ तळावर परतताना युरोप व आशियातील इतर बंदरांना भेट देईल. या माध्यमातून सागरी मुत्सद्दीपणा वृद्धिंगत होईल आणि द्विपक्षीय संबंधांचा विस्तार होईल.

About Matribhumi Samachar

Check Also

रशियाच्या राष्ट्राध्यक्षांसोबत घेतलेल्या संयुक्त वार्ताहर परिषदेत पंतप्रधानांनी प्रसारमाध्यमांना दिलेले निवेदन

महामहीम, माझे मित्र राष्ट्रपती पुतीन दोन्ही देशांचे प्रतिनिधी, प्रसारमाध्यमांचे सहकारी नमस्कार! “दोबरी देन”! आज भारत …