Wednesday, December 10 2025 | 01:50:31 PM
Breaking News

केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते आज मुंबईत जिओ वर्ल्ड सेंटर येथे आशियाई बियाणे संमेलन 2025 चे उद्घाटन; 17 ते 21 नोव्हेंबर 2025 या कालावधीत आयोजित संमेलनात तांत्रिक विषयावर आधारित अनेक सत्रे आणि कार्यशाळांचा समावेश

Connect us on:

मुंबई, 17 नोव्हेंबर 2025. केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते आज मुंबईत जिओ वर्ल्ड सेंटर येथे आशियाई बियाणे संमेलन 2025 चे उद्घाटन झाले. दिनांक 17 ते 21 नोव्हेंबर 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनात तांत्रिक विषयावर आधारित अनेक सत्रांचे आयोजन करण्यात येईल. संमेलनाच्या पहिल्या दिवशी कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून 20 नोव्हेंबर रोजी वार्षिक साधारण बैठक होणार आहे. या संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात आशियाई बियाणे संमेलन 2025 चे बोधचिन्ह देखील जारी करण्यात आले असून “दर्जेदार बियाणांच्या माध्यमातून समृद्धीची रुजवात” ही या वर्षीच्या संमेलनाची संकल्पना आहे.

उपस्थितांना उद्देशून केलेल्या उद्घाटनपर भाषणात केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले, देशाची अन्नसुरक्षा सुनिश्चित करणे, जनतेला पोषक आहार उपलब्ध करून देणे तसेच शेतकऱ्यांसाठी शेती व्यवसाय फायदेशीर ठरेल याकडे लक्ष देणे ही सरकारची मुख्य उद्दिष्ट्ये आहेत. यासाठी प्रतिहेक्टर उत्पादकता वाढवण्याचे लक्ष्य निश्चित करून शेतकऱ्यांना चांगले बियाणे उपलब्ध करून देणे आणि उत्पादन खर्च कमी करणे यावर सरकारने लक्ष केंद्रित केले आहे असे ते म्हणाले.

शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळवून देऊन, गरज वाटेल तेव्हा त्यांना नुकसान भरपाई देणे तसेच शेती पद्धतीच्या वैविध्यीकरणाकडे लक्ष पुरवणे याला सरकारने अधिक प्राधान्य दिल्याची माहिती त्यांनी दिली.

कुपोषणाच्या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी पोषकद्रव्य असलेल्या पिकांच्या जाती तसेच हवामानातील बदलाप्रती लवचिक जाती विकसित करण्यासाठी आयसीएमआर तसेच विविध राज्यांतील संस्था प्रयत्नशील आहेत अशी माहिती चौहान यांनी यावेळी दिली.

उत्तम प्रतीच्या बियाणांचा विकास करण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांबरोबरच खासगी क्षेत्राचे योगदान देखील गरजेचे आहे असे आग्रही प्रतिपादन त्यांनी केले. ते म्हणाले की, भारतीय कृषी क्षेत्रासाठीचे खासगी क्षेत्राकडून येणारे बियाणे खर्चिक असतात आणि आपला बहुतांश शेतकरीवर्ग वंचित वर्गातील असल्यामुळे त्यांना हे बियाणे परवडत नाहीत. त्यामुळे खासगी क्षेत्राने बियाणांच्या किमती अधिक किफायतशीर कराव्या असे आवाहन त्यांनी केले.

केंद्रीय मंत्री म्हणाले की दरवर्षी बियाणे बदलण्याची गरज भासणार नाही असे बियाणे आपण शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले तर त्यामुळे आपल्या शेतकरी वर्गाची मोठी चिंता दूर होईल. तसेच उगवण क्षमता नसलेल्या अथवा अत्यंत कमी असलेल्या दर्जाहीन बियाणांच्या समस्येबाबत कंपन्यांनी लक्ष घालून दोषींवर कारवाई करावी अशा सूचना त्यांनी केल्या. डाळी तसेच तेलबिया यांचे उत्तम दर्जाचे बियाणे तयार करणे गरजेचे आहे आणि त्यासाठी खासगी क्षेत्राचे योगदान आवश्यक आहे असे ते म्हणाले.

येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकार बियाणे आणि कीटकनाशके यांच्यासंदर्भातील नवा कायदा आणणार असून त्यासाठी संबंधितांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल असे ते म्हणाले. भाज्या आणि फळे यांचे बियाणे अत्यंत महाग आहेत , त्यांच्या किंमती कमी करण्यासाठी काय करता येईल याबाबत देखील विचार सुरु आहे असे ते म्हणाले.

कृषी क्षेत्राशी संबंधित सर्वांनी केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने सुरु केलेल्या साथी पोर्टलवर लॉगिन करून या पोर्टलवर उपलब्ध सुविधांचा वापर करावा असे आवाहन केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी उपस्थितांना केले.हवामानातील बदलांप्रती लवचिक असणाऱ्या वाणांचा विकास करणे ही आजच्या काळाची गरज आहे असे ते म्हणाले. आपल्या देशात 15 कृषी-हवामान क्षेत्रे आहेत त्यामुळे आपल्याला दुष्काळाचा, उष्णतेचा आणि कीटकनाशकांचा सामना करू शकणाऱ्या वाणांचा विकास करण्याची गरज आहे असे त्यांनी सांगितले. जीनोम एडिटिंग या अत्याधुनिक पद्धतीद्वारे तांदळाच्या 2 वाणांचा विकास करण्यात आला असून यामुळे कमी पाण्याच्या वापरासह उत्पादकतेत 19 ते 40 टक्के वाढ होईल, कार्बन उत्सर्जन कमी करता येईल अशी माहिती त्यांनी दिली. बियाणे उत्पादकांशी बोलताना, भरड धान्यांच्या क्षेत्रात अधिक संशोधन आणि विकास होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. खासगी कंपन्यांनी त्यांचे प्रश्न सरकारसमोर मांडावेत असे आवाहन त्यांनी केले. नवे बियाणे बाजारात आणण्यासाठीचा कालावधी कमी कसा करता येईल यावर कंपन्यांनी विचार करावा असे सांगून त्यांनी या बियाणांच्या चाचणीसाठी लागणारा कालावधी कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे मान्य केले. तसेच चाचणीसाठी येणारा खर्च अवाजवी असून यासंदर्भात खासगी क्षेत्रासह एकत्रितपणे काम करण्याची सरकारची तयारी आहे असे त्यांनी सांगितले.

बियाणांच्या बाबतीत चुकीची पावले उचलणाऱ्यांना तसेच यामध्ये बेकायदेशीर उद्योग करणाऱ्यांना कधीही माफ केले जाणार नाही अशी सक्त ताकीद देत अशा लोकांना आळा घालण्यासाठी सरकार आणि खासगी क्षेत्राकडून कठोर कारवाई केली जावी असे निर्देश त्यांनी दिले.

याप्रसंगी उपस्थित असलेले भारतीय राष्ट्रीय बियाणे संस्थेचे अध्यक्ष एन प्रभाकर राव म्हणाले की बियाणे क्षेत्रातील आधुनिक बदल आणि समस्या निवारणाच्या दृष्टीने हे संमेलन म्हणजे एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे.

भारतीय बियाणे उद्योग महासंघाचे अध्यक्ष अजय राणा तसेच आशिया आणि प्रशांत बियाणे संघटनेचे अध्यक्ष टेक वाह कोह हे संयुक्तपणे सदर संमेलनाचे सह-अध्यक्षपद भूषवत आहेत. उपस्थितांना उद्देशून केलेल्या भाषणात अजय राणा म्हणाले की भारतात सर्व प्रकारचे हवामान विभाग असून जागतिक पातळीवर भारत चौथ्या स्थानी आहे. भारतीय कृषी क्षेत्र आणि बियाणे उद्योग विकासाच्या मार्गावर वाटचाल करत असून यामध्ये बियाणे क्षेत्राला मोठा वाव उपलब्ध झाला आहे असे त्यांनी सांगितले. आशियाई बियाणे संमेलनासारखे कार्यक्रम या क्षेत्रातील भागधारकांना एकमेकांना समजून घेण्याची आणि या क्षेत्राची प्रगती साधण्याची संधी उपलब्ध करून देतात असे मत त्यांनी व्यक्त केले.

या संमेलनात सार्वजनिक क्षेत्रात बियाणांच्या संदर्भातील भरीव योगदानासाठी त्रिलोचन महोपात्रा यांचा गौरव देखील करण्यात आला.

About Matribhumi Samachar

Check Also

संचार लेखा नियंत्रक कार्यालयात पणजी येथे पेन्शन अदालतचे आयोजन

पणजी, 9 ऑक्टोबर 2025. संचार लेखा नियंत्रक (सीसीए), महाराष्ट्र आणि गोवा कार्यालयाने आज 9 डिसेंबर …