मुंबई, 17 नोव्हेंबर 2025. अणुऊर्जा विभागाने (DAE) आणि कोलोजेनेसिस प्रायव्हेट यांनी आज संयुक्तपणे कोलोनोक्स (ColoNoX) या जखमेवरील प्रगत नायट्रिक ऑक्साईड-उत्सर्जक लेपपट्टीचे व्यावसायिक तत्वावरील लोकार्पण केले. भारतात DFU – Diabetic Foot Ulcers अर्थात मधुमेहामुळे पायावर टिकून राहणाऱ्या जखमेवरील प्रभावी उपचारांची वाढती गरज पूर्ण करण्याच्या उद्देशाने या संस्थांनी ही लेपपट्टी विकसित केली आहे.
या लेपपट्टीचे तंत्रज्ञान भाभा अणुसंशोधन केंद्राने विकसित केले आहे. (भारतीय पेटंट क्र. 300809, सप्टेंबर 2018). सुरुवातीच्या टप्प्यावर कोलोजेनेसिस हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेडने प्रायोगिक तत्वावर या तंत्रज्ञानाच्या आधारे या लेपपट्टीची प्रत्यक्ष निर्मिती केली. त्यानंतर त्यांनी लेपपट्टीच्या दुसर्या आणि तिसर्या टप्प्यातील यशस्वी वैद्यकीय चाचण्या पूर्ण केल्या. या यशानंतर, भाभा अणुसंशोधन केंद्राच्या तंत्रज्ञान हस्तांतरण कार्यक्रमांतर्गत, कोलोजेनेसिस प्रायव्हेट लिमिटेडला व्यावसायिक उत्पादनासाठी विशेष परवाना मंजूर करण्यात आला. या लेपपट्टीची निर्मिती म्हणजे जखमांवरील उपचाराच्या तंत्रज्ञानातील एक महत्त्वाचे पाऊल ठरले आहे. अशा प्रकारचे हे भारतातील पहिलेच उत्पादन आहे. या कंपनीने नायट्रिक ऑक्साईड-उत्सर्जक पट्टीच्या निर्मिती आणि व्यावसायिक उत्पादनासाठी भारतीय औषध महानियंत्रकांच्या (DCGI) अखत्यारितील केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेचा (CDSCO) परवाना (परवानगी क्र. MFG/MD/2024/000647) देखील मिळवला आहे.

या लेपपट्टीच्या व्यावसायिक तत्वावरील लोकार्पणानिमित्त झालेल्या कार्यक्रमाला, अणुऊर्जा विभागाचे सचिव आणि अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ. अजित कुमार मोहंती यांनी संबोधित केले. कोलोनोक्सचे लोकार्पण हे भारतात मधुमेहामुळे पायावर टिकून राहणाऱ्या जखमेवरील प्रभावी आणि परवडणाऱ्या दरातील उपचारांचे पर्याय उपलब्ध करून देण्याच्या दिशेने पडलेले एक मोठे पाऊल असल्याचे त्यांनी सांगितले. अणुऊर्जा विभागाने वैज्ञानिक नवोन्मेषाचा उपयोग सामाजिक हितासाठी करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. आणि त्यालाच समपर्क असे राष्ट्र की सेवा में परमाणु (राष्ट्राच्या सेवेत अणुऊर्जा) हे अणुऊर्जा विभागाचे ब्रीदवाक्य आहे असे ते म्हणाले. या उपक्रमातून या ब्रीदवाक्याप्रति संस्थेची असलेली वचनबद्धताच दिसून येत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. हा उपक्रम केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया आणि मेक फॉर द वर्ल्ड या दृष्टिकोनाला अनुसरूनच असल्याचे त्यांनी सांगितले.
भाभा अणुसंशोधन केंद्राचे संचालक विवेक भसीन यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. हा नवोन्मेषी उपक्रम प्रयोगशाळेतील संशोधनापासून ते त्याच्या व्यावसायिक उत्पादनापर्यंत यशस्वीरित्या नेण्यासाठी भाभा अणुसंशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ आणि कोलोजेनेसिस हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेडने संयुक्तपणे केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा त्यांनी केली. कोलोनोक्समुळे मधुमेहामुळे पायावर टिकून राहणाऱ्या जखमेच्या उपचार विषयक व्यवस्थापनात लक्षणीयरित्या सुधारणा घडून येईल आणि पायाचे नुकसान होण्याचा धोका कमी व्हायला मदत होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

भारतात मधुमेह जडलेल्यांचे प्रमाण जास्त असल्याने आरोग्य सेवेवर मोठा ताण आला आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात रुग्णांना मधुमेहामुळे पायावर टिकून राहणाऱ्या जखम होण्याचा धोकाही कायम असतो, आणि त्यांना विशेष उपचारांची आवश्यकता भासते. अशा जखमांवर कोलोनोक्सचा वापर केल्याने, उपचाराच्या दृष्टीने गरजेचे असलेले नायट्रिक ऑक्साईड थेट जखमेवर पोहोचवता येते. एका अर्थाने या लेपपट्टीच्या माध्यमातून मधुमेहामुळे पायावर टिकून राहणाऱ्या जखमेच्या उपचार विषयक व्यवस्थापनाला एक नवा आयाम मिळाला आहे. नायट्रिक ऑक्साईडमुळे मिळणारे प्रतिजैविकीय आणि पुनरुत्पादक लाभ, तसेच कोलॅजनचा जखम भरून काढण्याचा सिद्ध झालेला गुणधर्म अशा वैशिष्ट्यपूर्ण मिलाफातून, ही पट्टी जखम भरून काढण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

तमिळनाडूच्या सालेम इथे स्थित कोलोजेनेसिस हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक कृष्ण कुमार हे देखील या लोकार्पण समारंभाला उपस्थित होते. या पट्टीमधील कोलॅजन हायड्रोजेल घटकाची वेदना कमी करण्यासाठी आणि जखमेतून होणारा स्त्राव शोषून घेण्यासाठीही उपयुक्त असून, त्यामुळे जखम भरून निघण्यासाठी अनुकूल परिस्थिती तयार होते असे त्यांनी सांगितले.
Matribhumi Samachar Marathi

