मुंबई, 17 नोव्हेंबर 2025. अणुऊर्जा विभागाने आज स्वदेशी बनावटीच्या फेरोकार्बोनाटाईट (FC)- BARC B1401 नावाच्या प्रमाणित संदर्भ द्रव्य म्हणजे CRM ची घोषणा केली. विभागाचे सचिव तथा अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ.ए.के.मोहंती यांनी औपचारिकरीत्या सदर CRM वापरात आणल्याचे जाहीर केले. नव्याने विकसित केलेल्या या CRM ची भूमिका- दुर्मिळ मृदा मूलद्रव्यांच्या (REE) खनिजांच्या शोध, उत्खनन आणि प्रक्रिया नियंत्रण यासाठी तसेच संबंधित उत्पादन क्षेत्रांसाठी – अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. विश्लेषणात्मक पद्धतींचा विकास, उपकरणांचे मापन, आणि वैज्ञानिक-शैक्षणिक -औद्योगिक क्षेत्रांमध्ये गुणवत्ता राखण्यासाठी याची मदत होणार आहे.

बाटलीमध्ये पटल स्वरूपात बंदिस्त केलेले प्रमाणित संदर्भ द्रव्य- शक्तिशाली निम्न मिश्रधातू पोलाद
इलेक्ट्रॉनिक्स, नूतनीकरणक्षम ऊर्जा, उत्पादन, संरक्षण, आणि वैद्यकीय तंत्रज्ञान अशा सामरिक महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये दुर्मिळ मृदा मूलद्रव्ये आत्यंतिक महत्त्वाची ठरतात. REE साठी स्रोत खडक म्हणून सिद्ध झालेले फेरोकार्बोनाटाईट, भारतभरातील अनेक कार्बोनाटाईट संकुलांमध्ये विपुल प्रमाणात आढळते. आण्विक खनिजे शोध आणि संशोधन संचालनालय (AMD) मोठ्या प्रमाणावर त्याचा शोधही घेत आहे. एका-एका REE च्या प्रमाणाचा व्यवस्थित अंदाज येण्यासाठी, या सर्व निकषांमध्ये बसणाऱ्या CRM ची उपलब्धता हा अतिशय महत्त्वपूर्ण मुद्दा होय. तथापि, अशी द्रव्ये जागतिक पातळीवर मर्यादित प्रमाणातच उपलब्ध असतात आणि बऱ्याचदा त्यांची किंमतही अव्वाच्या सव्वा असते.
‘आत्मनिर्भर भारत’च्या राष्ट्रीय दृष्टिकोनाशी सुसंगत पद्धतीने या FC-CRM चा विकास झाल्यामुळे, भारताच्या विश्लेषणात्मक आणि तंत्रज्ञानात्मक क्षमतांमधील महत्त्वाची तफावत भरून निघणार आहे. नॅशनल सेंटर फॉर कॉम्पोझिशनल कॅरॅक्टरायझेशन ऑफ मटेरिअल्स (NCCCM), भाभा अणु संशोधन केंद्र आणि AMD- हैदराबाद या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांनी सदर CRM विकसित करण्यात आले आहे. प्रमाणीकरणासाठी आंतरराष्ट्रीय प्रमाणन संघटनेच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात आले आहे.

FC-CRM मुळे Al, Ca, Fe, Mg, Mn आणि P या सहा (06) प्रमुख मूलद्रव्यांबरोबरच पुढील तेरा (13) दुर्मिळ मृदा मूलद्रव्यांना प्रमाणित मूल्य दिले जाणार आहे- Ce, Dy, Er, Eu, Gd, La, Nd, Pr, Sc, Sm, Tb, Y आणि Yb. अशाप्रकारे संपूर्णपणे भारतात विकसित झालेले हे पहिलेच CRM असून, पूर्ण जगाच्या दृष्टीने पाहता, ते चौथे CRM आहे. म्हणून हे यश मोलाचे ठरते.
आजच्या कार्यक्रमाला अणुऊर्जा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यांमध्ये- BARC चे संचालक विवेक भसीन, AMD चे संचालक धीरज पांडे, BARC च्या रसायनशास्त्र गटाचे सहाय्यक संचालक डॉ.ए.सी.भसीकुट्टन, BARC चे नियंत्रक के.जयकुमार, अणुऊर्जा विभागाच्या जनजागृती आणि माध्यम संवाद विभागाचे प्रमुख डॅनियल पी.बाबू आणि NCCCM-BARC चे प्रमुख डॉ.के.दाश यांचा समावेश होता.

Matribhumi Samachar Marathi

