पणजी, 17 डिसेंबर 2025. भारतीय नौदलाने आधुनिकीकरण आणि क्षमता वृद्धीच्या प्रयत्नांचा नवा टप्पा गाठत 17 डिसेंबर 2025 रोजी गोवा येथील दाबोलीम स्थित आयएनएस हंसा तळावर दुसरे एमएच 60 आर हेलिकॉप्टर स्क्वॉड्रन आयएनएएस 335 ‘ऑस्प्रिज्’ ताफ्यात दाखल केले . नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश के. त्रिपाठी यावेळी उपस्थित होते. यापूर्वी मार्च 2024 मध्ये केरळातील कोची येथे पहिले एमएच- 60आर हेलिकॉप्टर नौदलासाठी तैनात झाले.
नौदलाच्या या युनिटला औपचारिक मान्यता देणारं अधिकृत आदेशपत्र कमांडिंग ऑफिसर (डिझाईन ) कॅप्टन धिरेन्दर बिष्ट यांनी वाचून दाखवलं. त्यानंतर नौदल प्रमुखांनी, पश्चिम नौदल कमांडचे मुख्य ध्वज अधिकारी व्हाइस अॅडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांच्या उपस्थितीत फलकाचे अनावरण केले.
बहुपयोगी एमएच-60आर हेलिकॉप्टरचा पश्चिम किनारपट्टीवर नौदलाच्या ताफ्यात समावेश हा महत्त्वाचा टप्पा आहे, असे अॅडमिरल त्रिपाठी म्हणाले. ते म्हणाले , “2025 हे वर्ष विशेष आहे कारण याच वर्षी फ्लीट एअर आर्म स्थापन करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिल्याला 75 वर्षे पूर्ण झाली. त्या निर्णयामुळे नौदल हवाई दलाला नवे पंख मिळाले आणि नौदलाची बहुआयामी शक्ती विकसित झाली.”
ते पुढे म्हणाले, “बरोबर 64 वर्षांपूर्वी, 17/18 डिसेंबर 1961 च्या रात्री ऑपरेशन विजय सुरू झाले. या मोहिमेअंतर्गत पोर्तुगीजांच्या ताब्यातून गोवा मुक्त करण्यासाठी भारतीय नौदलाची जहाजे गोव्याच्या दिशेने निघाली. तेथेही नौदलाच्या विमानांनी महत्वाची भूमिका बजावली. जुने विक्रांत जहाज आणि तिचे हेलिकॉप्टर समुद्रात इतक्या दूर तैनात होते की किनाऱ्यावरून दिसत नव्हते आणि त्यांनी गोव्याच्या दिशेने जाणारे मार्ग सुरक्षित केले.”
“335 स्क्वाड्रन आज गोव्यात औपचारिकरित्या नौदलाच्या सेवेत दाखल होत असताना, एमएच 60 आर हेलिकॉप्टरने ऑपरेशन सिंदूर, ट्रॉपेक्स 25 आणि नुकत्याच झालेल्या तिन्ही सैन्यदलांच्या संयुक्त सराव 2025 मध्ये आपली सज्जता सिद्ध करुन दाखवली आहे. त्यामुळेच हे सांगताना मला खूप आनंद होत आहे की, आज सेवेत दाखल होणाऱ्या स्क्वाड्रनची तयारी पूर्ण आहे, पहिल्या दिवसापासूनच नौकांच्या ताफ्यासोबत तैनात होण्यास सज्ज आहे. यातून वेगवान क्षमता बांधणी आणि समावेशनाबाबतची आमची दृढ कटिबद्धता दिसून येते,” असे ऍडमिरल दिनेश के. त्रिपाठी म्हणाले.
आज आपल्या सभोवतालची सागरी स्थिती पूर्वीपेक्षा अधिक गुंतागुंतीची आणि स्पर्धात्मक आहे. या आव्हानात्मक आणि गतीमान धोरणात्मक संदर्भाच्या पार्श्वभूमीवर भारताचे सागरी क्षेत्र 2047 पर्यंत विकसित भारत होण्याच्या दिशेने आगेकूच करत आहे असे त्यांनी सांगितले.
विमानांच्या थरारक कसरतींचे दिमाखदार प्रदर्शन आणि नौकांच्या ताफ्याची पारंपरिक सलामी हे आजच्या ऐतिहासिक दिवसाच्या कार्यक्रमाचे आकर्षण ठरले.
व्हाइस ऍडमिरल राहुल विलास गोखले, पश्चिम नौदल विभागाचे चीफ ऑफ स्टाफ रिअर ऍडमिरल अजय डी थिओफिलस, गोवा नौदल क्षेत्राचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग व नौदल विमानउड्डाण विभागाचे फ्लॅग ऑफिसर ऍडमिरल करमबीर सिंग (निवृत्त), माजी नौदलप्रमुख, नौदल अधिकारी, निवृत्त कर्मचारी तसेच अन्य मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
या हेलिकॉप्टर्समुळे भारतीय नौदलाच्या पश्चिम सागरी क्षेत्रातील अंतर्गत हवाई सामर्थ्यामधे लक्षणीय वाढ होईल. आधुनिक शस्त्रे, सेन्सर्स आणि अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक्स प्रणाली यामुळे हे हेलिकॉप्टर भारतीय नौदलासाठी पारंपरिक तसेच कालपरत्वे उद्भवणाऱ्या संकटांचा सामना करण्यासाठीचे वैशिष्ट्यपूर्ण व सक्षम साधन ठरले आहे. या हेलिकॉप्टरमध्ये सर्व प्रकारच्या कामकाजाची संपूर्ण क्षमता असून अनेक प्रसंगांमध्ये त्याने आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. या स्क्वाड्रनच्या समावेशामुळे भारतीय नौदलाच्या अंतर्गत हवाईउड्डाण सामर्थ्यामध्ये लक्षणीय वाढ होईल.
Matribhumi Samachar Marathi

