मुंबई , 18 नोव्हेंबर 2025
भारतीय अणुऊर्जा महामंडळ, महाजेनको अर्थात महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी आणि मित्रा अर्थात महाराष्ट्र परिवर्तन संस्थेत आज एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाली. या कराअंतर्गत महाराष्ट्रात संयुक्तपणे अणुऊर्जा आधारित वीज निर्मिती प्रकल्प उभारणीतील परस्पर सहकार्याच्या शक्यतांची चाचपणी केली जाणार आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत, भारतीय अणुऊर्जा महामंडळाचे वैज्ञानिक, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक भुवन चंद्र पाठक, महाजेनकोचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राधाकृष्णन बी. आणि मित्राचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी या सामंजस्य कराराव स्वाक्षरी केली.

मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण सिंह परदेशी, महाराष्ट्राच्या अतिरिक्त मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला, अणुऊर्जा विभागाचे नितीन बी. जवळे, भारतीय अणुऊर्जा महामंडळाचे संचालक (तांत्रिक) व्ही. राजेश आणि संचालक (प्रकल्प) एन.के. मिथारवाल यांच्यासह सहभागी संस्थांचे वरिष्ठ अधिकारी देखील यावेळी उपस्थित होते.
असा सामंजस्य करार करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी आनंद व्यक्त केला. या उपक्रमाचे कौतुकही त्यांनी केले, तसेच या संदर्भात महाराष्ट्र सरकारकडून पूर्ण पाठबळ आणि सहकार्य मिळेल याची ग्वाही दिली.
या सामंजस्य करारामुळे राज्यात अत्याधुनिक अणुऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी पुढच्या चर्चेचा मार्ग प्रशस्त झाला आहे.
या धोरणात्मक भागीदारीतून सुरक्षित, विश्वसनीय आणि शाश्वत अणुऊर्जा वितरित करण्याप्रती भारतीय अणुऊर्जा महामंडळाची वचनबद्धता अधिक दृढ झाली आहे. तसेच यामुळे भारताच्या स्वच्छ ऊर्जा आणि ऊर्जा सुरक्षाविषयक दीर्घकालीन उद्दिष्टांनाही पाठबळ मिळाले आहे.

Matribhumi Samachar Marathi

