पणजी, 19 जून 2025. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीतील केंद्रीय दूरसंचार ब्युरोने (सीबीसी) आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 निमित्त दक्षिण गोव्यात मडगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या तीन दिवसीय मल्टीमिडिया प्रदर्शनाचे आज 19 जून 2025 रोजी उद्घाटन करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनाचे उद्घाटन दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी भारतीय प्रशासकीय अधिकारी एग्ना क्लीटस यांच्या हस्ते झाले.याप्रसंगी दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक, टिकम सिंह वर्मा उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना, आयएएस एग्ना क्लीटस यांनी या माहितीपूर्ण प्रदर्शनाचे आयोजन केल्याबद्दल सीबीसी गोवा तसेच जिल्हा प्रशासनाचे कौतुक केले. त्यांनी योगाला सर्वांगीण आरोग्य, पर्यावरणाशी सुसंवाद आणि अंतर्गत शांतीसाठी एकीकरण करणारी शक्ती म्हणून अधोरेखित केले. “तणावपूर्ण नोकऱ्यांमध्ये कार्यरत असलेल्यांनी दररोज योग साधना करण्यासाठी थोडा वेळ काढायला हवा. तुम्ही त्याची सवय करा मग ही सवय तुम्हाला हळूहळू तुमचे जीवन आणि काम यांच्यातील समतोल साधण्यासाठी मदत करेल,” त्या म्हणाल्या.
आयपीएस अधिकारी टिकम सिंह वर्मा यांनी त्यांच्या भाषणात नागरिकांमध्ये मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याची जोपासना करण्यात योगाचे महत्त्व अधोरेखित केले. लोकांनी योगाचे लाभ समजून घ्यावेत आणि दैनंदिन जीवनात योगाभ्यास स्वीकारावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमात, अधिक आरोग्यपूर्ण आणि हरित जीवनशैली स्वीकारण्याप्रती बांधिलकीचे प्रतीक म्हणून उपस्थितांनी “आरोग्य आणि पर्यावरणासाठी योग” ही सामुहिक शपथ देखील घेतली.
गोवा सीबीसी चे प्रसिद्धी अधिकारी रियास बाबू यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर क्षेत्र प्रसिद्धी सहाय्यक शुभम गुडाधे यांनी आभार प्रदर्शन केले.
“आरोग्य आणि पर्यावरणासाठी योग” ह्या या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या संकल्पनेशी सुसंगत अशी अनेक माहितीपूर्ण पॅनेल्स, दृकश्राव्य घटक आणि विविध परस्परसंवादी कार्यक्रम या प्रदर्शनात सादर केलेले आहेत.
आंतरसंवादात्मक मांडणी आणि उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांना योगाभ्यासाचे लाभ जाणून घेण्यासाठी प्रोत्साहित करणारे मडगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयात तळमजल्यावरील हे प्रदर्शन दिनांक 21 जून 2025 पर्यंत सकाळी साडेनऊ ते संध्याकाळी सहा या वेळात जनतेसाठी खुले असेल. प्रदर्शनाचा हा उपक्रम म्हणजे योगाच्या परिवर्तनकारी सामर्थ्याविषयी जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 निमित्त आयोजित विस्तृत राष्ट्रीय कार्यक्रमांचा एक भाग आहे.



Matribhumi Samachar Marathi

