पणजी, गोवा दि. 19.07.2025
खासदार निधीचा नियोजित पद्धतीने विनोयोग करताना आम्ही नेहमी शिक्षण व आरोग्याला प्राधान्य देत आलो आहोत. विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे सुलभ व्हावे यासाठी शाळांना विविध सुविधा प्राप्त करून दिल्या जात आहेत, स्कूल बसेस पुरवल्या जात आहेत, असे केंद्रीय ऊर्जा आणि नवीन व नवीनीकरण ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले.
पणजी येथील पर्यटन भवनात आयोजित करण्यात आलेल्या दिव्यांगांना तीन चाकी स्कूटर्स वितरण कार्यक्रमात केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक बोलत होते. यावेळी आमोणे, साखळी येथील विठ्ठल रखुमाई देवस्थानला श्री. नाईक यांच्या हस्ते स्पीकर सेट प्रदान करण्यात आला.
सरकारी कायद्यानुसार १५ वर्षें जुन्या बसेस मोडित काढल्या जाणार आहे. याचा परिणाम मोठ्या प्रमाणात शाळांवर देखील होणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे बऱ्याच जुन्या स्कूल बसेस सेवेतून काढाव्या लागणार आहेत. यावर सहानुभूतीपूर्ण विचार करून शाळांना सीएसआर निधी अंतर्गत बसेस उपलब्ध करून देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे आणि त्याची अंमलबजावणीही झालेली आहे, असे श्री. नाईक यांनी सांगितले.
कचरा व्यवस्थापन ही सध्या गावांची मोठी डोकेदुखी झाली आहे. ही समस्या सोडविण्यासाठी प्रत्येक पंचायतीला खासदार निधीतून कचरावाहू वाहन पुरविण्यास आम्ही पुढाकार घेतला आहे. खासदार निधीअंतर्गत वाहने खरेदी करण्याच्या नियमांत बदल झाल्याने वाहने उपलब्ध करण्यात थोडा विलंब झाला, मात्र येत्या काळात ती तूट भरून काढली जाईल, असे श्री. नाईक यांनी सांगितले.
केंद्रीय राज्यमंत्री श्री. नाईक यांच्या हस्ते सुर्ला, डिचोली येथील प्रसाद विष्णू वळवईकर, अडकोण – बाणस्तारी येथील अनिल फोंडू नाईक गांवकर व मांद्रे येथील देवेंद्र आर. पार्सेकर या दिव्यांगांना तीन चाकी स्कूटर्स आज प्रदान करण्यात आल्या.
१८व्या लोकसभेच्या कार्यकाळाला गेल्या मे पासून प्रारंभ झाल्यापासून आतापर्यंत तीन पंचायतींना शववाहिका, दहा दिव्यांगांना तीन चाकी स्कूटर्स, तीन शाळांना स्कूल बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त बारा विद्यालयांना कम्प्युटर्स, लॅपटॉपसह एलसीडी प्रॉजेक्टर, झेरोक्स मशिन्स आदि साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्र्यांनी यावेळी दिली.
तीनचाकी स्कूटर्सचे लाभार्थी तीन दिव्यांग बंधुंना आणि श्री विठ्ठल रखुमाई देवस्थानचे पदाधिकारी यांच्या सोबत केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक
Matribhumi Samachar Marathi

