Thursday, December 25 2025 | 03:15:43 AM
Breaking News

सीमाशुल्क विभागाच्या मुंबई यॉट क्लबने ओजीओआर 2025 शर्यतीत तिसरा क्रमांक पटकावला

Connect us on:

बॉम्बे कस्टम्स यॉट क्लब (बीसीवायसी) च्या अंतर्गत मुंबईच्या सीमाशुल्क विभाग अधिकाऱ्यांनी ओशन गोल्ड ऑफशोअर रेस (ओजीओआर) 2025 मध्ये तृतीय क्रमांक पटकावला   आणि संबंधित गोवा यॉट रान्देव्ह्यु (जीवायआर) मध्ये यशस्वी सहभाग नोंदवला.  भारतीय यॉटिंग महासंघाच्या (वायएआय) अधिपत्याखाली या राष्ट्रीय स्तरावरील अपतटीय आणि तटवर्ती नौकानयन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.

दिनांक 09 डिसेंबर 2025 रोजी बीसीवायसीच्या पथकाने मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथून जेकस III या कीलबोटीवरून गोव्यापर्यंतच्या या सफरीची सुरुवात केली, या दरम्यान त्यांनी कोकण किनाऱ्यावर विजयदुर्ग येथे एक थांबा घेतला. सीमाशुल्क विभागाचे आयुक्त आणि बीसीवायसीचे कमांडर यांच्या हस्ते या सफरीला समारंभपूर्वक रवाना करण्यात आले होते. अपतटीय टप्प्यात दीर्घ सागरी प्रवास, रात्रीच्या वेळी नौकानयन आणि सतत बदलते हवामान यामुळे अत्यंत अचूक जीपीएस दिशादर्शन, चार्ट वर्क, वारा आणि भर्तीचे मूल्यांकन, हवामानाचा अंदाज तसेच डावपेच विषयक निर्णयांची आवश्यकता होती.

जेकस III या बोटीने 12 डिसेंबर 2025 रोजी पहाटे अग्वाडा किल्ल्याच्या दीपगृहा पाशी असलेली अंतिम रेष पार करत आयआरसी हँडीकॅप प्रणाली अंतर्गत दुरुस्त केलेल्या वेळेच्या आधारे हँडीकॅपसंबंधित समग्र कीलबोट श्रेणीत तिसरे स्थान मिळवले. तसेच या पथकाने नौकानयन आणि डावपेचविषयक कौशल्यांचे दर्शन घडवत जीवायआर तटवर्ती दिन शर्यत देखील पूर्ण केली.

विजयदुर्ग येथील थांब्याच्या कालावधीत बोटीच्या पथकाने आयएनएसव्ही तारिणी वर 2024-25 मध्ये बोटीतून पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण करणाऱ्या लेफ्टनंट कमांडर रुपा ए. तसेच लेफ्टनंट कमांडर दिलना के. यांच्याशी संवाद साधला आणि भारताच्या अपतटीय नौकानयन कौशल्यांविषयी मूल्यवान विचारधन प्राप्त केले.

जेकस III च्या  नौकानयन पथकात केनेथ एम,डिसुझा (सुमारे 26,000 सागरी मैलांचा अनुभव असलेले, बीसीवायसीचे स्कीपर आणि मानद नौकानयन प्रशिक्षक), अर्शदीप सिंह (संयुक्त आयुक्त), मिशल क्विनी डिकोस्टा (उपसंचालक), संदीप कुमार (अधीक्षक), प्रकाश चंद्र (अधीक्षक), नितीन चौधरी (प्रतिबंधक अधिकारी) आणि विष्णू पालेकर तसेच ऋषिकेश पालेकर या तांडेलांचा समावेश होता.

केंद्रीय अप्रत्यक्ष कर मंडळ आणि सीमाशुल्क विभागाच्या (सीबीआयसी) आधिपत्याखालील बॉम्बे कस्टम्स यॉट क्लब  विविध प्रशिक्षण कार्यक्रम, सागर सफारी आणि राष्ट्रीय कार्यक्रमांच्या माध्यमातून अधिकाऱ्यांमध्ये नौकानयन, नाविककौशल्य तसेच सागरी जागरुकता यांना चालना देत असते. जेकस III या बोटीने यापूर्वी मस्कत, मालदीव, सिंगापूर, फुकेत आणि पोर्ट ब्लेअर या ठिकाणांना दीर्घ पल्ल्याच्या सफरींचे आयोजन केले आहे.

ही कामगिरी नौकानयन समुदायाशी असलेले नाते दृढ करत, सागरी कौशल्य, नेतृत्व, तसेच लवचिकतेची जोपासना करत अधिकाऱ्यांची शिस्त, संघभावना आणि कर्तव्यापलीकडे उत्कृष्टतेप्रती बांधिलकी अधोरेखित करते.

About Matribhumi Samachar

Check Also

भारतीय संरक्षण लेखा सेवेच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

नवी दिल्‍ली, 24 डिसेंबर 2025. भारतीय संरक्षण लेखा सेवेतील  (2025 तुकडी) प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी आज (24 डिसेंबर, …