Tuesday, December 23 2025 | 02:21:09 AM
Breaking News

भारतीय तटरक्षक दलाने गोवा शिपयार्ड येथे तयार केलेले ‘अमूल्य ‘ जलद गस्ती जहाज सेवेत केले दाखल

Connect us on:

भारतीय तटरक्षक दलाचे  ‘अमूल्य ‘ हे जहाज, नवीन पिढीच्या अदम्य-श्रेणीच्या जलद गस्ती  जहाजामधील  तिसरे जहाज असून  आज  19,डिसेंबर 2025  रोजी गोवा शिपयार्ड लिमिटेड, वास्को, गोवा येथे आयोजित एका कार्यक्रमात संरक्षण मंत्रालयाचे संयुक्त सचिव अमिताभ प्रसाद यांच्या हस्ते सेवेत दाखल करण्यात आले.

3000 किलोवॅट प्रगत दोन डिझेल इंजिनांनी सुसज्ज असलेल्या 51 मीटर लांबीच्या जलद गस्ती जहाजाची रचना आणि बांधकाम गोवा शिपयार्ड लिमिटेडने केले  होते.

या कार्यक्रमात बोलताना, अमिताभ प्रसाद म्हणाले की, अमूल्य हे जहाज भारतीय तटरक्षक दलाची परिचालन  क्षमता अधिक बळकट करेल. “अत्याधुनिक प्रणाली आणि 60% पेक्षा अधिक  स्वदेशी सामग्रीने सुसज्ज असलेले, अमूल्य हे आत्मनिर्भर भारताच्या दृष्टिकोनाचे एक झळाळते  प्रतीक आहे. ते केवळ आपली तंत्रज्ञान प्रगतीच दर्शवत नाही तर भारताचे सागरी सामर्थ्य आणि औद्योगिक पाया देखील मजबूत करते . आज आपले सागरी वातावरण गतिशील आणि जटिल दोन्ही  आहे. या आव्हानांना प्रभावीपणे तोंड देण्यासाठी, भारतीय तटरक्षक दलाने आपल्या ताफ्याचे आधुनिकीकरण, देखरेख क्षमता वाढवणे आणि परिचालन सज्जता मजबूत ठेवण्याचे काम सुरु ठेवले  आहे,” असे ते म्हणाले.

या जहाजाच्या बांधकामाबद्दल जीएसएलचे कौतुक करताना, अमिताभ प्रसाद म्हणाले की, या जहाजाची  स्वदेशी बांधणी हे आपल्या जहाजबांधणी उद्योगाच्या वेगवान वाढीचे अभिमानास्पद प्रतीक आहे. “स्वदेशीकरणामुळे राष्ट्रीय सामर्थ्य वाढते , आर्थिक वाढीस हातभार लागतो आणि आपल्या लोकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतात. राष्ट्र उभारणीत हे खरोखरच एक स्वागतार्ह आणि महत्त्वाचे पाऊल आहे,” असे ते म्हणाले.

जीएसएलचे संचालक (ऑपरेशन) रिअर अॅडमिरल नेल्सन डिसोझा म्हणाले की, सहा दशकांहून अधिक काळ, जीएसएल देशातील सर्वात विश्वासार्ह आणि बहुमुखी युद्धनौका निर्मात्यांपैकी एक म्हणून उदयास आले आहे. “जीएसएलने आतापर्यंत भारतीय नौदल, भारतीय तटरक्षक दल आणि मित्र राष्ट्रांना 400 हून अधिक प्लॅटफॉर्म वितरित केले  आहेत. यापैकी,  35 प्लॅटफॉर्म तटरक्षक दलासाठी बांधण्यात आले आहेत, जे जीएसएल आणि तटरक्षक दल यांच्यातील दृढ  संस्थात्मक विश्वास आणि दीर्घकालीन भागीदारी अधोरेखित करते,” असे ते म्हणाले.

पद्मश्री लिबिया लोबो सरदेसाई, महानिरीक्षक  ज्योतिंद्र सिंह, टीएम उपमहासंचालक (मनुष्यबळ  विकास) तटरक्षक दल मुख्यालय  आणि चीफ ऑफ स्टाफ, तटरक्षक दल, पश्चिम सीबोर्ड, जीएसएल आणि केंद्र आणि राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

अमूल्य हे जहाज  27 नॉट्सचा सर्वाधिक वेग आणि 1500 नॉटिकल मैल इतकी परिचालन सज्जता देण्यास सक्षम आहे, ज्यामुळे भारताच्या सागरी क्षेत्रात विस्तारित मोहिमा शक्य होतील.  हे जहाज 30 मिमी सीआरएन–91 तोफ आणि दोन 12.7 मिमी स्टेबिलाइज्ड रिमोट-कंट्रोल्ड गनने सज्ज आहे, ज्याला प्रगत लक्ष्य संपादन आणि अग्नि-नियंत्रण प्रणालींचा आधार आहे.

हे जहाज ओदिशातील पारादीप येथे तैनात असेल आणि कमांडर, तटरक्षक दल जिल्हा मुख्यालय क्रमांक 7 द्वारे कमांडर, तटरक्षक दल क्षेत्र (ईशान्य) च्या प्रशासकीय आणि परिचालन  नियंत्रणाखाली कार्यरत असेल.

About Matribhumi Samachar

Check Also

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचा इंदूर येथे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यात सहभाग

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज मध्य प्रदेशातील इंदूर येथे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या …