रस्ते, वाहतूक आणि महामार्ग आणि कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा यांनी पायाभूत सुविधांच्या सामाजिक-आर्थिक प्रभावांवर भर दिला आणि नमूद केले की चांगले आणि मजबूत रस्त्यांच्या जाळ्यामुळे या प्रदेशात समृद्धी येईल.
2047 पर्यंत विकसित भारताची उभारणी करण्याच्या पंतप्रधानांच्या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी पायाभूत सुविधांचा विकास हा प्रमुख घटक असेल असे ते म्हणाले.
ते आज मिझोरममधील आयझॉल येथे मिझोरम विद्यापीठ संकुलात इंडियन रोड्स काँग्रेसच्या 233 व्या मध्यावधी परिषदेच्या बैठकीला संबोधित करत होते.
मिझोरमचे मुख्यमंत्री लालदुहोमा आणि मिझोरमचे खासदार रिचर्ड वनलालमंगैहा हे देखील बैठकीला उपस्थित होते.
गेल्या 11 वर्षात राष्ट्रीय महामार्गांची लांबी 2014 मधील 91,000 किमी च्या तुलनेत 60% हून अधिक वाढून आता सुमारे 1.47 लाख किमी झाली आहे असे हर्ष मल्होत्रा म्हणाले .
जगातील सर्वोत्तम सिद्ध तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची आणि गुणवत्तेशी तडजोड न करता बांधकामाचा खर्च कमी करण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला.
त्यांनी इंडियन रोड काँग्रेसची प्रशंसा केली , जी गेल्या काही वर्षांमध्ये देशातील चांगल्या रस्त्यांसाठी समर्पित बहुआयामी संघटना बनली आहे, ज्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारे, लष्कराच्या अभियांत्रिकी सेवा, सीमा रस्ते संघटना इत्यादींचे सदस्य आहेत.
राष्ट्रीय महामार्गांच्या बांधकामातील इंडियन रोड काँग्रेसची भूमिका अधोरेखित करताना ते म्हणाले की रस्ते आणि पुलांच्या बांधकामासाठी सरकारने निर्दिष्ट केलेल्या गुणवत्ता आणि सुरक्षा मानकांसह तसेच इंडियन रोड काँग्रेस कोड, मार्गदर्शक तत्त्वे आणि विशेष प्रकाशनांनुसार कामे केली जातात.





Matribhumi Samachar Marathi

