वर्धा, दि.२० जून २०२५. आपले शरीर व मन निरोगी ठेवण्यासाठी प्रत्येकाने योगाचा स्विकार करून नियमितीत योगासने करून योगाला आपल्या जिवनाचे अविभाज्य घटक बनवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी आज येथे केले.
माहिती आणि प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या अंतर्गत केंद्रीय संचार ब्यूरो, वर्धा. जिल्हा प्रशासन, वर्धा, जिल्हा परिषद, वर्धा, पोलिस अधिक्षक कार्यालय, वर्धा, न्यू इंग्लिश हायस्कुल व ज्युनियर कॉलेज, वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने न्यू इंग्लिश हायस्कुल व ज्युनियर कॉलेजचे सभागृह, महादेवपुरा, वर्धा येथे आयोजित “जागतिक योग दिवस २०२५” या विषयावर आधारीत मल्टिमिडीया छायाचित्र प्रदर्शनाचे उदघाटन जिल्हाधिकारी वान्मथी सी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
मंचावर माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्युरो, क्षेत्रीय कार्यालय, वर्धाचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत, वर्धा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अनिल कठाणे, सचिव अशोक गोयंका, प्रदीप बजाज, संचालक मिनाताई चतुर, प्राचार्या अनघा आगवण, पतंजली योग समितीचे जिल्हा अध्यक्ष प्रशांत सावरकर, जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालयाचे सहाय्यक क्रिडा अधिकारी भोजराज चौधरी, उपमुख्याध्यापक विजय जुगनाके प्रामुख्याने उपस्थित होते.
योग केल्यामुळे आपल्या शारिरीक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्यालाही फायदा असल्याचे सांगून जिल्हाधिकारी वान्मथी सी म्हणाल्या की, विद्यार्थी ही देशाची भावी पिढी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना स्वतःला आत्मकेंद्रीत करण्यासाठी योगाचा आपल्या जिवनात समावेश करण्याची गरज आहे. अभ्यास करतांना लक्ष केंद्रीत करण्यासाठी दररोज योगाभ्यास करावा. याचबरोबरच नागरीकांनी सुध्दा आपले आरोग्य जपण्यासाठी नियमिती योगा करून आपले आरोग्य सुदृढ बनवावे. योगा विषयीची संपुर्ण माहिती असलेले हे प्रदर्शन फार उपयुक्त असून नागरीक व विद्यार्थ्यांसाठी प्रदर्शनाला भेट देऊन माहिती जाणून घ्यावी, तसेच २१ जून २०२५ रोजी सकाळी ६.३० वाजता योग दिवसाच्या कार्यक्रमात सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत प्रास्ताविक भाषणात म्हणाले की, यंदा योगाचे ११ वे वर्ष साजरे करण्यात येत आहे. योगाचे महत्व जागतिक पातळीवर दिवसेंदिवस वाढत चालले आहे. विद्यार्थी व नागरीकांपर्यंत योग आसनांची माहिती पोहचविण्यासाठी सचित्र माहिती असलेले मल्टिमिडीया प्रदर्शन लावण्यात आले असून नागरीकांनी मोठ्या संख्येने भेट देऊन योगा विषयीची माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
पतंजली योग समितीचे जिल्हा अध्यक्ष प्रशांत सावरकर योगांच्या सर्व आसनांविषयी विस्तृत अशी माहिती दिली. तसेच नियमित योग केल्याने आपलया शरीरासह मनाचे आरोग्य उत्तम राहत असून नागरीकांनी योगाचा आपल्या दैनंदिन जिवनात समावेश करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या छायाचित्र प्रदर्शनात विविध प्रकारच्या योगासनाची सचित्र माहिती प्रदर्शित करण्यात आली आहे. नागरीकांनी प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
अनिल कठाणे यांनी नागरीकांनी प्रदर्शनाला भेट देऊन योग आसनांची माहिती जाणून घ्यावे, तसेच २१ जून रोजी आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे आवाहन केले. यावेळी इतर मान्यवरांनीही आपले मनोगत व्यक्त करून योग दिनाच्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले. संचालन प्रियंका उपदेव व अर्चना साळवे यांनी केले, तर आभार प्राचार्या श्रीमती अनघा आगवण यांनी मानले.
हे प्रदर्शन २१ जून २०२५ पर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ५ यावेळेत दोन दिवस चालणार आहे. नागरिकांसाठी हे प्रदर्शन निःशुल्क ठेवण्यात आले असून नागरिक व विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाला भेटी देऊन माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन केंद्रीय संचार ब्युरो, क्षेत्रीय कार्यालय, वर्धाचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत व न्यू इंग्लिश हायस्कुल व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या श्रीमती ए.के.आगवण यांनी केले आहे.
जागतिक योग दिवस २१ जून ला
माहिती आणि प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या अंतर्गत केंद्रीय संचार ब्यूरो, वर्धा. जिल्हा प्रशासन, वर्धा, जिल्हा परिषद, वर्धा, पोलिस अधिक्षक कार्यालय, वर्धा मेरा युवा भारत, वर्धा, जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय, वर्धा, न्यू इंग्लिश हायस्कुल व ज्युनियर कॉलेज, वर्धा, पतंजली योग परिवार, वर्धा, निसर्ग सेवा समिती, वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने २१ जून २०२५ रोजी सकाळी ६.३० वाजता रंग मंदिर प्रांगण, न्यू इंग्लिश हायस्कुल व ज्युनियर कॉलेज, महादेवपुरा, वर्धा येथे जागतिक योग दिवस साजरा करण्यात येणार आहे.
यावेळी योग गुरूद्वारे विविध प्रकारचे योगासनाचे प्रात्याक्षिक नागरीकांकडून केली जाणार आहेत. नागरीक, शिक्षक, खेळाडू, विद्यार्थी, शासकीय अधिकारी व कर्मचारी, योगप्रेमी यांनी कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन केंद्रीय संचार ब्युरोचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत, जिल्हा क्रिडा अधिकारी आशा मेश्राम, न्यू इंग्लिश हायस्कुल व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या श्रीमती ए.के.आगवण यांनी केले आहे.
Matribhumi Samachar Marathi

