राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज (20 जून 2025) डेहराडून येथे राष्ट्रपती तपोवन आणि राष्ट्रपती निकेतनच्या उद्घाटनाला उपस्थित होत्या. त्यांनी अभ्यागत सुविधा केंद्र, उपाहारगृह आणि स्मरणिका विक्री दुकान यासारख्या सार्वजनिक सुविधांचे उद्घाटन केले आणि राष्ट्रपती निकेतन येथे राष्ट्रपती उद्यानाची पायाभरणी केली. त्यांनी काल (19 जून 2025) राष्ट्रपती निकेतन येथे एका अँफीथिएटरचे उद्घाटनदेखील केले.
राष्ट्रपती निकेतन, राष्ट्रपती तपोवन आणि राष्ट्रपती उद्यानातील जैवविविधतेवरील पुस्तकाचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले. राष्ट्रपती तपोवन आणि राष्ट्रपती निकेतन अनुक्रमे 24 जून आणि 1 जुलै 2025 पासून जनतेसाठी खुली होतील. राष्ट्रपतींनी डेहराडून येथील राष्ट्रीय दृष्टिबाधित व्यक्तींच्या सक्षमीकरण संस्थेला भेट दिली आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी मॉडेल स्कूल सायन्स लॅब आणि संगणक लॅब तसेच एका प्रदर्शनालाही भेट दिली.
या प्रसंगी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की, एखाद्या देशाची किंवा समाजाची प्रगती त्या समाजातील लोक अपंग व्यक्तींशी कसे वागतात यावरून ठरवता येते. भारताचा इतिहास संवेदनशीलता आणि समावेशकतेच्या प्रेरणादायी घटनांनी भरलेला आहे. मानवी करुणा आणि प्रेमाचे घटक आपल्या संस्कृती आणि सभ्यतेचा नेहमीच अंगभूत हिस्सा राहिले आहेत. सुलभ भौतिक वातावरण, वाहतूक, माहिती आणि संप्रेषण परिसंस्था विकसित करण्यावर भर देणाऱ्या सुगम्य भारत अभियानाच्या माध्यमातून सरकार दिव्यांगजनांचे सक्षमीकरण आणि समान सहभाग यासाठी प्रयत्नशील आहे, असे त्यांनी सांगितले.
राष्ट्रपती म्हणाल्या की, आजचे युग हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे युग आहे. प्रगत तंत्रज्ञानाच्या मदतीने दिव्यांग व्यक्तीदेखील मुख्य प्रवाहात योगदान देऊ शकतात. राष्ट्रीय दृष्टिहीन व्यक्तींच्या सक्षमीकरण संस्थेने समावेशक शिक्षण प्रणाली तसेच नवीनतम तांत्रिक संसाधनांद्वारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर दिला आहे हे पाहून त्यांना आनंद झाला. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात दिव्यांगजनांना प्रोत्साहन देण्यासाठी समाजाने प्रयत्न केले पाहिजेत, असे त्या म्हणाल्या.
Matribhumi Samachar Marathi

