नवी दिल्ली 20 डिसेंबर 2025. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री मनोहर लाल यांनी आज मध्यप्रदेशात भोपाळ येथे स्वच्छ सर्वेक्षणाच्या 10 व्या आवृत्तीचे टूलकिट जारी केले.

स्वच्छतेचा नवा उपक्रम – हात पुढे करा , एकत्रितपणे स्वच्छता करा (स्वच्छता की नई पहल – बढ़ाएं हाथ, करें सफाई साथ) हे यावर्षीच्या स्वच्छ सर्वेक्षणाचे घोषवाक्य आहे. महानगरपालिका आयुक्त तसेच इतर राज्यांच्या प्रतिनिधींसह सर्व राज्ये आणि शहरी स्थानिक संस्थांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या कार्यक्रमात भाग घेतला.

गेली अनेक वर्षे, नागरिकांचे मत हे स्वच्छ सर्वेक्षणाच्या (एस एस) मूल्यांकनासाठी सशक्त साधन ठरले आहे. स्वच्छ सर्वेक्षण ने सातत्याने नागरिकांचे सामर्थ्य, दृष्टीकोन आणि स्वच्छतेतील सहभाग, विशेषतः दृश्यमान साफसफाई यांचे दर्शन घडवले आहे. या उपक्रमाचा आवाका आणखी वाढवत, नागरिकांच्या मतांना अधिक ताकद तसेच वजन मिळेल अशा पद्धतीने 2025–26 मधील टूलकिटची रचना करण्यात आली आहे.

यावर्षीपासून, नागरिकांना, वोट फॉर माय सिटी अॅप तसेच पोर्टल, मायगव्ह अॅप, स्वच्छता अॅप आणि द्रुतप्रतिसाद संकेतांसह विविध मंचाच्या माध्यमातून वर्षभर त्यांचा अभिप्राय सामायिक करता येईल. यावर्षी नागरिकांतर्फे होणाऱ्या प्रमाणीकरणाचे महत्त्व लक्षणीयरित्या वाढवण्यात आले आहे.

स्वच्छ सर्वेक्षणातील शहरी स्वच्छता आराखड्याचा भाग म्हणून गंगेच्या तीरावरील शहरांचे मूल्यमापन करण्यात येत आहे. याचा आवाका वाढवत आता या मूल्यमापनात देशभरातील नदीकाठच्या नगरांचा देखील समावेश करण्यात आला आहे. देशाच्या किनारपट्टीवरील भागांना स्वच्छ सर्वेक्षणाच्या कक्षेत सामावून घेण्यासाठी एक स्वतंत्र भाग सुरु करण्यात आला आहे.

एमओएचयुएने स्वच्छ भारत अभियान-शहरी (एसबीएम-यु)- स्वच्छ शहर जोडी (एसएसजे) अंतर्गत सप्टेंबर 2025 मध्ये शहरी कचरा व्यवस्थापन मार्गदर्शक कार्यक्रमासाठी सर्वात मोठा कालबद्ध आणि संरचित मार्गदर्शन आराखडा लागू केला. 72 मार्गदर्शक आणि मार्गदर्शन प्राप्तकर्ती 200 शहरे यांनी ज्ञानाचे हस्तांतरण, सोबत्यांसह अध्ययन आणि सर्वोत्तम पद्धतींच्या प्रतिकृती करणे यांना प्रोत्साहन देण्यासाठी सामंजस्य करार केले. मार्गदर्शन आणि सोबत्यांसह अध्ययन यांना बळकटी देण्याच्या उद्देशाने स्वच्छ शहरांच्या जोडीचा सन्मान करण्यासाठी पारितोषिकांची नवी श्रेणी सुरु करण्यात आली असून जोडीतील शहरांना मिळालेल्या गुणांच्या आधारावर प्रत्येक लोकसंख्या विभागातील शहरांच्या जोडीचा गौरव करण्यात येणार आहे.

हे टूलकिट जारी केल्यानंतर, येत्या फेब्रुवारीच्या मध्यापासून मार्च 2026 पर्यंत क्षेत्र मूल्यांकनाला सुरुवात होईल. फेब्रुवारी 2026 च्या मध्यापासून कचरामुक्त शहरे (जीएफसी) आणि हागणदारीमुक्त (ओडीएफ) शहरांसाठी प्रमाणीकरणविषयक मूल्यांकन सुरु करण्यात येईल.
Matribhumi Samachar Marathi

