केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी, केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा यांच्यासह, आज कर्नाटकच्या विजयनगर जिल्ह्यातील हम्पी येथे अर्थ मंत्रालय आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या ‘चिंतन शिविरा’चे अध्यक्षपद भूषवले.

या प्रसंगी अर्थ मंत्रालय आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाचे सर्व सचिव, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (CBDT) आणि केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ (CBIC) चे अध्यक्ष, तसेच भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार यांच्यासह दोन्ही मंत्रालयांचे आणि संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
“कृत्रिम बुद्धिमत्ता, व्यवसाय-सुलभता आणि विकसित भारतासाठी वित्तपुरवठा” या विषयावरील सत्रात व्यवसाय-सुलभता वाढण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, तंत्रज्ञान-सक्षम प्रणाली आणि प्रक्रियेतील सुधारणांच्या वापराद्वारे संस्थात्मक क्षमता आणि धोरणनिर्मिती मजबूत करण्यावर चर्चा केंद्रित करण्यात आली.

या चिंतन शिबिरातील चर्चेमध्ये प्रक्रियेचे सुलभीकरण, नियामक सुसंगतता, आंतर-विभागीय समन्वय, कार्यक्षम निधी प्रवाह, भविष्यासाठी सज्ज असलेली कर प्रशासन यंत्रणा, शाश्वत विकासासाठी वित्तपुरवठ्याचे मार्ग आणि पारदर्शकता, कार्यक्षमता आणि उत्तरदायित्वासाठी डिजिटल साधनांचा लाभ घेणे यांसारख्या विषयांचा समावेश होता.

आपल्या भाषणात अर्थमंत्री सीतारामन यांनी विजयनगर प्रदेशाच्या ऐतिहासिक महत्त्वावर प्रकाश टाकला. त्यांनी नमूद केले की, अवघ्या पाचशे वर्षांपूर्वी शिखरावर असलेल्या भारतीय साम्राज्याचे हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे, त्याच्या खुणा उपखंडातील मोठ्या भागात आजही दिसून येतात.
त्यांनी याच जिल्ह्यात एका बाजूला भव्य स्मारके आहेत, तर दुसरीकडे कमी कृषी उत्पादकता आणि मानव-प्राणी संघर्षाचा सामना करणारा दुष्काळग्रस्त भाग आहे, या विरोधाभासाकडेही लक्ष वेधले. सद्यस्थितीत विकासाच्या वास्तवाचे भान ठेवून काम करण्याची गरज त्यांनी यावेळी अधोरेखित केली.

Matribhumi Samachar Marathi

