मुंबई , 21 जानेवारी 2025
मुंबईतील नेहरू विज्ञान केंद्रातर्फे रोटरी क्लब ऑफ बॉम्बे पियर आणि रोटरी क्लब ऑफ बॉम्बे क्वीन सिटी यांच्या सहयोगाने वार्षिक आंतर शालेय विज्ञान प्रश्नमंजुषा 2024-25 आयोजित करण्यात आली होती. भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद (एनसीएसएम) च्या महत्वाकांक्षी उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी जिज्ञासा निर्माण करण्यासह तर्कशुद्ध विचार करण्याचे कसब निर्माण करण्याच्या उद्देशाने मागील 25 वर्षांपासून ही स्पर्धा घेतली जाते.

या स्पर्धेची सुरुवात 28 सप्टेंबर 2024 रोजी प्राथमिक लेखी प्रश्नमंजुषेने झाली, ज्यामध्ये मिडल आणि हायस्कूल श्रेणीतील 138 शाळांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. रोटरी इंटरनॅशनलचे डिस्ट्रिक्ट 3141 चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर चेतन देसाई, यांच्या प्रेरणादायी प्रास्ताविकाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मूल्यमापनाच्या फेऱ्यांनंतर, स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी, उपांत्य आणि अंतिम फेरी पार पडली.

मिडल शालेय गटाने ज्ञान आणि सांघिक कार्याचे प्रभावशाली दर्शन घडवले. 16 जानेवारी 2025 रोजी झालेल्या या अंतिम फेरीत ठाणे येथील सुलोचना देवी सिंघानिया शाळा विजेती ठरली तर माहीम येथील बॉम्बे स्कॉटिश शाळा उपविजेती ठरली. हायस्कूल गटासाठीची अंतिम फेरी 25 जानेवारी, 2025 रोजी होईल, त्यानंतर सांगता समारंभ आणि पारितोषिक वितरण समारंभ होईल, या कार्यक्रमात दोन्ही श्रेणीतील विजेते आणि उपविजेत्यांना सन्मानित केले जाईल.

सहभाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी केलेल्या अद्वितीय कामगिरीबद्दल नेहरू विज्ञान केंद्र आणि रोटरी क्लब यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले असून आता माध्यमिक गटाची कामगिरी साजरी करण्यासाठी उत्सुक असल्याचे म्हटले आहे.
Matribhumi Samachar Marathi

