नवी दिल्ली , 21 जानेवारी 2025. पराक्रम दिवस 2025 निमित्त, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे जन्मस्थान असलेल्या कटक या ऐतिहासिक शहरातील बाराबती किल्ल्यावर 23 जानेवारी ते 25 जानेवारी 2025 या कालावधीत एक भव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे. नेताजींच्या 128व्या जयंतीनिमित्त होणाऱ्या या वैविध्यपूर्ण सोहळ्यात त्यांच्या वारशाचा गौरव केला जाईल. 23 ते 25 जानेवारी, 2025 दरम्यान होणाऱ्या या तीन दिवसीय कार्यक्रमाचे उद्घाटन 23 जानेवारी रोजी ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांच्या हस्ते होणार आहे.
दरवर्षी साजरा केल्या जाणाऱ्या पराक्रम दिनाची परंपरा पुढे कायम राखत सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने या वर्षी नेताजींचे जन्मस्थान असलेल्या आणि त्यांच्या बालपणीच्या काळाला आकार देणाऱ्या कटक या शहरात हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाच्या आरंभी ओडिशाचे मुख्यमंत्री आणि इतर मान्यवर नेताजींना श्रद्धांजली अर्पण करतील तसेच नेताजींचा जन्म झालेल्या आणि आता संग्रहालयात रूपांतर करण्यात आलेल्या, घरावर राष्ट्रध्वज फडकवण्यात येईल.
त्यानंतर, बाराबती किल्ल्यावरील पराक्रम दिवस सोहळ्याची सुरुवात पंतप्रधानांच्या व्हिडिओ संदेशाने होईल आणि त्यात नेताजींच्या जीवनावर केंद्रित पुस्तक, छायाचित्र संग्रह प्रदर्शन, दुर्मिळ छायाचित्रे, पत्रे आणि दस्तऐवज तसेच AR/VR डिस्प्ले क्रॉनिकल यांच्या आधारे नेताजींचा उल्लेखनीय जीवनप्रवास उलगडला जाईल. याशिवाय यानिमित्ताने एक शिल्पकला कार्यशाळा आणि चित्रकला स्पर्धा आणि कार्यशाळा देखील होणार आहे. या कार्यक्रमात नेताजींच्या वारशाचा गौरव करणारे आणि ओडिशाच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडवणारे सांस्कृतिक कार्यक्रमही सादर केले जातील. याशिवाय नेताजींच्या जीवनावरील चित्रपटही या कार्यक्रमात दाखवण्यात येणार आहेत.
Matribhumi Samachar Marathi

