नवी दिल्ली , 21 नोव्हेंबर 2025. माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी आज (21 नोव्हेंबर 2025) सिकंदराबाद येथील राष्ट्रपती निलयम येथे भारतीय कला महोत्सवाच्या दुसऱ्या आवृत्तीचे उद्घाटन केले.
सांस्कृतिक मंत्रालय, वस्त्रोद्योग मंत्रालय आणि पर्यटन मंत्रालयाच्या सहकार्याने नऊ दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचे आयोजन राष्ट्रपती निलयममार्फत करण्यात येत आहे. गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, गोवा, दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव यांचा समृद्ध आणि वैविध्यपूर्ण सांस्कृतिक वारसा सादर करण्याचा या महोत्सवाचा उद्देश आहे.
उद्घाटन समारंभात बोलताना राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू म्हणाल्या की, भारतीय कला महोत्सवाच्या पहिल्या आवृत्तीत लोकांना ईशान्य भारतातील समृद्ध सांस्कृतिक वारशाची ओळख करून देण्यात आली. यावेळी, आपल्याला पश्चिम भारतातील समृद्ध सांस्कृतिक वारसा पाहण्याची आणि समजून घेण्याची संधी मिळाली आहे. या महोत्सवात पर्यटकांना गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, गोवा, दमण आणि दीव आणि दादरा आणि नगर हवेली येथील हस्तकला, नृत्य, संगीत, साहित्य आणि पाककृतींद्वारे भारताच्या पश्चिमेकडील लोकसंस्कृतीची झलक पाहता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की, भारत सरकार लोकांना, विशेषतः आपल्या तरुणांना आपल्या सांस्कृतिक वारशासोबत जोडण्यासाठी अनेक पावले उचलत आहे. भारतीय कला महोत्सवासारखे कार्यक्रम वेगवेगळ्या प्रदेशात राहणाऱ्या नागरिकांना एकमेकांना समजून घेण्यास मदत करतात आणि ही समज आपला दृष्टिकोन व्यापक करते, असे त्यांनी सांगितले. शिवाय, अशा कार्यक्रमांमुळे आपल्या सांस्कृतिक वारशाबद्दल आदर निर्माण होतो आणि तो जपण्याची प्रेरणा मिळते, असे त्या म्हणाल्या. मोठ्या संख्येने लोक भारतीय कला महोत्सवाला उपस्थित राहतील आणि उत्सवाचा आनंद घेतील असा विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला.
या कार्यक्रमप्रसंगी तेलंगणाचे राज्यपाल श्री जिष्णू देव वर्मा, केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री श्री गजेंद्र सिंह शेखावत, केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री श्री जी. किशन रेड्डी, राजस्थानचे राज्यपाल श्री हरिभाऊ बागडे, गोव्याचे राज्यपाल श्री पुसापती अशोक गजपती राजू, तेलंगण सरकारच्या पंचायती राज आणि ग्रामीण विकास आणि महिला आणि बाल कल्याण मंत्री श्रीमती डी. अनुसूया सीताक्का आणि गुजरात सरकारचे आदिवासी विकास, खादी, कुटीर आणि ग्रामीण उद्योग मंत्री श्री नरेश मगनभाई पटेल हे उपस्थित होते.
भारतीय कला महोत्सव 22 ते 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत सकाळी 10.00 ते रात्री 08.00 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुला असून यामध्ये प्रवेश मोफत आहे. इच्छुक https://visit.rashtrapatibhavan.gov.in/plan-visit/rashtrapati-nilayam-hyderabad/p2/p2 या लिंकवर क्लिक करून नोंदणी करू शकतात. वॉक-इन अभ्यागतांसाठी प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी (ऑन-द-स्पॉट) नोंदणीची सुविधा देखील उपलब्ध आहे.
Matribhumi Samachar Marathi

