नवी दिल्ली , 22 जानेवारी 2025. पराक्रम दिवसाच्या निमित्ताने, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीचे स्मरण म्हणून केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा निखिल खडसे 23 जानेवारी 2025 रोजी अंदमान आणि निकोबार बेटांमधील पोर्ट ब्लेअर येथे ‘जय हिंद पदयात्रा’ करणार आहेत. हा उपक्रम नेताजींच्या अतुलनीय योगदानाला आणि त्यांच्या शौर्याला अभिवादन करण्यासाठी आयोजित करण्यात आला आहे. यात 1500 हून अधिक माय भारत (मेरा युवा भारत) युवा स्वयंसेवक आणि युवा नेते सहभागी होणार आहेत.
ही पदयात्रा अंदाजे 5 किलोमीटरचा मार्ग व्यापत, फ्लॅग पॉइंट येथून सुरू होऊन नेताजी स्टेडियम येथे समाप्त होईल. हा मार्ग भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील बलिदानांचे प्रतीक आहे. यावेळी नेताजींच्या योगदानाचा सन्मान करणारे आणि स्वतंत्र व प्रगतिशील भारताविषयी त्यांच्या दृष्टिकोनाबाबत जागृती करणारे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
पोर्ट ब्लेअरमधील ‘जय हिंद’ पदयात्रा संविधानाच्या 75 वर्षांच्या स्मरणार्थ आणि भारताच्या सांस्कृतिक विविधतेचा उत्सव साजरा करण्यासाठी नियोजित 24 कार्यक्रमांपैकी पाचवी आहे. या उत्सवाचा भाग म्हणून माय भारत स्वयंसेवक दर महिन्याला देशभरात अशा दोन पदयात्रा आयोजित करत आहेत. यामध्ये तरुणांमध्ये देशभक्तीची भावना निर्माण करणे आणि भारताच्या समृद्ध वारशाशी त्यांना जोडणे हे उद्दिष्ट आहे.
भारतभरातील तरुणांना मंत्रालयामार्फत आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी माय भारत पोर्टल (www.mybharat.gov.in) वर नोंदणी करून या गौरवपूर्ण पदयात्रेत सहभागी व्हावे. नेताजींच्या वारशाचा सन्मान करण्यासाठी आणि एकात्म व आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा.
Matribhumi Samachar Marathi

