Thursday, January 01 2026 | 10:20:05 PM
Breaking News

नवी दिल्ली येथील सोल लीडरशिप परिषदेत केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी नेतृत्वाची महत्त्वाची मूल्ये केली अधोरेखित

Connect us on:

प्रभावी नेतृत्व, स्वयंशिस्त आणि वैयक्तिक विकासासंदर्भातील महत्त्वाच्या घटकांवर लक्ष केंद्रित करत केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज सोल लीडरशिप परिषदेत अभ्यासपूर्ण भाषण केले. केंद्रीय मंत्र्यांनी त्यांच्या भाषणात अधिक उत्तम कार्य करण्याप्रती कटिबद्ध असलेले नेते घडवण्यासाठी निरंतर अभ्यास, वैयक्तिक वर्तणूक आणि तात्विक विचार मंथनाचे महत्त्व ठळकपणे नमूद केले.

निरंतर अभ्यास : सर्वोत्तम नेतृत्वाचा आधारस्तंभ

सर्वोत्तम नेतृत्वाची जोपासना करण्याची मोहीम हाती घेतल्याबद्दल केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी सोल संस्थेचे अभिनंदन केले. प्रसिद्धी तसेच सन्मान मिळाल्यानंतर देखील अध्ययन आणि स्वयंसुधारणा करण्याप्रती समर्पित राहिलेल्या गुरुंसोबत काम करण्याचा अनुभव त्यांनी यावेळी सामायिक केला. नेतृत्व म्हणजे केवळ मानाचे स्थान मिळवणे नसून आयुष्यभर सातत्याने शिकत राहून, उत्क्रांत होऊन उत्कृष्टता मिळवण्यासाठी प्रयत्न करत राहणे आहे, असे त्यांनी आवर्जून सांगितले.

वैयक्तिक वर्तणूक आणि शिस्त: नेतृत्वासाठी मजबूत पायाची उभारणी

नेतृत्वगुण हे प्रत्येकाची वैयक्तिक वर्तणूक आणि शिस्त यांच्याशी सखोलपणे जोडलेले आहे यावर त्यांनी अधिक भर दिला. गीता आणि पतंजलीचे योगसूत्र यांसह भारताच्या प्राचीन तत्वज्ञानांपासून प्रेरणा घेत केंद्रीय मंत्री यादव यांनी स्पष्ट केले की खरी शिस्त बाह्य प्रक्रियांच्या पलीकडे जाऊन आत्मा, शरीर आणि समाज यांच्यात समतोल निर्माण करण्यावर लक्ष एकाग्र करते. शिस्त हा केवळ नियम पालनाचा विषय नसून एखाद्याच्या आंतरिक मूल्यांना त्यांच्या बाह्य कृतींशी जुळवून घेणे आहे, यावर त्यांनी भर दिला.

आत्मसंयम आणि सातत्यपूर्ण सरावाची शक्ती

यादव यांनी अधोरेखित केले की आजच्या वेगवान आणि माहितीने परिपूर्ण जगात, बाह्य घटनांमुळे आणि विचारांच्या गोंधळामुळे विचलित होणे सहज शक्य आहे. मात्र खरा नेता तोच, जो स्वतःमध्ये आत्मसंयम आणि तटस्थतेचा विकास करून, रोजच्या गोंधळातही शांत आणि केंद्रित राहू शकतो.

तत्त्वज्ञान आणि नेतृत्व: योग व तटस्थतेची भूमिका

आपले विचार मांडताना, यादव यांनी योगसूत्रातील गूढ तत्त्वज्ञान स्पष्ट केले आणि अधोरेखित केले की नेतृत्व केवळ बाह्य उपलब्धींपुरते मर्यादित नसते, तर तो एक सखोल अंतर्गत प्रवास देखील असतो. त्यांनी आत्मचिंतन आणि आत्मसंवादाचे महत्त्व पटवून दिले, कारण खरे नेतृत्व म्हणजे स्वतःबरोबर तसेच भोवतालच्या जगाशी सखोल नाते निर्माण करणे होय.

नेतृत्वाचे आधारस्तंभ: मैत्री, करुणा आणि समाजासाठी योगदान

केंद्रीय मंत्र्यांनी नेतृत्वात मैत्री, करुणा आणि समाजासाठी योगदान देण्याच्या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी स्पष्ट केले की खरे नेतृत्व म्हणजे स्वतःच्या उन्नतीसाठी केवळ प्रयत्नशील राहणे नव्हे, तर इतरांनाही पुढे नेण्यासाठी सतत प्रयत्न करणे होय. “नेत्याने मैत्रीपूर्ण वृत्ती जोपासावी आणि करुणेचा अंगीकार करावा,” असे ते म्हणाले. “जो कोणी संकटात आहे, त्याच्याप्रती सहानुभूती बाळगावी आणि आपल्या अपेक्षांबाबत नेहमी सजग राहावे.”

शाश्वत नेतृत्वाचा मार्ग

भूपेंद्र यादव यांनी आपल्या भाषणाचा समारोप करताना सांगितले की नेतृत्व हा एक सातत्यपूर्ण वाढ आणि परिवर्तनाचा प्रवास आहे. विशेषतः युवा पिढीला उद्देशून त्यांनी आवाहन केले की शिस्त, तत्त्वज्ञानाची सखोल समज आणि आत्मसंयम ही त्यांच्या नेतृत्व प्रवासाची मुख्य तत्त्वे असावीत. त्यांनी ठामपणे अधोरेखित केले की नियमित सराव, सांसारिक मोहांपासून तटस्थता आणि व्यापक समाज कल्याणासाठी योगदान देण्याच्या वृत्तीमधूनच एक नेता खऱ्या अर्थाने परिपूर्ण नेतृत्व म्हणून घडू शकतो.

About Matribhumi Samachar

Check Also

शांती विधेयकाची मोदी सरकारच्या सर्वात मोठ्या विज्ञान सुधारणांपैकी एक म्हणून इतिहासात नोंद होईल – डॉ. जितेंद्र सिंह

नवी दिल्‍ली, 28 डिसेंबर 2025. शांती (एसएचएएनटीआय) विधेयकाची मोदी सरकारच्या विज्ञान क्षेत्रातील सर्वात मोठ्या सुधारणांपैकी एक …