कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) एप्रिल 2025 ची तात्पुरती वेतनपट आकडेवारी जाहीर केली असून, त्यात 19.14 लाख सदस्यांची भर पडली आहे. मार्च 2025 च्या तुलनेत ही आकडेवारी 31.31 टक्क्यांनी वाढ दर्शवते. वार्षिक म्हणजेच एप्रिल 2024 च्या तुलनेत निव्वळ वेतनपटात 1.17 टक्क्यांची वाढ झाली आहे. यामुळे रोजगार संधी वाढल्याचे आणि कर्मचाऱ्यांच्या लाभाविषयी जनजागृती झाल्याचे स्पष्ट होते, तसेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या प्रभावी जनजागृती मोहिमांचे हे यश आहे.
एप्रिल 2025 च्या ईपीएफओ वेतनपट आकडेवारीची मुख्य वैशिष्ट्ये :
नवीन सदस्य:
ईपीएफओ ने एप्रिल 2025 मध्ये सुमारे 8.49 लाख नवीन सदस्यांची नोंदणी केली असून, हे मार्च 2025 च्या तुलनेत 12.49 टक्क्यांनी अधिक आहेत. आकडेवारीतील ही वाढ वाढत्या रोजगार संधी, कर्मचाऱ्यांचे लाभ याबाबत जागरुकता आणि ईपीएफओ च्या यशस्वी जनजागृतीमुळे झाली आहे.
18-25 वयोगटातील तरुणांचा वेतनविषयक नोंदणीत सर्वाधिक सहभाग.
या आकडेवारीतील विशेष बाब म्हणजे एप्रिल 2025 मध्ये ईपीएफओने 18-25 वयोगटातील 4.89 लाख नवीन सदस्यांची नोंदणी केली. ते एकूण नवीन सदस्यांच्या 57.67 टक्के आहेत. मार्च 2025 च्या तुलनेत या वयोगटातील नवीन सदस्यांमध्ये 10. 05 टक्क्यांची वाढ झाली आहे. तसेच, 18-25 वयोगटासाठी एप्रिल 2025 मध्ये निव्वळ पेरोल भर सुमारे 7.58 लाख इतकी झाली असून, जी मार्च 2025 च्या तुलनेत 13.60 टक्क्यांनी वाढलेली आहे. यावरून असे दिसून येते की संघटित रोजगार क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या बहुतांश व्यक्ती या तरुण आणि प्रथमच नोकरी करणाऱ्या आहेत.
पुन्हा सहभागी झालेले सद्स्य.
कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटनातून बाहेर पडलेल्या 15.77 लाख जुन्या सदस्यांनी एप्रिल 2025 मध्ये पुन्हा आपला सहभाग नोंदवला असून, ही संख्या मार्च 2025 च्या तुलनेत 19.19 टक्क्यांनी आणि एप्रिल 2024 च्या तुलनेत 8.56 टक्क्यांनी वाढली आहे. या सदस्यांनी नोकरी बदलल्यानंतर कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटने अंतर्गत असलेल्या आस्थापनांमध्ये पुन्हा सहभाग घेत आपली रक्कम नवीन खात्यात हस्तांतरित करणे पसंत केले. त्यांच्या या निर्णयामुळे त्यांच्या दीर्घकालीन आर्थिक सुरक्षिततेला बळकटी मिळाली असून, सामाजिक सुरक्षेचे कवच अधिक मजबूत झाले आहे.
महिला सदस्यांमध्येही वाढ:
एप्रिल 2025 मध्ये सुमारे 2.45 लाख नव्या महिला सदस्यांनी ईपीएफओमध्ये नोंदणी केली आहे, मार्च 2025 च्या तुलनेत ही संख्या 17.63 टक्क्यांनी वाढली आहे. तसेच, एप्रिल 2025 मध्ये महिला सदस्यांची झालेली निव्वळ भर ही सुमारे 3.95 लाख इतकी असून, मार्च 2025 च्या तुलनेत ती 35.24 टक्क्यांनी अधिक आहे. महिला सदस्यांच्या संख्येत झालेल्या वाढीमुळे अधिक समावेशक आणि वैविध्यपूर्ण कार्यशक्ती घडत असल्याचे स्पष्ट होते.
Matribhumi Samachar Marathi

