उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज मध्य प्रदेशातील इंदूर येथे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यात सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे आयोजन अटल फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले होते.

तमिळ भाषेतील अभिजात ग्रंथ तिरुक्कुरलमधील एक दोहा उद्धृत करत उपराष्ट्रपती म्हणाले की, जन्माने सर्व मानव समान असले तरी महानता ही कर्मांमुळे प्राप्त होते. अटल बिहारी वाजपेयी हे साधे व्यक्तिमत्त्व नव्हते, तर स्वतःमध्येच एक ध्येय होते आणि ते आपल्या तत्त्वांप्रती व मूल्यांप्रती नेहमीच “अटल” राहिले, असे त्यांनी सांगितले. एक राजकारणी, प्रशासक, संसदीय नेते, कवी आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे एक महान माणूस म्हणून त्यांनी केलेल्या आदर्श कार्यासाठी अटल बिहारी वाजपेयी यांचे स्मरण व सन्मान केला जातो, असे उपराष्ट्रपतींनी नमूद केले.

उपराष्ट्रपती म्हणाले की वाजपेयी यांचा संवाद, सर्वसमावेशक विकास तसेच मजबूत पण मानवी दृष्टिकोन असलेल्या प्रशासनावर दृढ विश्वास होता. त्यांनी सार्वजनिक चर्चेला सुसंस्कृतपणा आणि सौजन्याची उंची दिली आणि राजकारण हे तत्त्वनिष्ठ व करुणामय असू शकते, हे दाखवून दिले. याच कारणामुळे वाजपेयी यांचा जन्मदिन सुशासन दिन म्हणून साजरा केला जातो, असे त्यांनी सांगितले.
उपराष्ट्रपतींनी वाजपेयी यांचा तमिळनाडूशी असलेला सखोल संबंधही आठवला. भाषिक वैविध्य, सांस्कृतिक बहुविधता आणि संवादाबाबत असलेल्या त्यांच्या आदरामुळे त्यांना राजकीय व वैचारिक सीमांच्या पलीकडे जाऊन प्रशंसा मिळाली, असे त्यांनी नमूद केले.
प्रामाणिकपणा, बुद्धिमत्ता आणि लोकशाही मूल्यांप्रती असलेल्या अढळ निष्ठेच्या जोरावर आधुनिक भारत घडवणारे एक महान व्यक्तिमत्त्व म्हणून अटल बिहारी वाजपेयी यांचे वर्णन करत उपराष्ट्रपती म्हणाले की त्यांचे जीवन देशाला स्मरण करून देते की नेतृत्व म्हणजे केवळ अधिकार नव्हे, तर सेवा, जबाबदारी आणि जनतेप्रती असलेली निष्ठा होय.

उपराष्ट्रपतींनी डेली महाविद्यालयाच्या परिसरात देवी अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरणही केले.

Matribhumi Samachar Marathi

