Tuesday, February 24 2026 | 08:52:52 AM
Breaking News

एअर इंडिया विमान कनिष्क बॉम्बस्फोटाच्या घटनेला 40 वर्षे पूर्ण झाली असून आयर्लंड आणि कॅनडासह भारताने केले या घटनेचे स्मरण

Connect us on:

नवी दिल्‍ली, 23 जून 2025. आयर्लंडमधील कॉर्क येथील अहाकिस्ता येथे एअर इंडिया विमान 182  (कनिष्क) बॉम्बस्फोटाच्या घटनेला 40 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला दहशतवादाविरुद्ध एकत्र येण्याचे आवाहन केले. “जगाने एकत्र येण्याची गरज आहे – केवळ अशा गंभीर शोक प्रसंगी नव्हे तर दहशतवादाचा सामना करण्यासाठी सामूहिक, सक्रिय प्रयत्नांमध्ये देखील एकत्र येण्याची गरज आहे ,” असे ते म्हणाले.

कॅनडास्थित दहशतवाद्यांनी ठेवलेल्या  बॉम्बमुळे 23, जून 1985 रोजी एअर इंडिया  विमान 182  चा हवेतच स्फोट झाला होता , ज्यात 80 हून अधिक मुलांसह विमानातील सर्व 329  जण मृत्युमुखी पडले होते, त्या दुर्घटनेची आठवण करून देत पुरी म्हणाले की, ही दुर्घटना अपघात नव्हती तर “भारताचे विभाजन करण्याचा  प्रयत्न करणाऱ्या काही घटकांनी जाणूनबुजून केलेले हे  घृणास्पद कृत्य होते.”

दहशतवाद आणि उग्रवाद या  भूतकाळातील समस्या  नाहीत तर आताच्या काळातील धोके आहेत जे जगभरातील निष्पाप लोकांचे जीव धोक्यात टाकत आहेत यावर मंत्र्यांनी भर दिला. “भारत अनेक दशकांपासून दहशतवादाचे संकट झेलत आहे – जम्मू आणि काश्मीरपासून ते पंजाबपर्यंत आणि मुंबईपर्यंत. वेळोवेळी, आपल्या लोकांनी बॉम्बस्फोट, हत्या सहन केले आहे,” असे ते म्हणाले. जगभरातील देश या समस्येशी झुंजत आहेत हे नमूद करत  त्यांनी 2024 मध्ये जागतिक दहशतवादाशी संबंधित मृत्यूंमध्ये 22 टक्क्यांनी वाढ झाल्याचे अधोरेखित केले.

या सामायिक धोक्याचा सामना करण्यासाठी भारताला साथ देण्याचे कॅनडा सरकारला आवाहन करताना पुरी म्हणाले: “कॅनडा हा एक महत्वाचा  भागीदार आणि मित्र आहे. आमचे एकमेकांशी चैतन्यपूर्ण सांस्कृतिक आणि आर्थिक संबंध आहेत. भारत आणि कॅनडा लोकशाही परंपरांनी बांधलेले आहेत.”

भाषण संपवताना केंद्रीय मंत्र्यांनी जागतिक शांतता आणि सुरक्षिततेसाठी प्रयत्न करून पीडितांच्या  स्मृतीचा सन्मान करण्याच्या भारताच्या अढळ संकल्पाचा पुनरुच्चार केला. “आजचा स्मरणोत्सव एक संयुक्त संदेश असायला हवा  – जे द्वेष आणि दहशत पसरवतात ते  कधीही मानवता, लोकशाही आणि मैत्रीवर वर्चस्व मिळवू शकणार नाहीत.”

या कार्यक्रमाला  आयर्लंडचे पंतप्रधान मायकेल मार्टिन, कॅनडाचे सार्वजनिक सुरक्षा मंत्री गॅरी आनंदसांगरी, स्थानिक आयर्लंड अधिकारी,  तसेच  पीडितांचे  कुटुंबीय उपस्थित होते. सर्वांनी  यावेळी श्रद्धांजली अर्पण केली.

About Matribhumi Samachar

Check Also

1 जानेवारी 2026 पासून भारत स्विकारणार ‘किंबर्ले प्रोसेस’ या यंत्रणेचे प्रतिष्ठित अध्यक्षपद

नवी दिल्‍ली, 25 डिसेंबर 2025. ‘किंबर्ले प्रोसेस’ च्या (KP – जगभरातील कच्च्या हिऱ्यांचा व्यापार सुरक्षित व …