पंतप्रधानांनी आज “सर्वांसाठी न्याय्य आणि योग्य भविष्य – महत्त्वपूर्ण खनिजे; सन्मानजनक रोजगार; कृत्रिम बुद्धिमत्ता” या विषयावरील जी20 शिखर परिषदेच्या तिसऱ्या सत्राला संबोधित केले. महत्त्वपूर्ण तंत्रज्ञानाचा ज्या प्रकारे प्रसार केला जातो, त्यामध्ये मूलभूत बदल करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले. त्यांनी नमूद केले की, असे तंत्रज्ञान ‘वित्त-केंद्रित’ ऐवजी ‘मानव-केंद्रित’, ‘राष्ट्रीय’ ऐवजी ‘जागतिक’ आणि ‘बंदिस्त प्रारुपां’ ऐवजी ‘मुक्त स्त्रोत’ प्रणालीवर आधारित असले पाहिजे. हा दृष्टिकोन भारताच्या तंत्रज्ञान परिसंस्थेत समाविष्ट केला गेला आहे आणि त्याचे महत्त्वपूर्ण फायदे झाले आहेत, मग ते अंतराळ तंत्रज्ञानाचा वापर असो, कृत्रिम बुद्धिमत्ता असो किंवा डिजिटल व्यवहार असो, जिथे भारत जागतिक नेता आहे, असे त्यांनी सांगितले.
कृत्रिम बुद्धिमत्तेवर बोलताना, पंतप्रधानांनी समान प्रवेश, लोकसंख्येच्या स्तरावर कौशल्य आणि जबाबदार उपयोगावर आधारित भारताचा दृष्टिकोन मांडला. त्यांनी नमूद केले की, ‘इंडिया-एआय मिशन’ अंतर्गत, देशातील प्रत्येकापर्यंत कृत्रिम बुद्धिमत्तेचे फायदे पोहोचावेत या उद्देशाने प्रवेशयोग्य आणि उच्च-क्षमता असलेली संगणकीय व्यवस्था निर्माण केली जात आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग जागतिक हितासाठी झाला पाहिजे हे अधोरेखित करत, पंतप्रधानांनी पारदर्शकता, मानवी देखरेख, रचनेद्वारे सुरक्षा आणि गैरवापर रोखणे या तत्त्वांवर आधारित जागतिक कराराचे आवाहन केले. कृत्रिम बुद्धिमत्तेने मानवी क्षमतांचा विस्तार केला पाहिजे, तरीही अंतिम निर्णय मानवानेच घेतला पाहिजे या मुद्द्यावर त्यांनी भर दिला. पंतप्रधानांनी सांगितले की, भारत येत्या फेब्रुवारी मध्ये ‘सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय’ या संकल्पनेवर आधारित ‘एआय प्रभाव परिषद’ आयोजित करणार आहे आणि त्यांनी सर्व जी20 देशांना या प्रयत्नात सहभागी होण्याचे आमंत्रण दिले.
पंतप्रधानांनी यावर भर दिला की, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात, आपला दृष्टिकोन ‘आजच्या नोकऱ्या’ यावरून ‘उद्याच्या क्षमतां’कडे वेगाने बदलण्याची गरज आहे. नवी दिल्ली जी20 शिखर परिषदेत ‘प्रतिभेची गतिशीलता’ म्हणजेच कुशल मनुष्यबळाच्या स्थानांतरामुळे झालेल्या प्रगतीची आठवण करून देत, त्यांनी प्रस्ताव दिला की समूहाने आगामी वर्षांमध्ये प्रतिभा गतिशीलतेसाठी जागतिक आराखडा विकसित केला पाहिजे.
जागतिक कल्याणासाठी भारताचा संदेश आणि वचनबद्धता व्यक्त करून पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप केला – की भारत अशा विकासाच्या बाजूने आहे जो शाश्वत आहे, असा व्यापार जो विश्वासार्ह आहे, असे वित्त जे न्याय्य आहे आणि अशी प्रगती ज्यामध्ये प्रत्येकाची भरभराट होईल. पंतप्रधानांचे पूर्ण भाषण [इथे] पाहता येईल.
Matribhumi Samachar Marathi

