मुंबई, 23 डिसेंबर 2025. द नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट (एनजीएमए), मुंबईने आज एनजीएमए मुंबई येथे प्रसिद्ध संशोधक आणि कला इतिहासकार संदीप दहिसरकर यांनी लिहिलेले “राव बहादूर एम. व्ही. धुरंधर: अ पेंटर फ्रॉम द बॉम्बे स्कूल ऑफ आर्ट” हे महत्त्वपूर्ण पुस्तक प्रकाशित केले.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र सरकारचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, डॉ. फिरोजा जे. गोदरेज आणि प्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामत यांच्यासह कला क्षेत्रातील वरिष्ठ सदस्य, संशोधक, विद्वान आणि विद्यार्थी उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना, एनजीएमए मुंबईच्या संचालिका निधी चौधरी म्हणाल्या की, या पुस्तकाने बॉम्बे स्कूल ऑफ आर्टच्या अध्ययनात महत्त्वाचे योगदान दिले आहे आणि राव बहादूर एम. व्ही. धुरंधर यांची त्या काळातील एक महत्त्वाचा कलात्मक आणि सांस्कृतिक सेतू म्हणून असलेली भूमिका अधोरेखित केली आहे. हे पुस्तक प्रकाशित करण्याचा सन्मान एनजीएमए मुंबईला मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. फिरोजा जे. गोदरेज यांनी या पुस्तकाचे वर्णन करताना म्हटले की हे पुस्तक म्हणजे एक महत्वपूर्ण आणि उत्तमरित्या संशोधन केलेले काम आहे, ज्यामध्ये धुरंधर यांच्या कलाकृती, नव्याने सापडलेल्या कलाकृती आणि त्यांच्या जीवनातील प्रमुख पैलू अभिलेखीय साहित्यासह सादर केले आहेत, ज्यामुळे ते भारतीय कला इतिहासात एक महत्त्वाचे योगदान बनले आहे.
चित्रकार वासुदेव कामत म्हणाले की, या पुस्तकातून धुरंधर यांच्या वैविध्यपूर्ण कलात्मक योगदानाचे कमी ज्ञात पैलू समोर आले आहेत. त्यांनी नमूद केले की लेखकाने यापूर्वीच्या संशोधनाची पुनरावृत्ती टाळली आहे आणि कलाकाराची अद्वितीय आणि असाधारण कामगिरी यशस्वीरित्या अधोरेखित केली आहे, ज्यामुळे कलाप्रेमी आणि विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक वाचनीय बनले आहे.
डॉ. सदानंद मोरे यांनी नमूद केले की, या पुस्तकात धुरंधर यांच्या जीवनाची आणि त्यांच्या काळाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या कार्याची व्यापक आणि अंतर्दृष्टीपूर्ण माहिती वाचायला मिळते. कार्यक्रमाच्या अखेरीस या पुस्तकाची आणि भारतीय कला इतिहासातील योगदानाची कलाकार, विद्वान, विद्यार्थी आणि संशोधकांनी व्यापक प्रशंसा केली.
Matribhumi Samachar Marathi

