नवी दिल्ली, 23 डिसेंबर 2025. केंद्रीय दळणवळण आणि ग्रामीण विकास राज्यमंत्री डॉ. पेम्मासानी चंद्र शेखर यांनी इंडिया पोस्टला व्यवसाय वाढीसाठी सक्रिय आणि धोरणात्मक दृष्टिकोन अवलंबण्याचे निर्देश दिले आहेत, ज्यामध्ये जीएसटीत प्रमुख योगदान देणाऱ्या व्यवसाय आणि संस्थांपर्यंत पोहोचणे समाविष्ट आहे. त्यांनी प्रत्येक परिमंडळात लीड्स, रूपांतरणे आणि महसूलाचे दररोज निरीक्षण करण्यासाठी समर्पित विपणन कार्यकारी चमू स्थापन करण्याचे समर्थन केले आणि परिमंडळ प्रमुखांना स्थानिक भौगोलिक स्थिती, तेथील उद्योग आणि व्यावसायिक क्षमतेनुसार प्रादेशिक सामर्थ्याचा लाभ घेऊन सानुकूलित वाढीच्या धोरणांची अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले.

प्रमुख पोस्टल सर्कलच्या कामगिरीचा बारकाईने मागोवा घेण्यासाठी राज्यमंत्री दरमहा आढावा बैठका घेत आहेत. दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी घालून दिलेल्या तिमाही देखरेख व्यवस्थेचा भाग असलेल्या या बैठका दर महिन्याला डॉ. चंद्र शेखर यांच्या नेतृत्वाखाली घेतल्या जातात जेणेकरून वरचेवर देखरेख ठेवता येईल. समस्या लवकर ओळखणे, जलद गतीने सुधारणा करणे आणि इंडिया पोस्ट सातत्याने त्यांची सेवा आणि कामगिरीची उद्दिष्टे पूर्ण करत आहे याची खातरजमा करणे हा यामागचा उद्देश आहे.

सर्व 24 पोस्टल सर्कल संदर्भात चर्चा करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या दृष्टिकोनाशी सुसंगत असलेल्या परिचालन कार्यक्षमता, आर्थिक समावेशकता, लॉजिस्टिक्स विस्तार आणि तंत्रज्ञान-संचालित सुधारणांवर लक्ष केंद्रित केले गेले. इंडिया पोस्टचे अतुलनीय जाळे अधोरेखित करत राज्यमंत्र्यांनी देशाच्या लॉजिस्टिक्स गरजांना पूरक, वितरण सेवा मजबूत करण्यासाठी आणि बचत आणि विमा व्याप्ती वाढविण्यासाठी संसाधनांचा योग्य वापर करण्याचे आवाहन केले. मेल आणि पार्सल ऑपरेशन्स, बचत आणि विमा संबंधी सर्व कामगिरी मापदंड, जन कल्याण आणि आर्थिक तारतम्य यात संतुलन राखणारी असावी असे निर्देशही त्यांनी दिले.

डॉ. पेम्मासानी यांनी पुनरुच्चार केला की पोस्टल नेटवर्कद्वारे 1.4 अब्जाहून अधिक नागरिकांना सेवा पुरवणे ही एक जबाबदारी आणि संधी दोन्ही आहे. कार्यक्षम सेवा, डिजिटल अखंडता आणि आर्थिक तारतम्य हे इंडिया पोस्टला एक स्वयंपूर्ण, भविष्यासाठी सज्ज संस्था बनवण्याच्या केंद्रस्थानी आहे यावर त्यांनी भर दिला.
Matribhumi Samachar Marathi

