मुंबई, 24 डिसेंबर 2025. एनसीसी संचालनालय महाराष्ट्र ने आज पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाडा येथून ‘शौर्य के कदम , क्रांती की ओर ‘ या पुणे ते दिल्ली सायकल मोहिमेला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. हा कार्यक्रम व्यापक सोहळ्याचा एक भाग आहे, ज्याचा समारोप 27 जानेवारी 2026 रोजी पंतप्रधान दिल्ली येथे मोहीम पथकाला हिरवा झेंडा दाखवून करतील.
पुण्यापासून दिल्लीपर्यंत विजयी मोहिमेचे नेतृत्व करणारे आणि मुघल, पोर्तुगाल आणि निजामाविरोधात 41 लढाया जिंकणारे महान मराठा योद्धा जनरल पेशवा बाजीराव प्रथम यांच्या प्रेरणेने ही 1680 किमीची मोहीम याच ऐतिहासिक मार्गाचे अनुकरण करणारी आहे. या मोहिमेने मुघल साम्राज्याचा पाया हादरवला होता आणि मराठ्यांचे नियंत्रण माळवा आणि बुंदेलखंडपर्यंत विस्तारले होते . एनसीसी कॅडेट्स या मार्गावरील पाच राज्यांमधील तरुणांसह ‘राष्ट्र प्रथम’ या तत्वांभोवती समुदायांना एकत्रित करण्यासाठी आणि विविधतेत एकता बळकट करण्यासाठी जागरूकता आणि संवेदनशीलता मोहिमा राबवतील.
एनसीसी गट मुख्यालय अमरावतीचे ग्रुप कमांडर ब्रिगेडियर सचिन गवळी यांच्या नेतृत्वाखालील या टीममध्ये 12 उत्साही एनसीसी कॅडेट्स आहेत ज्यात सहा मुली कॅडेट्स आणि सहाय्यक कर्मचारी आहेत. कठोर प्रक्रियेतून निवड झालेल्या या कॅडेट्सनी तीन महिन्यांचे शिस्तबद्ध प्रशिक्षण वेळापत्रक पूर्ण केले आहे .
रवाना होण्यापूर्वी कॅडेट्सनी सिन्नर (पेशवे बाजीरावांचे जन्मस्थान) आणि शनिवार वाडा येथे प्रभावी सामाजिक सेवेत भाग घेतला, रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण मोहीम आणि श्रमदान उपक्रम आयोजित केले. ते शनिवार वाडा लाईट अँड साउंड शोला देखील उपस्थित राहिले आणि या आव्हानात्मक प्रवासासाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात आशीर्वाद घेतले. ही मोहीम मार्गावरील नागरिकांमध्ये एकता, रस्ते सुरक्षा, तंदुरुस्ती आणि सामाजिक जबाबदारीचा संदेश देईल.
एनसीसी संचालनालय महाराष्ट्राचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल विवेक त्यागी यांनी कॅडेट्सचे त्यांच्या कठोर परिश्रम आणि दृढनिश्चयाबद्दल कौतुक केले आणि प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमात युवक, एनसीसी कॅडेट्स आणि नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला आणि चमूचे मनोबल वाढवले. बॉलीवुड अभिनेता विवान शाह यांनी शनिवार वाडा येथे कॅडेट्स बरोबर सामील होऊन त्यांच्या समर्पणाची आणि चिकाटीची प्रशंसा केली. त्यांना उत्तम आरोग्य, यश आणि संस्मरणीय अनुभवासाठी शुभेच्छा देखील दिल्या आणि जनतेला त्यांना प्रोत्साहित करण्याचे, त्यांची कथा सामायिक करण्याचे आणि विकसित भारत@2047 साठी भारताच्या युवा राजदूतांच्या भावनेचा उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले.
Matribhumi Samachar Marathi

