नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर 2025. पंतप्रधान दि. 27 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता दूरस्थ पद्धतीने स्कायरूट या भारतीय अंतराळ स्टार्ट-अपच्या इन्फिनिटी कॅम्पस या शाखेचे उद्घाटन करणार आहेत. यावेळी ते उपग्रहांना कक्षेत प्रक्षेपित करण्याची क्षमता असलेल्या विक्रम-I या स्कायरूटच्या पहिल्या कक्षीय रॉकेटचे अनावरणही करणार आहेत.
स्कायरूटची इन्फिनिटी कॅम्पस ही अत्याधुनिक शाखा सुमारे 200,000 चौरस फूट इतक्या परिसरात विस्तारलेली आहे. इथे प्रक्षेपण वाहनांचे डिझाइन, विकास, एकात्मिकरण तसेच चाचणी करण्यासाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या गेल्या आहे. दर महिन्याला एक कक्षीय रॉकेट तयार करण्याइतकी या केंद्राची क्षमता आहे.
स्कायरूट ही भारतातील आघाडीची खासगी अंतराळ कंपनी असून, पवन चंदना आणि भरत ढाका यांनी ही कंपनी स्थापन केली होती. हे दोघेही भारतीय तंत्रज्ञान संस्थेचे माजी विद्यार्थी आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे माजी शास्त्रज्ञ आहेत. आता त्यांनी उद्योजकतेच्या क्षेत्रात वाटचाल सुरू केली आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये, स्कायरूटने आपले विक्रम-एस हे उपकक्षीय रॉकेट यशस्वीरित्या प्रक्षेपित करत, अंतराळात रॉकेट प्रक्षेपित करणारी पहिली भारतीय खासगी कंपनी बनण्याचा मान मिळवला होता.
देशातील खासगी अंतराळ उद्योग क्षेत्राची अशा रितीने वेगाने होत असलेली प्रगती हा, गेल्या काही वर्षांत सरकारने केलेल्या परिवर्तनकारी सुधारणांमुळे मिळत असलेल्या यशाचा पुरावा आहे. या सुधारणांमुळे आत्मविश्वासाने भारलेला आणि या क्षेत्राचे जागतिक पातळीवर नेतृत्व करण्याची क्षमता असलेली अंतराळ शक्ती म्हणून भारताचे स्थान अधिक बळकट होत आहे.
Matribhumi Samachar Marathi

