Monday, December 29 2025 | 05:04:12 AM
Breaking News

केंद्रीय लोकसेवा आयोग नागरी सेवा परीक्षेच्या निकालाबाबत दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध केल्याबद्दल कोचिंग संस्थेला केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने ठोठावला 11 लाख रुपयांचा दंड

Connect us on:

नवी दिल्‍ली, 25 डिसेंबर 2025. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने व्हिजन आयएएस (अजय व्हिजन एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेड) या संस्थेला 11 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. नागरी सेवा परीक्षा 2022 आणि 2023 च्या निकालांबाबत आपल्या अधिकृत संकेतस्थळावर दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध करून ग्राहक संरक्षण कायदा, 2019 चे उल्लंघन केल्याप्रकरणी प्राधिकरणाने ही कारवाई केली आहे.

या संस्थेने आपल्या जाहिरातींमध्ये नागरी सेवा परीक्षा 2023 मधील पहिल्या 10 मधील 7, तर पहिल्या 100 पैकी 79 जण, तसेच नागरी सेवा परीक्षा 2022 मधील पहिल्या 50 पैकी 39 जण आपल्या संस्थेचे असल्याचे दावे केले होते. या जाहिरातींमध्ये यशस्वी उमेदवारांची नावे, छायाचित्रे आणि त्यांनी मिळवलेले क्रमांकही ठळकपणे दर्शवण्यात आले होते.

या प्रकरणाचा तपास केला असता संस्थेने शुभम कुमार (संपूर्ण भारतातून पहिला क्रमांक, केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा 2020) याने जीएस फाउंडेशन बॅच (वर्गातील विद्यार्थी) हा अभ्यासक्रम निवडल्याचे नमूद केले होते. मात्र, त्याच वेबपृष्ठावर त्या विद्यार्थ्यासोबतच छायाचित्रे असलेल्या इतर यशस्वी उमेदवारांनी कोणते अभ्यासक्रम निवडले होते, याची माहिती जाणीवपूर्वक लपवून ठेवली असल्याचे प्राधिकरणाला आढळून आले.

संस्थने ही माहिती लपवल्यामुळे, इतर सर्व उमेदवार देखील संस्थेच्या जीएस फाउंडेशन बॅच या वर्गातील अभ्यासक्रमाचेच विद्यार्थी होते, असा दिशाभूल करणारा समज निर्माण झाला होता. मात्र प्रत्यक्षात वस्तुस्थिती तशी नव्हती. त्याच जाहिरातीत संस्थेने लाखो रुपयांचे शुल्क असलेल्या फाउंडेशन कोर्स या आपल्या अभ्यासक्रमाचा प्रचार-प्रसारही केला होता. संस्थेच्या अशा वर्तणुकीचा प्रभाव पडून त्याची परिणिती खोट्या आणि असत्य दाव्यांच्या आधारे विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यास प्रवृत्त करण्यामध्ये झाली होती.

या प्रकरणाचा प्राधिकरणाने सखोल तपास केला. या संस्थेने 2022 आणि 2023 च्या परीक्षांमध्ये 119 हून अधिक उमेदवार यशस्वी झाल्याचा दावा केला होता. मात्र, त्यापैकी केवळ तीन उमेदवारांनी फाउंडेशन कोर्समध्ये प्रवेश घेतला होता. तर उर्वरित 116 उमेदवारांनी पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठीची सराव परीक्षा मालिका, अभ्यास चाचण्या (एक वेळची चाचणी)आणि मुलाखत मार्गदर्शन कार्यक्रमांसारख्या सेवांची निवड केली होती. ही महत्त्वाची माहिती जाणीवपूर्वक लपवून ठेवल्यामुळे, नागरी सेवा परीक्षेच्या सर्व टप्प्यांवरील उमेदवारांच्या यशाला व्हिजन आयएएस ही संस्था वाटेकरी असल्याचा खोटा विश्वास परीक्षार्थी आणि पालकांमध्ये निर्माण झाला. हे कृत्य ग्राहक संरक्षण कायदा, 2019 च्या कलम 2(28) अंतर्गत दिशाभूल करणारी जाहिरात ठरत असल्याचे प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.

यशस्वी उमेदवारांची नावे आणि छायाचित्रे वापरून केलेले मोठे दावे आणि संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावरील जाहिराती दिशाभूल करणाऱ्या असल्याचे निरीक्षण प्राधिकरणाने नोंदवले आहे.

व्हिजन आयएएसवर यापूर्वीही दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध केल्याबद्दल कारवाई करण्यात आल्या होत्या. नियामक हस्तक्षेपानंतरही आणि इशारा दिल्यानंतरही या संस्थेने आपल्या पुढील जाहिरातींमध्ये अशाच प्रकारचे दावे करणे सुरूच ठेवले. यावरून या संस्थेची नियमांच्या पालनाबाबतची अनास्था दिसून येत असल्याचे निरीक्षणही प्राधिकरणाने नोंदवले आहे. नियमांचे वारंवार उल्लंघन झाल्यामुळे, या प्रकरणाला पुढच्या टप्प्यावरचे उल्लंघन मानून ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्याच्या हेतूने, अधिक मोठ्या प्रमाणातील दंड आकारण्यात आला असल्याचे प्राधिकरणाने म्हटले आहे.

दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आणि अनुचित व्यापार  पद्धतींचा अवलंब केल्याबद्दल प्राधिकरणाने  विविध कोचिंग संस्थांना 57 नोटिसा बजावल्या आहेत. 28 कोचिंग संस्थांना एकूण 1,09,60,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून, त्यांना असे दिशाभूल करणारे दावे थांबवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

सर्व कोचिंग संस्थांनी आपल्या जाहिरातींमध्ये माहितीचे सत्य आणि पारदर्शक प्रकटीकरण काटेकोरपणे सुनिश्चित करावे, जेणेकरून विद्यार्थी योग्य आणि माहितीवर आधारित शैक्षणिक निर्णय घेऊ शकतील, यावर प्राधिकरणाने भर दिला आहे.

About Matribhumi Samachar

Check Also

‘सर्वात लहान दिवस, सर्वात मोठा संदेश’: आयआयएम नागपूरमध्ये जागतिक ध्यान दिन साजरा

नागपूर : २१ डिसेंबर २०२५. भारतीय प्रबंध संस्था नागपूर (आयआयएम नागपूर) परिसरात रविवारी सकाळी जागतिक ध्यान …