Thursday, January 22 2026 | 07:31:51 PM
Breaking News

उपराष्ट्रपतींनी नवी दिल्लीत पंडित मदन मोहन मालवीय यांच्या संकलित वाङ्मयाची अंतिम मालिका ‘महामना वाङ्मय’ प्रकाशित केली

Connect us on:

नवी दिल्‍ली, 25 डिसेंबर 2025. उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे महामना पंडित मदन मोहन मालवीय यांच्या संकलित साहित्याची अंतिम मालिका ‘महामना वाङ्मय’ प्रकाशित केली.

उपस्थितांना संबोधित करताना उपराष्ट्रपतींनी महामना मालवीय यांचे वर्णन एक थोर  राष्ट्रभक्त, पत्रकार, समाजसुधारक, वकील, मुत्सद्दी, शिक्षणतज्ज्ञ आणि प्राचीन भारतीय संस्कृतीचे ख्यातनाम अभ्यासक असे केले. ते म्हणाले की, पंडित मालवीय हे एक दुर्मिळ द्रष्टे होते. त्यांचा असा ठाम विश्वास होता की भारताचे भवितव्य भूतकाळाचा त्याग करण्यात नसून त्याचे पुनरुज्जीवन करण्यात आहे. अशाप्रकारे त्यांनी भारताची प्राचीन मूल्ये आणि आधुनिक लोकशाही आकांक्षांमधील दुव्याची भूमिका बजावली.

पंडित मालवीय यांच्या वैज्ञानिक आणि तांत्रिक शिक्षणाबद्दलच्या वचनबद्धतेवर प्रकाश टाकताना उपराष्ट्रपती म्हणाले की, हे प्राचीन आणि आधुनिक संस्कृतीतील सर्वोत्तम घटकांचा मेळ घालण्याच्या त्यांच्या क्षमतेचे प्रतिबिंब आहे.

ब्रिटिश राजवटीत राष्ट्रीय जागृतीचे सर्वात मजबूत साधन म्हणून महामना मालवीय यांचा शिक्षणावर असलेल्या विश्वासाचे स्मरण करून उपराष्ट्रपती म्हणाले की, बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना ही आधुनिक शिक्षण आणि भारतीय संस्कृती यांचा विकास एकत्र झाला पाहिजे, या त्यांच्या विश्वासाचे  जागते उदाहरण आहे.

सशक्त, स्वावलंबी आणि प्रबुद्ध भारताचे महामना मालवीय यांचे स्वप्न हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील ‘आत्मनिर्भर भारत’, ‘मेक इन इंडिया’ आणि ‘विकसित भारत @2047’ यांसारख्या समकालीन उपक्रमांशी सुसंगत आहे, असे उपराष्ट्रपतींनी नमूद केले. पंडित मालवीय यांचा हा समृद्ध वारसा पंतप्रधान मोदी पुढे नेत आहेत.

महामना मालवीय यांचा सर्वसमावेशक, मूल्य-आधारित आणि कौशल्य-आधारित शिक्षणावरील भर ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020’ मध्ये प्रकर्षाने दिसून येतो, असे त्यांनी सांगितले.

‘महामना वाङ्मय’ हे केवळ साहित्याचे संकलन नसून ते भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा ‘बौद्धिक वारसा’ आणि देशाच्या सांस्कृतिक पुनर्जागरणाचा आराखडा असल्याचे उपराष्ट्रपतींनी सांगितले. त्यांनी या महाकाय कार्यासाठी महामना मालवीय मिशन आणि प्रकाशन विभागाचे अभिनंदन केले. तसेच विद्यापीठे, विद्वान आणि तरुण संशोधकांना या खंडांचा सक्रिय अभ्यास करण्याचे आवाहन केले, कारण हे साहित्य समकालीन आव्हानांवर शाश्वत उपाय सुचवते असे ते म्हणाले.

सुमारे 3,500 पृष्ठांच्या 12 खंडांचा समावेश असलेली ‘महामना वाङ्मय’ची ही दुसरी आणि अंतिम मालिका पंडित मदन मोहन मालवीय यांच्या लेखनाचे आणि भाषणांचे सर्वसमावेशक संकलन आहे. या कार्यक्रमाचे आयोजन महामना मालवीय मिशनने केले होते, तर पुस्तके माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रकाशन विभागाने प्रकाशित केली आहेत. या संकलित साहित्याची पहिली मालिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2023 मध्ये प्रकाशित केली होती.

याप्रसंगी केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल; खासदार अनुराग सिंह ठाकूर; इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राचे अध्यक्ष राम बहादूर राय, महामना मालवीय मिशनचे अध्यक्ष हरी शंकर सिंह; आणि प्रकाशन विभागाचे प्रधान  महासंचालक भूपेंद्र कॅन्थोला यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

About Matribhumi Samachar

Check Also

एडीएद्वारे आयोजित दोन दिवसीय ‘एअरोनॉटिक्स 2047’राष्ट्रीय चर्चासत्राला बंगळुरुमध्ये प्रारंभ

एअरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी (एडीए) द्वारे आयोजित ‘एअरोनॉटिक्स 2047’या दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राला  बंगळुरूच्या सेंटर फॉर एअरबोर्न …