Tuesday, December 09 2025 | 10:13:19 AM
Breaking News

स्वीप उपक्रमाअंतर्गत राबवलेल्या उल्लेखनीय मतदार जागृतीपर अभियानासाठी केंद्रीय संचार ब्युरोचा महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीने पुरस्कार देऊन गौरव

Connect us on:

आज (25 जानेवारी 2025) साजरा झालेल्या राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने आज पुण्यातील एमआयटी वर्ल्ड पीस विद्यापीठात कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात, केंद्रीय संचार ब्युरोच्या (CBC) पुणे (महाराष्ट्र आणि गोवा क्षेत्र) कार्यालयाला महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 च्या काळात स्वीप (SVEEP – Systematic Voters’ Education and Electoral Participation) अर्थात मतदारांचे पद्धतशीर शिक्षण आणि निवडणूकीतील सहभाग या उपक्रमाअंतर्गत राज्यभर जनजागृती मोहिमा राबवत मतदार जागृतीसाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल पुरस्कार देऊन गौरवले गेले. महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीने हा पुरस्कार दिला गेला. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या महासंचालक (पश्चिम विभाग) श्रीमती स्मिता वत्स शर्मा यांनी  हा पुरस्कार स्वीकारला.

नोव्हेंबर 2024 मध्ये महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या काळात केंद्रीय संचार ब्यूरोच्या वतीने महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांमध्ये, 1290 ठिकाणी आणि यापूर्वी कमी मतदान झालेल्या 139 मतदारसंघांमध्ये फिरत्या वाहनांच्या माध्यमातून ‘स्वीप कॅम्पेन ऑन व्हील्स’ अर्थात फिरत्या चाकांवरचा मतदार जागृती उपक्रम राबवला गेला होता. यासाठी केंद्रीय संचार ब्यूरोने फिरत्या वाहनांवर जीपीएस ट्रॅकिंग सिस्टम, एलईडी स्क्रीन आणि सार्वजनिक उद्घोषणा ध्वनी यंत्रणेसारख्या सुविधांचा वापर केला होता.

केंद्रीय संचार ब्युरोची ही मतदार जागृती वाहने मोठी शहरे, डाव्या विचारसरणींचा प्रभाव असलेली ठिकाणे, आदिवासी जिल्हे तसेच महाराष्ट्रातील दूर्गम भाग अशा विविध भौगोलिक भागांमध्ये पोहचली. या वाहनांच्या माध्यमातून मतदानाविषयी शहरी उदासीनतेच्या समस्येवर तोडगा काढण्याच्या आणि राष्ट्रउभारणीत मतदानाचे महत्त्व पटवून देण्याच्या उद्देशाने नागरिकांपर्यंत मताधिकाराचा हक्क बजावण्याचा संदेश पोहचवला गेला. ही वाहने ज्या जिल्ह्यांमध्ये फिरली तिथे सुरुवातीला या वाहनांना संबंधित जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून हिंरवा झेंडा दाखवून रवाना केले गेले.  त्यावेळी केंद्रीय संचार ब्यूरोच्या पुणे विभागाअंतर्गच्या सांस्कृतिक कक्षाच्या वतीने मतदार जागृतीपर इतर उपक्रमही राबवले गेले.

ही सर्व 15 वाहने दर दिवशी किमान सहा ते आठ ठिकाणी जात होती. या वाहनांच्या माध्यमातून केल्या जात असलेल्या मतदारजागृतीला व्यापक माध्यम आणि सार्वनिक प्रसिद्धीचे पाठबळही मिळाले. परिणामी सर्व मतदारसंघांतील मतदानाचा टक्का वाढण्यातही या अभियानाची मोठी मदत झाली. भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार, केंद्रीय संचार ब्युरोने ही मोहीम राबवलेल्या 16 जिल्ह्यांमधल्या मतदानाची टक्केवारी 2 टक्क्यांपेक्षा जास्तीने वाढली होती.

About Matribhumi Samachar

Check Also

नागपुरात जागतिक मृदा दिनी सेंद्रीय शेती संदर्भात प्रादेशिक सेंद्रिय आणि नैसर्गिक शेती केंद्र तसेच एनडीआरएफ अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

नागपूर 5 डिसेंबर 2025 मृदेचे आरोग्य आपण जर व्यवस्थित राखले , रसायनाचा उपयोग न करता  कचऱ्यापासून …