डीएइ अर्थात अणुऊर्जा विभागाने 26 जानेवारी 2025 रोजी 76वा प्रजासत्ताक दिन साजरा केला. या प्रसंगी अणुऊर्जा विभागाचे सचिव आणि अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ. ए.के. मोहंती यांनी ओल्ड यॉट क्लब येथे असलेल्या अणुऊर्जा विभागाच्या मुख्यालयात मुख्य अतिथी म्हणून राष्ट्रध्वज फडकवला. त्यांनी संचलनाची पाहणी केली. अणुऊर्जा विभागाचे सुरक्षा पथक आणि एइसीएस शाळेतील विद्यार्थ्यांनी यावेळी संचलन केले.
सचिवांनी उपस्थितांना संबोधित करताना प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व अधोरेखित केले तसेच अणुऊर्जा विभागाने केलेली प्रगती व कामगिरी तसेच देशातील विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकला.
वर्ष 2025 च्या प्रजासत्ताक दिनाच्या `स्वर्णिम भारत: विरासत और विकास` या संकल्पनेच्या अनुषंगाने डॉ. ए.के. मोहंती यांनी अणुऊर्जा विभागाच्या अमृत काळ 2047 च्या दृष्टीकोनावर चर्चा केली. यात विकसित भारतासाठी ऊर्जा, आरोग्य, कृषी, अन्न आणि सामरिक सुरक्षा सुनिश्चित करण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले.


Matribhumi Samachar Marathi

