76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त, खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे (केव्हीआयसी) अध्यक्ष मनोज कुमार यांनी आज, 26 जानेवारी 2025 रोजी मुंबईतील केंद्रीय कार्यालयात राष्ट्रध्वज फडकवला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत’ या दृष्टिकोनात उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आणि देशाच्या सामाजिक-आर्थिक उन्नतीसाठी परिश्रमपूर्वक काम करण्याचे आवाहन, या कार्यक्रमात मनोज कुमार यांनी उपस्थितांना केले. आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी स्वातंत्र्याच्या अमृत काळात राष्ट्रनिर्माणासाठी समर्पण, सर्जनशीलता आणि सेवेचे सर्वोच्च मानक राखले पाहिजेत, असेही ते म्हणाले.

“खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने गेल्या 75 वर्षात राष्ट्र उभारणीत दिलेले योगदान स्वावलंबन, रोजगार निर्मिती आणि शाश्वत विकासाचे प्रतीक आहे. खादीचे कारागीर, विणकर आणि कातकरी यांना सक्षम करून, ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देऊन, पर्यावरणपूरक उत्पादनांचा वापर करण्यास प्रोत्साहन देऊन आणि नवउद्योजकतेला चालना देऊन, खादी आयोग भारताला आत्मनिर्भर बनवण्यात आणि विकसित भारताकडे अग्रेसर करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे,” असे ते म्हणाले. “खादी ही स्वावलंबी भारताचा आत्मा आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पाया आहे.” हे त्यांनी अधोरेखित केले.
कुमार यांनी आयोगाच्या सर्व कर्मचाऱ्यांना आणि भागधारकांना आव्हानांचे संधींमध्ये रूपांतर करण्यासाठी आणि येणाऱ्या पिढ्यांकरता समृद्ध भविष्य घडविण्यासाठी प्रोत्साहित केले.
शिक्षण, जागरूकता, साक्षरता, समाजात समान दर्जा, आर्थिक स्वातंत्र्याद्वारे चांगले जीवनमान याद्वारे महिलांचा दर्जा उंचावण्यासाठी अनेक मार्गांनी प्रयत्न केले जात आहेत, असे कुमार यांनी महिलांच्या सक्षमीकरणाबाबत बोलताना सांगितले. सध्या, खादी – ग्रामोद्योग क्षेत्रातील कार्यबळापैकी सुमारे 80% महिला आहेत, असे ते म्हणाले.

पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली, ‘नवीन भारताची नवीन खादी’ ने नवीन आदर्श स्थापित करत ‘व्होकल फॉर लोकल’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ मोहिमेला चालना दिली आहे. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली खादीचे केवळ पुनरुज्जीवन झाले नाही तर तिला भारताच्या समृद्ध वारशाचे प्रतीक म्हणून जागतिक स्तरावर मान्यता देखील मिळाली. त्यामुळे देशात खादी – ग्रामोद्योग उत्पादनांच्या विक्रीत पाच पटीने वाढ झाली,अशी माहिती त्यांनी दिली.
केव्हीआयसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी वात्सल्य सक्सेना; आर्थिक सल्लागार पंकज बोडखे; मुख्य दक्षता अधिकारी डॉ. संघमित्रा, इतर वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
Matribhumi Samachar Marathi

