Sunday, December 07 2025 | 11:51:11 PM
Breaking News

प्रत्येक दहशतवादी कृत्य हे गुन्हेगारी आणि अन्यायकारक आहे, सामूहिक सुरक्षा आणि संरक्षणाच्यादृष्टीने या संकटाचे उच्चाटन करण्यासाठी शांघाय सहकार्य संघटनेने एकत्र यावे : चीनमधील किंगदाओ इथल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे प्रतिपादन

Connect us on:

चीनमध्ये किंगदाओ इथल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत  केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी, २६ जून २०२५ रोजी  संरक्षण मंत्री ,शांघाय सहकार्य संघटनेचे महासचिव, संघटनेच्या प्रादेशिक दहशतवादविरोधी संरचनेचे (RATS) संचालक आणि इतर प्रतिष्ठित प्रतिनिधींना संबोधित केले. आपल्या संबोधनातून राजनाथ सिंह यांनी भारताच्या दहशतवादविरोधी धोरणातील बदलांची रूपरेषा मांडली. सामूहिक सुरक्षा आणि संरक्षणासाठी या संकटाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सर्व सदस्य देशांनी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले. सद्यस्थितीत या प्रदेशासमोर शांतता, सुरक्षा आणि विश्वासाच्या अभावाशी संबंधित मोठी आव्हाने आहेत, वाढता कट्टरतावाद, अतिरेकीपणा आणि दहशतवाद हेच या सर्वांचे मूळ आहे असे ते म्हणाले.

दहशतवाद तसेच देशाबाहेरील घटक आणि दहशतवादी गटांच्या हातात मोठ्या प्रमाणात विनाशकारी शस्त्रांचा प्रसार होत असताना शांतता आणि समृद्धी एकत्र नांदू शकत नाहीत, अस्तित्वात राहू शकत नाहीत. या आव्हानांचा सामना करण्यासाठी निर्णायक कृती आवश्यक आहे. ज्यांनी आपल्या संकुचित आणि स्वार्थी हेतूंसाठी दहशतवादाला पाठबळ दिले, दहशतवाद जोपासला आणि त्याचा वापर करून घेतला, त्यांना त्याचे परिणाम भोगावेच लागतील असे त्यांनी सांगितले. काही देश सीमेपलिकडून दहशतवादाचा धोरणात्मक साधन म्हणून वापर करतात आणि दहशतवाद्यांना आश्रय देतात. अशा दुहेरी भूमिकेला कोणताही थारा देता कामा नये ही भूमिका त्यांनी मांडली. शांघाय सहकार्य संस्थेने अशा देशांवर टीका करण्यास मागेपुढे पाहू नये असेही राजनाथ सिंह म्हणाले.

जम्मू आणि काश्मीरमध्ये पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणूनच भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले. या मोहीमेद्वारे भारताने, दहशतवादापासून स्वतःचा बचाव करण्याचा आणि सीमेपलिकडून भविष्यात होणारे हल्ले रोखण्याचा आणि त्यांना प्रतिबंध घालण्याच्या आपल्या अधिकाराचा भारताने वापर केला. पहलगाम दहशतवादी हल्ल्यादरम्यान, धार्मिक अस्मितेचा आधार घेत पीडितांना गोळ्या घातल्या गेल्या. संयुक्त राष्ट्रसंघाने दहशतवादी संघटना म्हणून जाहीर केलेल्या लष्कर-ए-तैयबा या संघटनेच्याच द रेसिस्टन्स फ्रंट या गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. पहलगाम हल्ल्याचे स्वरुप हे लष्कर-ए-तैयबाने  भारतावर यापूर्वी केलेल्या दहशतवादी हल्ल्यांशी जुळणारे आहे अशी माहिती त्यांनी दिली. अशा दहशतवारी कृत्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर सारख्या मोहिमेतून दहशतवादाप्रति  भारताची शून्य सहिष्णुता दिसून आली. ही मोहिम म्हणजे स्वतःचा बचाव करण्याचा भारताचा अधिकारच आहे. यापुढे दहशतवादाची केंद्रे सुरक्षित असणार नाही आणि त्यांना लक्ष्य करण्यात आता भारत मागेपुढे पाहणार नाही हा संदेश भारताने दिला असल्याचेही राजनाथ सिंह सांगितले.

सीमेपलिकडून होत असलेल्या दहशतवादासह, भ्याड दहशतवादी कृत्ये करणाऱ्या, त्याचे कट रचणाऱ्या, अशा कृत्यांना आर्थिक रसद पुरवणाऱ्या आणि त्यांना पाठबळ देणाऱ्यांना जबाबदार धरून न्याय मिळवून देण्याची गरजही राजनाथ सिंह यांनी पुन्हा व्यक्त केली. दहशतवादी कृत्यामागची प्रेरणा काहीही असली, असे कृत्य कधीही, कुठेही आणि कोणाकडूनही केले गेले असले तरी असे प्रत्येक कृत्य गुन्हेगारी आणि अन्यायकारकच आहे  असे राजनाथ सिंह यांनी ठामपणे सांगितले.

मध्य आशियासोबत भारताच्या कनेक्टिव्हिटीचा विस्तार करण्याची भारताची वचनबद्धताही राजनाथ सिंह यांनी अधोरेखित केली. उत्तम कनेक्टिव्हिटीमुळे परस्पर व्यापार वाढवो, आणि त्यासोबतच  परस्पर विश्वासार्हताही वृद्धिंगत होते असे त्यांनी सांगितले. मात्र यासाठीच्या प्रयत्नांत शांघाय सहकार्य संस्थेच्या सनदेच्या मूलभूत तत्त्वांचे पालन करणे आवश्यक आहे, विशेषतः सदस्य राष्ट्रांच्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर करणे महत्वाचे असल्याचे राजनाथ सिंह यांनी अधोरेखित केले.

अफगाणिस्तानमधील शांतता, सुरक्षा आणि स्थैर्याला पाठिंबा देत राहण्याचे आपले धोरण भारत सातत्यपूर्णता आणि दृढतेने राबवत राहील ही बाबही राजनाथ सिंह यांनी आपल्या संबोधनातून अधोरेखित केली.

About Matribhumi Samachar

Check Also

रशियाच्या राष्ट्राध्यक्षांसोबत घेतलेल्या संयुक्त वार्ताहर परिषदेत पंतप्रधानांनी प्रसारमाध्यमांना दिलेले निवेदन

महामहीम, माझे मित्र राष्ट्रपती पुतीन दोन्ही देशांचे प्रतिनिधी, प्रसारमाध्यमांचे सहकारी नमस्कार! “दोबरी देन”! आज भारत …