भारतीय लष्कराने आज झाशी इथे देशातील पहिली भूऔष्णिक आधारित शून्य कार्बन उत्सर्जन ऊर्जा इमारतीचे (Geothermal-based Net Zero Energy Building) उद्घाटन केले. पुण्यातील दक्षिण कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ,पीव्हीएसएम, एव्हीएसएम यांनी पुण्यातून ऑनलाइन पद्धतीने या इमारतीचे उद्घाटन केले. या इमारतीचे उद्घाटन हे भारतीय लष्कराने हवामान सजग संरक्षण विषयक पायाभूत सुविधांच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल ठरले आहे. या इमारतीच्या उदघाटनामुळे लष्कराने प्रगत आणि हरित तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात घेतलेली आघाडी अधोरेखित झाली आहे.

ही नवोन्मेषी इमारत चार महिन्यांपेक्षा कमी कालावधीत बांधली गेली. या इमारतीच्या संरचनीय प्रक्रियेअंतर्गत पृथ्वीसोबत वातावरणातील उष्णतेची देवाणघेवाण करून भूऔष्णिक उर्जा निर्मिती केली जाते. या प्रक्रियेत नैसर्गिकरित्या अंतर्गत वातावरणात संतुलन राखले जाते आणि त्यामुळे बाह्य ऊर्जेवरील अवलंबित्वही लक्षणीयरीत्या कमी होते. केंद्र सरकारने 2047 पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचे ध्येय समोर ठेवले आहे. या ध्येयपुर्तीला पाठबळ देण्याच्या दिशेने हा महत्वाचा प्रकल्प असून, या इमारतीमुळे कार्बन उत्सर्जनात दरवर्षी अंदाजे 50 टनाची घट होऊ शकणार आहे.
4ST7.jpeg)
कालिकत इथल्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेने स्वतंत्रपणे या इमारतीच्या शून्य उत्सर्जनक्षम घटकांचे मूल्यांकन आणि प्रमाणीकरण केले आहे. ही इमारत भूगर्भीय आणि सौर प्रणालींचे एकात्मिकरण, इमारतीची कार्यक्षम संरचना आणि कल्पक ऊर्जा व्यवस्थापनाच्या माध्यमातून संपूर्ण वर्षभर शून्य कार्बन उत्सर्जनासह एनर्जी न्यूट्रॅलिटीची पूर्तता करत असल्याची पुष्टीही राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेने केली आहे. यामुळे संरक्षणविषयक शाश्वत पायाभूत सुविधांमधील एक आघाडीचे प्रारुप म्हणूनही या इमारतीने आपले स्थान बळकट केले आहे.
15T3.jpeg)
ही इमारतीत प्रकाश आणि मोशन सेन्सरसह छतावरील सौर प्रणालीची जोड असलेल्या कल्पक प्रकाशव्यवस्था आणि स्वयंचलीत ऊर्जा-कार्यक्षम सुविधांनी सज्ज आहे. उर्जेचा कमीत कमी वापर होईल तसेच उर्जा पुरवठा व्यवस्था बंद पडल्यावरही उर्जा पुरवठा सुरळीत राहून इमारतीचे कार्यान्वयन ठप्प पडणार नाही अशा तऱ्हेने या इमारतीची रचना केली गेली आहे.
या प्रकल्पातून लष्कराने तंत्रज्ञान आत्मसात करण्याची वर्षसंकल्पना जपल्याचे दिसून येते. याअंतर्गत लष्कराने जलद बांधकाम, पर्यायी सामग्रीचा वापर आणि शाश्वत प्रणालींचे एकात्मिकरण घडवून आणले आहे. या इमारतीच्या माध्यमातून दुर्गम तसेच दूरवरच्या भागात लष्करी मोहिमांच्या गरजेच्या अनुषंगाने ऊर्जा स्वातंत्र्य आणि पर्यावरणीय कार्यक्षमता या वैशिष्ट्यांनी सज्ज असलेल्या हरित इमारती बांधण्यासाठीची मानकेही निश्चित झाली आहेत. या इमारतीच्या बांधणीतून भारतीय लष्कराने कार्यान्वयाच्या गरजा पूर्ण करण्यासोबतच पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या अनुषंगाने लवचिक, आत्मनिर्भर पायाभूत सुविधांवर दिलेला वाढता भरही अधोरेखित होतो.

Matribhumi Samachar Marathi

