कारगिल युद्धात मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाच्या 26 व्या वर्धापनदिनानिमित्त भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांड मुख्यालयात आज कारगिल विजय दिवस मोठ्या अभिमानाने आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा केला गेला. हा ऐतिहासिक दिवस देशाच्या इतिहासात एक अविस्मरणीय अध्याय कोरणाऱ्या भारतीय लष्कराच्या शूरवीर जवानांच्या अतूट धैर्याचे, पराक्रमाचे आणि सर्वोच्च त्यागाचे स्मरण करून देणारा आहे.
दक्षिण कमांड युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण समारंभाने या स्मरणोत्सवाची सुरुवात झाली. यावेळी दक्षिण कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ परम विशिष्ट सेवापदक, अतिविशिष्ट सेवापदक प्राप्त, लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांनी शहीद वीरांना आदरांजली वाहिली. पुण्याच्या लष्करी तळावर सेवेत असलेलो अधिकारी, सैनिक आणि निवृत्त सैनिकही या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी 1999 च्या कारगिल युद्धात राष्ट्राच्या सार्वभौमत्वाचे संरक्षण करण्यासाठी आपले प्राण अर्पण केलेल्या जवानांच्या स्मृतीला आदरपूर्वक वंदन करण्यात आले.
यानिमित्ताने शिवनेरी ब्रिगेडने दक्षिण कमांडच्या सहकार्याने पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात शस्त्रास्त्रे आणि लष्करी उपकरणांचे प्रदर्शनही आयोजित केले होते. लष्कराच्या वतीने राबवल्या जात असलेल्या ‘आपल्या सैन्याला जाणून घ्या’ या जनजागृतीपर उपक्रमाचा भाग म्हणून, या प्रदर्शनात अत्याधुनिक शस्त्रास्त्र प्रणाली, प्रगत आणि विशेष युद्धभूमी तंत्रज्ञान प्रभावीपणे मांडण्यात आले होते. या प्रदर्शनामुळे नागरिकांना, विशेषतः युवा वर्गाला भारतीय लष्कराची ताकद आणि आधुनिकीकरणाचा अनुभव घेण्याची अनोखी संधी मिळाली.
या प्रदर्शनातून लष्कराचे भविष्यासाठी सज्ज, तंत्रज्ञान-सक्षम दल (Future-Ready, Tech-Enabled Force) या रुपात झालेले परिवर्तन ठळकपणे अधोरेखित झाले. हे परिवर्तन ‘दशकातील परिवर्तन’ (Decade of Transformation) या संकल्पनेला अनुरुप असून, त्याअंतर्गत स्वदेशीकरण, क्षमता वृद्धी वाढवणे आणि बहु-क्षेत्रीय मोहिमांच्या तयारीवर भर दिला गेला आहे.
या कार्यक्रमात फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी, तसेच राष्ट्रीय छात्रसेनेच्या 2 महाराष्ट्र बटालियनच्या छात्रसैनिकांनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदवला.
कारगिल विजय दिवसानिमित्त आयोजित या दोन्ही कार्यक्रमांतून भारतीय लष्कराची आपल्या नायकांचा सन्मान करण्याची, देशाच्या भावी पिढ्यांना शिक्षित करण्याची आणि भारताचे सार्वभौमत्व जपण्याची दृढ वचनबद्धताही ठळकपणे अधोरेखित झाली. भारतीय लष्कर आपल्या सेवेच्या माध्यमातून, परंपरांचे पालन करत, आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत आणि कर्तव्यभावनेतून प्रेरणा घेत कायमच अढळ राहिले आहे.
Matribhumi Samachar Marathi

