नवी दिल्ली, 26 डिसेंबर 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत भारत मंडपम येथे ‘वीर बाल दिना’निमित्त आयोजित राष्ट्रीय कार्यक्रमाला संबोधित केले. कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधानांनी देशभरातून आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले आणि उपस्थित मुलांना संबोधित केले. ते म्हणाले की, आज देश वीर बाल दिवस साजरा करत आहे. यावेळी सादर झालेल्या वंदे मातरम या गीताच्या सुंदर सादरीकरणातून कलाकारांची निष्ठा आणि प्रयत्न ठळकपणे दिसून येत असल्याचे त्यांनी नमूद केले.
आजच्या दिवशी, देश भारताचा अभिमान असलेल्या आणि अदम्य धैर्य आणि शौर्य प्रदर्शित करणाऱ्या शूर साहिबजाद्यांचे स्मरण करत असल्याचे ते म्हणाले. या साहिबजादेंनी वय आणि परिस्थितीवर मात करून, ते क्रूर मुघल साम्राज्याविरुद्ध निश्चल उभे राहिले, आणि धार्मिक कट्टरता आणि दहशतीला हादरा दिला, असे ते म्हणाले. ज्या देशाचा भूतकाळ असा गौरवशाली आहे, ज्याच्या तरुण पिढ्यांना असा प्रेरणादायी वारसा मिळाला आहे, तो देश कोणतेही उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सक्षम आहे, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.
मोदी म्हणाले की, 26 डिसेंबर हा दिवस जेव्हा येतो, तेव्हा सरकारने साहिबजादे यांच्या शौर्याने प्रेरित होऊन वीर बाल दिवस साजरा करायला सुरुवात केली आहे, या गोष्टीने आश्वस्त वाटते. गेल्या चार वर्षांत, या नवीन परंपरेने देशाच्या युवा पिढीला साहिबजादे यांच्याकडून प्रेरणा मिळाली आहे, आणि धाडसी आणि प्रतिभावान युवा पिढी घडवण्यासाठी एक व्यासपीठ तयार केले आहे यावर त्यांनी भर दिला. पंतप्रधानांनी सांगितले की, दरवर्षी देशासाठी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मुलांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार (पीएमआरबीपी) देऊन सन्मानित केले जाते आणि यावर्षी देखील देशभरातील 20 मुलांना हा पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्याशी झालेल्या संवादाबद्दल त्यांनी पुढे सांगितले की, यापैकी काही जणांनी असाधारण शौर्य दाखवले, काहींनी समाजसेवा आणि पर्यावरण संरक्षणात प्रशंसनीय योगदान दिले, काहींनी विज्ञान आणि तंत्रज्ञानात नवोन्मेष केला, तर अनेक जणांनी क्रीडा, कला आणि संस्कृतीसाठी योगदान दिले आहे.पुरस्कार विजेत्यांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, हा सन्मान केवळ त्यांचा नाही, तर त्यांचे पालक, शिक्षक आणि मार्गदर्शकांचा आहे, ज्यांच्या प्रयत्नांना मान्यता मिळत आहे. त्यांनी पुरस्कार विजेत्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
वीर बाल दिवस हा भावना आणि आदराने भरलेला दिवस आहे, असे अधोरेखित करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साहिबजादा अजित सिंह जी, साहिबजादा जुझार सिंह जी, साहिबजादा झोरावर सिंह जी आणि साहिबजादा फतेह सिंह जी यांचे स्मरण केले. या चौघांना अगदी लहान वयातच त्यांच्या काळातील सर्वात महासत्तेला विरोध करावा लागला. पंतप्रधानांनी यावेळी बोलताना यावर भर दिला की, त्यांचा संघर्ष भारताच्या मूलभूत आदर्शांविषयी आणि धार्मिक कट्टरतेविषयी, तसेच सत्य-असत्य यांच्या विरोधात होता. त्यांच्या एका बाजूला 10 वे गुरू श्री गुरू गोविंद सिंह जी आणि दुसऱ्या बाजूला औरंगजेबाचे क्रूर राज्य होते. पंतप्रधानांनी नमूद केले की, साहिबजादे खूप लहान असले तरी, भारतीयांचे मनोधैर्य खच्ची करून धर्मांतर करण्याचे औरंगजेबाचे मनसुबे होते आणि म्हणूनच त्याने त्यांना लक्ष्य केले. त्यांनी यावर भर दिला की, औरंगजेब आणि त्याचे सैनिक हे विसरले होते की, गुरू गोविंद सिंह जी हे सामान्य माणूस नव्हते, तर तपस्या आणि त्यागाचे मूर्तिमंत रूप होते आणि साहिबजाद्यांना हाच वारसा मिळाला होता. त्यांनी घोषित केले की, संपूर्ण मुघल साम्राज्याच्या सामर्थ्यासमोरही, चार साहिबजाद्यांपैकी कोणीही डगमगले नाही. पंतप्रधानांनी साहिबजादा अजित सिंग जी यांच्या शब्दांची आठवण करून दिली, जे आजही त्यांच्या शौर्याची साक्ष देतात.
काही दिवसांपूर्वीच देशाने कुरुक्षेत्रात एका विशेष कार्यक्रमाद्वारे श्री गुरू तेग बहादूर जी यांचा 350 वा हौतात्म्य दिन साजरा केला, याची आठवण करून देत पंतप्रधान मोदी म्हणाले की, गुरू तेग बहादूरजी यांच्या त्यागातून प्रेरणा घेतलेल्या साहिबजाद्यांना मुघलांच्या अत्याचारांची भीती वाटेल, असे मानणे चुकीचे होते. पंतप्रधानांनी अधोरेखित केले की, माता गुजरी, श्रीगुरू गोविंद सिंह जी आणि चार साहिबजाद्यांचे धैर्य आणि आदर्श प्रत्येक भारतीयाला सामर्थ्य देत राहतील आणि ते सदैव प्रेरणास्रोत राहतील. त्यांनी यावर जोर दिला की, साहिबजाद्यांच्या त्यागाची गाथा प्रत्येक नागरिकाच्या ओठांवर असायला हवी होती, परंतु दुर्दैवाने, स्वातंत्र्यानंतरही वसाहतवादी मानसिकता कायम राहिली. त्यांनी निदर्शनास आणून दिले की, ही मानसिकता 1835 मध्ये ब्रिटिश राजकारणी मॅकॉले याने रुजवली होती आणि स्वातंत्र्यानंतरही ती नष्ट होऊ दिली गेली नाही. यामुळे अशी सत्ये दडपण्याचे दशकांपर्यंत प्रयत्न झाले. पंतप्रधान मोदी यांनी ठाम सांगितले की, भारताने आता वसाहतवादी मानसिकतेतून मुक्त होण्याचा संकल्प केला आहे आणि घोषित केले की, भारतीय त्याग आणि शौर्याच्या आठवणी यापुढे दडपल्या जाणार नाहीत आणि देशाच्या नायक-नायिकांना यापुढे दुर्लक्षित केले जाणार नाही. याच कारणामुळे वीर बाल दिवस पूर्ण भक्ती आणि आदराने साजरा केला जात आहे, असे त्यांनी अधोरेखित केले.ते पुढे म्हणाले की, सरकार आता केवळ इथेच थांबलेले नाही. आता 2035 मध्ये मॅकॉलेच्या कटाला 200 वर्षे पूर्ण होतील, म्हणजे 10 वर्षे शिल्लक असताना, भारत वसाहतवादी मानसिकतेतून संपूर्ण मुक्ती मिळवून दाखवेल. पंतप्रधानांनी यावर भर दिला की, एकदा देश या मानसिकतेतून मुक्त झाल्यानंतर तो स्वदेशी परंपरांचा अधिक अभिमान बाळगेल आणि आत्मनिर्भरतेच्या मार्गावर आणखी पुढे जाईल.
देशाला वसाहतवादी मानसिकतेतून मुक्त करण्याच्या मोहिमेची एक झलक अलीकडेच संसदेत दिसल्याचे पंतप्रधान म्हणाले. हिवाळी अधिवेशनादरम्यान, संसद सदस्यांनी हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त इतर भारतीय भाषांमध्ये जवळपास 160 भाषणे दिल्याचे त्यांनी अधोरेखित केले. यापैकी सुमारे 50 भाषणे तमिळ भाषेत, 40 हून अधिक मराठीत आणि सुमारे 25 बंगाली भाषेत होती, अशी माहिती त्यांनी दिली. जगातील कोणत्याही संसदेत असे दृश्य दुर्मिळ आहे आणि ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे, असे त्यांनी नमूद केले. मॅकॉलेने भारताची भाषिक विविधता दडपण्याचा प्रयत्न केला होता, परंतु आता देश वसाहतवादी मानसिकतेतून मुक्त होत असताना, भाषिक विविधता हे एक सामर्थ्य बनत आहे, यावर त्यांनी भर दिला.
‘युवा भारत’ संघटनेच्या उपस्थित तरुणांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, तुम्ही ‘जनरेशन झेड’ आणि ‘जनरेशन अल्फा’ चे प्रतिनिधित्व करता आणि तुमचीच पिढी भारताला विकसित राष्ट्र बनवण्याच्या ध्येयापर्यंत घेऊन जाईल. मी तुमची क्षमता आणि आत्मविश्वास पाहत आहे आणि समजून घेत आहे, म्हणूनच माझा तुमच्यावर खूप विश्वास आहे, असेही ते म्हणाले. ‘लहान मुलानेही शहाणपणाची गोष्ट सांगितल्यास ती स्वीकारली पाहिजे’ या म्हणीचा संदर्भ देत पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले की, मोठेपण हे वयाने नाही, तर कृती आणि कर्तृत्वाने ठरते. तरुणाई अशी कामे करू शकते की ज्यातून इतरांना प्रेरणा मिळेल आणि अनेकांनी हे आधीच सिद्ध केले आहे, हे त्यांनी अधोरेखित केले. मात्र, या यशाकडे केवळ एक सुरुवात म्हणून पाहिले पाहिजे, कारण अजून खूप पुढे जायचे आहे आणि स्वप्नांना आकाशापर्यंत पोहोचवायचे आहे, असे ते म्हणाले. ही पिढी भाग्यवान आहे, असे नमूद करून पंतप्रधान मोदी म्हणाले की, पूर्वीच्या काळी निराशेच्या वातावरणामुळे तरुणांना स्वप्न पाहण्याचीही भीती वाटत होती, त्या तुलनेत आज देश प्रतिभावंतांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आज देश प्रतिभेचा शोध घेऊन प्रतिभावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे आणि 140 कोटी नागरिकांची शक्ती त्यांच्या आकांक्षांशी जोडतो आहे, असे ते म्हणाले. ‘डिजिटल इंडिया’च्या यशाने तरुणांना इंटरनेटची शक्ती आणि शिक्षणासाठी संसाधने मिळाली आहेत; विज्ञान, तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या क्षेत्रात पुढे जाणाऱ्यांसाठी ‘स्टार्टअप इंडिया’सारखे अभियान लाभले आहे तर क्रीडा क्षेत्रात प्रगती करणाऱ्यांसाठी ‘खेलो इंडिया’ आहे, असे ते म्हणाले. दोन दिवसांपूर्वीच आपण संसद क्रीडा महोत्सवात सहभागी झालो होतो, असे त्यांनी सांगितले. तरुणांच्या प्रगतीला पाठिंबा देण्यासाठी अनेक व्यासपीठे उपलब्ध असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. पंतप्रधानांनी तरूणांना आपल्या धेय्यावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले, तात्पुरत्या लोकप्रियतेच्या मोहात अडकण्यापासून सावध केले तसेच विचार आणि तत्त्वांमध्ये स्पष्टता असणे आवश्यक असल्याचे सांगितले. युवा वर्गाने देशाच्या आदर्श आणि महान व्यक्तिमत्त्वांकडून प्रेरणा घ्यावी असे आवाहन त्यांनी केले. युवकांचे यश केवळ त्यांच्यापुरते मर्यादित न राहता ते देशाचे यश बनेल याची खात्री करावी , असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधानांनी स्पष्ट केले की, 21 व्या शतकाच्या आधुनिक शिक्षण पद्धतींमध्ये प्रात्यक्षिक शिक्षणावर भर देण्यात येत आहे, मुलांना फक्त पाठांतर करण्याऐवजी विचार करण्यास प्रोत्साहित केले जाते, प्रश्न विचारण्याचे धैर्य निर्माण केले जात आहे आणि समस्या सोडविण्याच्या कौशल्यांचा विकास केला जातो. पंतप्रधानांनी सांगितले की या दिशेने पहिल्यांदाच अर्थपूर्ण प्रयत्न होत असून, ज्यामध्ये बहुविध अभ्यासक्रम, कौशल्याधारित शिक्षण, क्रीडांचा प्रसार आणि तंत्रज्ञानाचा वापर विद्यार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर फायदेशीर ठरत आहे. पंतप्रधानांनी यावर भर दिला की देशभरातील लाखो मुलं अटल टिंकरिंग लॅब्सच्या माध्यमातून नवोन्मेष आणि संशोधनात सहभागी होत आहेत, तसेच शाळा पातळीवरही विद्यार्थ्यांना रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, शाश्वतता आणि डिझाईन थिंकिंगसारख्या संकल्पनांची ओळख करून दिली जात आहे. त्यांनी असेही सांगितले की या सर्व प्रयत्नांसोबत, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने मातृभाषेत शिक्षण घेण्याचा पर्याय दिला आहे, ज्यामुळे शिक्षण सुलभ झाले असून मुलांना विषय चांगल्या प्रकारे समजतात.
पंतप्रधानांनी सांगितले की, शूर साहिबजाद्यांनी मार्गातील अडचणींचा विचार न करता तो मार्ग योग्य आहे की नाही याला प्राधान्य दिले, आणि आजही त्याच प्रेरणादायी वृत्तीची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भारतातील युवकांकडून मोठी स्वप्ने, कठोर परिश्रम आणि आत्मविश्वास कधीही ढासळू न देण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. देशाचे उज्ज्वल भविष्य बालक आणि युवकांच्या धैर्य, प्रतिभा आणि निष्ठेवर अवलंबून आहे, आणि हाच घटक राष्ट्राच्या प्रगतीला मार्गदर्शन करेल, असे मोदी यांनी सांगितले.
समारोप करताना पंतप्रधान म्हणाले की, याच विश्वास, जबाबदारी आणि सातत्यपूर्ण गतीच्या बळावर भारत आपल्या भविष्याकडे सातत्याने पुढे जात राहील. त्यांनी पुन्हा एकदा साहिबजाद्यांना आदरांजली अर्पण केली, तसेच पुरस्कारप्राप्त सर्व युवकांचे अभिनंदन करत पस्थित सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.
या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी, सावित्री ठाकूर, रव्हनीत सिंग व हर्ष मल्होत्रा यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
पार्श्वभुमी
वीर बाल दिनानिमित्त भारत सरकार देशभरात विविध कार्यक्रम आयोजित करत आहे, नागरिकांना साहिबजाद्यांच्या असामान्य धैर्य व सर्वोच्च बलिदानाची माहिती व शिक्षण देणे, भारताच्या इतिहासातील तरुण शूरवीरांच्या शौर्य व बलिदानाचा सन्मान व स्मरण करणे हा या कार्यक्रमांचा उद्देश आहे.
कार्यक्रमांमध्ये कथाकथन, पठण, भित्तीपत्रक निर्मिती आणि निबंध लेखन स्पर्धांसह विविध कार्यक्रमांचा समावेश असेल. हे उपक्रम शाळा, बालसंगोपन संस्था, अंगणवाडी केंद्रे आणि अन्य शैक्षणिक मंचांवर तसेच मायजीवोव्ही आणि मायभारत पोर्टल्सवरील ऑनलाइन माध्यमातून आयोजित करण्यात येतील.
9 जानेवारी 2022 रोजी श्री गुरु गोबिंद सिंग जींच्या प्रकाशपर्वाच्या निमित्ताने पंतप्रधानांनी जाहीर केले होते की, 26 डिसेंबर रोजी ‘वीर बाल दिन’ साजरा केला जाईल, हा दिवस साहिबजादा बाबा जोरावर सिंह जी आणि साहिबजादा बाबा फतेह सिंह जी यांच्या शहादतीच्या स्मरणार्थ साजरा केला जातो त्यांच्या बलिदानाने पिढ्यांना प्रेरणा देणे आजही सुरू आहे.
या कार्यक्रमाला प्रधान मंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्राप्त बालक-बालिका उपस्थित होत्या.
Matribhumi Samachar Marathi

