नवी दिल्ली, 27 जानेवारी 2025. प्रयागराज येथे महाकुंभ – 2025 ला भेट देणाऱ्यांमध्ये पर्यावरण-स्नेही जीवनशैलीबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी, पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाने 13 ते 15 जानेवारी 2025 दरम्यान एक दालन उभारले होते. महाकुंभ मेळाव्याला उपस्थित राहणाऱ्या अभ्यागतांमध्ये शाश्वत जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी विविध तंत्रज्ञानाचे प्रदर्शन या संवादात्मक आणि डिजिटल दालनात प्रदर्शित करण्यात आले होते.

महाकुंभ-2025 मधील LiFE लाईफ (पर्यावरणासाठी जीवनशैली) दालनाने अभ्यागतांना मिशन लाईफच्या व्यापक उद्दिष्टांशी सुसंगत राहून शाश्वत जीवनशैली अंगीकारण्याबाबत उपयुक्त माहिती दिली. या दालनाला भेट देणाऱ्यांना व्हर्च्युअल रिॲलिटी तंत्रज्ञानाचा वापर करून सायकल चालवणे, एआय-आधारित सेल्फी यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा अनुभव घेण्याचीही संधी मिळाली. या दालनात सेल्फी प्लेज किओस्क देखील स्थापित करण्यात आले होते, जिथे अभ्यागतांनी शाश्वत जीवनशैलीचे पालन करण्याची प्रतिज्ञा घेतली.
याच दालनात प्रोजेक्ट डॉल्फिन प्रदर्शन हे अभ्यागतांसाठी आणखी एक आकर्षण होते. यात गंगा नदी डॉल्फिनचे भौगोलिक वितरण, पर्यावरणीय महत्त्व आणि पौराणिक महत्त्व अधोरेखित करणारी चित्रे होती. नदीतील डॉल्फिन आणि त्यांच्या परिसंस्थेबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी खास तयार केलेल्या परस्परसंवादी खेळांमध्ये अभ्यागत सहभागी झाले. खास युवा वाचकांसाठी दोन भाषांमधील कॉमिक्स, ॲडव्हेंचर्स ऑफ सुपर डॉली उपलब्ध केले होते तर व्हिडिओ डिस्प्ले द्वारे डॉल्फिनच्या अधिवासाबद्दल आणि संवर्धनासाठी केल्या जात असलेल्या प्रयत्नांबद्दल माहिती देण्यात आली. दालनाच्या प्रवेशद्वारावर दोन व्हायब्रण्ट सेल्फी स्टँडनी अभ्यागतांचे स्वागत केले.

प्रयागराज येथील महाकुंभ, 2025 मधील प्रोजेक्ट डॉल्फिन प्रदर्शनाने नदीशी संबंधित परिसंस्था आणि त्यांच्या प्रमुख प्रजाती, गंगा नदी डॉल्फिनचे संरक्षण करण्याच्या महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी एक आकर्षक मंच उपलब्ध करून दिला.
Matribhumi Samachar Marathi

