नवी दिल्ली, 27 जून 2025. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 26 जून 2025 रोजी चीनमधील किंगदाओ येथे शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीच्या निमित्ताने चिनीचे संरक्षण मंत्री अॅडमिरल डोंग जून यांच्याशी द्विपक्षीय बैठक घेतली. भारत-चीन सीमेवर शांतता आणि सौहार्द टीकवून ठेवण्याच्या गरजेवर दोन्ही मंत्र्यांनी सविस्तर चर्चा केली.
दोन्ही देशांनी द्विपक्षीय संबंधांमध्ये सामान्यता परत आणण्यासाठी केलेल्या कामाची संरक्षण मंत्र्यांनी नोंद घेतली. त्यांनी कायमस्वरूपी संवाद आणि तणाव कमी करण्यासाठी सुस्थित प्रणालीच्या माध्यमातून जटिल मुद्द्यांचे निराकरण होण्याची आवश्यकता अधोरेखित केली.
राजनाथ सिंह यांनी सीमाव्यवस्थापनावर आणि या विषयावर आधीपासून अस्तित्वात असलेल्या यंत्रणेला पुनर्जीवित करून सीमारेषा निश्चितीचा कायमस्वरूपी तोडगा काढण्यावरही भर दिला. परस्पर हिताचे सर्वोत्तम लाभ साध्य करण्यासाठी तसेच आशिया आणि जगात स्थिरता प्रस्थापित करण्यासाठी सहकार्य करण्याच्या दृष्टीने चांगले शेजारी संबंध निर्माण करण्याची गरज असल्यावर त्यांनी भर दिला. 2020 च्या सीमा वादानंतर निर्माण झालेला विश्वासाचा अभाव दूर करण्यासाठी प्रत्यक्ष कृती करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
7KWD.jpeg)
दोन्ही मंत्र्यांनी सध्याच्या यंत्रणांच्या माध्यमातून सैन्य माघारी, तणाव कमी करणे, सीमाव्यवस्थापन आणि शेवटी सीमारेषा निश्चितीशी संबंधित मुद्द्यांवर प्रगती साधण्यासाठी विविध स्तरांवर सल्लामसलत सुरू ठेवण्यावर सहमती व्यक्त केली.
भारत आणि चीन यांच्यात राजनैतिक संबंध स्थापनेच्या 75 वर्षांचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठल्याचेही राजनाथ सिंह यांनी अधोरेखित केले. पाच वर्षांनंतर कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
राजनाथ सिंह यांनी त्यांच्या चीनी संरक्षणमंत्र्यांना 22 एप्रिल 2025 रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे निष्पाप नागरिकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची माहिती दिली तसेच पाकिस्तानमधील दहशतवादी नेटवर्क नष्ट करण्याच्या उद्देशाने भारताने सुरू केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ बद्दलही माहिती दिली.
Matribhumi Samachar Marathi

