Monday, January 05 2026 | 08:10:34 AM
Breaking News

सुरळीत लॉजिस्टिक्स व्यवस्थापन हा ऑपरेशन सिंदूरच्या यशातला एक निर्णायक घटक: संरक्षणमंत्री

Connect us on:

“सशस्त्र दलांची हलवाहलव असो किंवा योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी सामग्री  पोहोचवणे असो  – आपल्या यंत्रणांनी केलेले सुरळीत  लॉजिस्टिक्स व्यवस्थापन ऑपरेशन सिंदूरच्या यशात एक निर्णायक घटक होता,” असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 27 जुलै 2025 रोजी वडोदरा येथील गति शक्ती विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला दूरदृश्य प्रणालीमार्फत संबोधित करताना सांगितले. आजच्या युगात युद्धे केवळ बंदुका आणि गोळ्यांनी जिंकली जात नाहीत तर त्या वेळेवर पोहोचवण्याने जिंकली जातात. ऑपरेशन सिंदूर हे उत्कृष्ट लॉजिस्टिक्स व्यवस्थापनाचे एक उत्तम उदाहरण आहे, असेही ते म्हणाले.

संरक्षण मंत्री यांनी यावर भर दिला की लॉजिस्टिक्सकडे केवळ वस्तू पोहोचवण्याची प्रक्रिया म्हणून न पाहता सामरिक महत्त्वाच्या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. “सीमेवर लढणारे सैनिक असोत किंवा आपत्ती व्यवस्थापनात गुंतलेले कर्मचारी असोत, समन्वय किंवा संसाधनांचे योग्य व्यवस्थापन नसले तर, कितीही मजबूत हेतू असले तरी कमकुवत होतात. लॉजिस्टिक्स ही अशी शक्ती आहे जी अव्यवस्थेला नियंत्रणात रूपांतरित करते, असेही ते म्हणाले.

राजनाथ सिंह यांनी देशाच्या आर्थिक प्रगतीमध्ये लॉजिस्टिक्सचे महत्त्व अधोरेखित केले. उत्पादनपूर्व टप्प्यापासून ते उपभोगापर्यंतचा प्रत्येक टप्पा जोडणारा एक महत्त्वाचा आधारस्तंभ म्हणून त्यांनी लॉजिस्टिक्सचे वर्णन केले. भारताच्या राष्ट्रीय सकल  उत्पादनात लॉजिस्टिक्सचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगितले.

संरक्षण मंत्र्यांनी निदर्शनास आणून दिले की गेल्या 11 वर्षांत भारताने पायाभूत सुविधांचा अभूतपूर्व विकास अनुभवला असून या परिवर्तनाचा पाया धोरणात्मक सुधारणांद्वारे आणि मिशन आधारित प्रकल्पांद्वारे घातला गेला आहे.

पंतप्रधान गतिशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन अंतर्गत, रेल्वे, रस्ते, बंदरे, जलमार्ग, विमानतळ, सार्वजनिक वाहतूक आणि लॉजिस्टिक्स पायाभूत सुविधा यासारखे विकासाचे सात बळकट स्तंभ एकत्र येऊन भारताच्या अर्थव्यवस्थेला एक मजबूत आधार  प्रदान करत  आहेत असेही ते म्हणाले.

या उपक्रमाचे उद्दिष्ट एकात्मिक, कार्यक्षम आणि किफायतशीर लॉजिस्टिक्स नेटवर्क तयार करणे आहे जे केवळ लॉजिस्टिक्स खर्च कमी करत नाही तर माहितीवर आधारित निर्णय घेण्यास देखील प्रोत्साहन देईल, असे राष्ट्रीय लॉजिस्टिक्स धोरणाबाबत बोलताना संरक्षण मंत्र्यांनी सांगितले.

गति शक्ती विद्यापीठाने बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेबद्दल, राजनाथ सिंह म्हणाले की तरुण ज्या ‘गती’द्वारे देशाला ‘शक्ती’ प्रदान करत आहेत ती कौतुकास्पद आहे. “लॉजिस्टिक्सच्या बाबतीत देशातील सर्वात प्रतिष्ठित अभ्यास केंद्रांपैकी एक, गति शक्ती विद्यापीठ ही केवळ एक शैक्षणिक संस्था नाही, तर ती एक कल्पना आहे, एक ध्येय आहे. भारताला जलद, संघटित आणि समन्वित पद्धतीने पुढे नेण्याच्या राष्ट्रीय आकांक्षेला हे विद्यापीठ मूर्त रूप देत आहे ,” असे ते म्हणाले.

विद्यार्थ्यांनी केवळ नोकरी मिळवण्या पुरते मर्यादित न राहता समस्यांचे निराकरण करणारे बनावे, असे आवाहन राजनाथ सिंह यांनी केले.

रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत 2022 मध्ये केंद्रीय विद्यापीठ म्हणून स्थापन झालेले गतिशक्ती विद्यापीठ हे लॉजिस्टिक्स आणि वाहतूक क्षेत्रात जागतिक दर्जाचे कौशल्य निर्माण करण्यासाठी समर्पित आहे.

About Matribhumi Samachar

Check Also

आयुष निर्यात प्रोत्साहन परिषदेने नवी दिल्ली येथे साजरा केला चौथा स्थापना दिन

भारतीय पारंपरिक औषध प्रणाली आणि आरोग्यविषयक उत्पादनांच्या निर्यातीला चालना देण्यासाठी भारताच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून …