Monday, December 08 2025 | 07:21:00 AM
Breaking News

डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या तीन नवीन उपक्रमांचे उदघाटन; दोन नवीन सी-बँड डॉपलर हवामान रडार, सौर पॅनल प्रणाली आणि हवामाविषयक संग्रहालय यांचा समावेश

Connect us on:

नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर 2025. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार); भूविज्ञान राज्यमंत्री; पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रार, निवृत्तीवेतन, अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या तीन प्रमुख उपक्रमांचे उद्घाटन केले. यामध्ये रायपूर आणि मंगळुरू येथे दोन अत्याधुनिक डॉपलर हवामान रडार, मौसम भवन येथे एक नवीन सौर ऊर्जा प्रणाली आणि विद्यार्थी आणि तरुण विद्यार्थ्यांना समर्पित हवामानशास्त्र संग्रहालय यांचा समावेश आहे.

या कार्यक्रमाला संबोधित करताना जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्त्वाखाली भारतीय हवामानशास्त्र विभाग ‘मिशन मौसम’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची अंमलबजावणी झपाट्याने करत आहे. भारतीय हवामान विभागाच्या 150 व्या स्थापना दिनाच्या समारंभात 14 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी मिशन मौसमचे लोकार्पण केले होते, याचे त्यांनी स्मरण केले.

त्यावेळी देशाची रडार प्रणाली तिपटीने वाढवण्याचा संकल्प पंतप्रधानांसमोर करण्यात आला होता. आम्ही 2027 पर्यंत देशातील रडार संख्या 47 वरून जवळपास तिप्पट करण्यासाठी वचनबद्ध असून आपण आताच 126 रडार इतका टप्पा पूर्ण केला आहे, असे त्यांनी सांगितले. आपल्याकडे अजूनही दोन वर्षे आहेत, आणि मला खात्री आहे की, आपण हे उद्दिष्ट ठरलेल्या मुदतीत निश्चितच साध्य करु, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

डॉ. जितेंद्र सिंह यांनी यावर भर दिला की, डॉपलर वेदर (हवामान) रडार ही हवामान पायाभूत सुविधांमधील सर्वात दृश्यमान आणि प्रभावी घटकांपैकी एक आहेत, ज्यांचे महत्त्व नागरिक, आपत्ती व्यवस्थापक आणि धोरणकर्ते यांच्यासाठी समान आहे.

रायपूर येथील इंदिरा गांधी कृषी विद्यापीठात ड्युएल पोलराइज्ड, सॉलिड-स्टेट पॉवर ॲम्प्लिफायर-आधारित सी-बँड डॉपलर हवामान रडार बसवण्यात आले आहे – छत्तीसगडमधील हे पहिलेच रडार आहे. 250 किमीच्या परिघाच्या ‘कव्हरेज’ सह, ते मान्सूनचे कमी दाबाचे क्षेत्र, कमी दाबाचे घटक, मुसळधार पाऊस, मेघगर्जनेसह होणारी वादळे, वीज, गारपीट, चक्रीवादळे आणि अशांतता शोधू शकते. त्याची निरीक्षण क्षमता छत्तीसगड, अंतर्गत ओडिशा, पूर्व मध्य प्रदेश, नैऋत्य झारखंड आणि पूर्व उत्तर प्रदेशच्या दक्षिणेकडील भागांपर्यंत पसरलेली आहे, ज्यामुळे दीर्घकालीन आकडेवारीमधील तफावत भरून निघेल आणि या प्रदेशांमध्ये हवामान शास्त्र विभागाच्या अंदाज क्षमतांमध्ये लक्षणीय सुधारणा होईल.

मंगळुरूतील शक्ती नगर येथील आयएमडीच्या आरएस/आरडब्ल्यू कार्यालयात बसवलेले दुसरे ड्युएल पोलराइज्ड सी-बँड डॉपलर हवामान रडार, चक्रीवादळ, वादळे, मुसळधार पाऊस, वीज, गारपीट आणि अशांतता यासारख्या गंभीर हवामान प्रणालींचे प्रगत निरीक्षण करेल. 250 किमी ‘कव्हरेज’सह कर्नाटकला लागून असलेल्या अरबी समुद्राचे, गोवा आणि दक्षिण कोकणचे क्षेत्र, उत्तर लक्षद्वीप आणि कर्नाटक, केरळ, गोवा आणि दक्षिण महाराष्ट्राच्या भूभागांचे निरीक्षण हे रडार करेल. हे कर्नाटकचे पहिले आयएमडी रडार आहे आणि ते पश्चिम किनाऱ्यावरील आपत्ती सज्जता मजबूत करण्यासाठी, हवामानाची सद्यस्थिती तसेच लघु-श्रेणीच्या अंदाजासाठी महत्त्वपूर्ण असेल. दोन्ही रडार ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत स्वदेशी पद्धतीने विकसित केली गेली आहेत.

डॉ. जितेंद्र सिंह यांनी आयएमडीला शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी संरचित शैक्षणिक दौरे आयोजित करण्यास प्रोत्साहित केले आणि संग्रहालयाला “वैज्ञानिक उत्क्रांतीच्या शतकातील प्रवास” असे संबोधले.

भारताच्या स्वच्छ ऊर्जा मोहिमेशी सुसंगत राहून आयएमडीने मौसम भवन संकुलामध्ये 771 किलोवॅट क्षमतेची सौर ऊर्जा प्रणाली बसवली आहे, ज्यामध्ये एनबीसीसी द्वारे स्थापित केलेले 1,315 सौर पॅनेल्स बसविण्यात आले आहेत.

या प्रसंगी बोलताना, पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन म्हणाले की आयएमडीने आता 50% पेक्षा जास्त रडार व्याप्ती गाठली आहे आणि दिल्ली, चेन्नई, मुंबई आणि कोलकाता येथील शहरी रडार तसेच जम्मू आणि काश्मीर, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश या हिमालयीन राज्यांसाठी प्रगत रडारसह अतिरिक्त रडारची योजना टप्प्याटप्प्याने आखली जात आहे.

आजचे प्रक्षेपण भारताच्या 2047 पर्यंत विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या पाठपुराव्यामध्ये पारंपरिक ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्यासाठी, आपत्ती तयारीचा विस्तार करण्यासाठी आणि स्वच्छ ऊर्जेसाठी देशाच्या वचनबद्धतेला पुढे नेण्यासाठी आयएमडीच्या योगदानाचे प्रतिनिधित्व करत आहे, अशा शब्दांत डॉ. जितेंद्र सिंह यांनी समारोप केला. हवामान सेवा आणि आपत्ती सल्लागार प्रणालींद्वारे शेजारील देशांना पाठिंबा देऊन “विश्व बंधू” म्हणून उदयास आल्याबद्दल त्यांनी आयएमडीचे कौतुक केले.

About Matribhumi Samachar

Check Also

देशभरातल्या किनारी राज्यांसाठी मत्स्यपालन सहकारी संस्थांसाठी प्रगत क्षमता बांधणी कार्यक्रमाचे व्हॅम्निकॉमकडून आयोजन

वैकुंठभाई मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेने (व्हॅमनिकॉम), नव्या नोंदणीकृत मत्स्यपालन सहकारी संस्थांसाठी सहकारी संस्थांचे प्रशासन …