नवी दिल्ली, 28 जानेवारी 2025. रायसीना हिल्सवर मावळत्या सूर्याच्या साक्षीने, 29 जानेवारी 2025 रोजी प्रतिष्ठेचा विजय चौक 76 व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याच्या सांगतेसाठी आयोजित होणाऱ्या बिटिंग रिट्रिट कार्यक्रमात भारतीय सुरांमध्ये मंत्रमुग्ध होण्यासाठी सज्ज झाला आहे. भारतीय लष्कर, भारतीय नौदल आणि भारतीय हवाई दल आणि केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाची बँड पथके राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, इतर केंद्रीय मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि सर्वसामान्य नागरिक यांचा समावेश असलेल्या मान्यवर प्रेक्षकांसमोर ठेका धरायला लावणाऱ्या 30 भारतीय गीतांच्या धुन सादर करतील.
सामूहिक बँडची कदम कदम बढाये जा ही धुन वाजवून या कार्यक्रमाचा प्रारंभ होईल, त्यानंतर अमर भारती, इंद्रधनुष, जय जनम भूमी, नाती इन हिमालयन व्हॅली, गंगा जमुना आणि वीर सियाचेन या धुन पाईप्स अँड ड्रम्स बँडकडून वाजवल्या जातील. सीएपीएफ बँड विजय भारत, राजस्थान ट्रूप्स, ऐ वतन तेरे लिये आणि भारक के जवान या धुन वाजवेल. भारतीय हवाई दलाचा बँड गॅलॅक्सी रायडर, स्ट्राईड, रुबरू आणि मिलेनियम फ्लाईट फॅन्टसी या धुनचे तर नौदलाचा बँड राष्ट्रीय प्रथम, निशाक निष्पाद, आत्मनिर्भर भारत, स्प्रेड द लाईट ऑफ फ्रीडम, रिदम ऑफ द रीफ आणि जय भारतीचे वादन करेल. त्यानंतर लष्कराचा बँड वीर सपूत, ताकत वतन, मेरा युवा भारत, ध्रुव आणि फौलाद का जिगर या धुन वाजवणार आहे.
त्यानंतर मास्ड बँड्स प्रियम भारतम, ऐ मेरे वतन के लोगो आणि ड्रमर्स कॉल या धुनचे वादन करेल. बिगुल वादकांनी वाजवलेल्या सर्वाधिक लोकप्रिय सारे जहां से अच्छा या धुनच्या वादनाने या कार्यक्रमाचा समारोप होईल.
मनोज सेबॅस्टियन हे सोहळ्याचे प्रिन्सिपल कंडक्टर असतील. सुभेदार मेजर( मानद कॅप्टन) बिशन बहादूर लष्कराच्या बँडचे कंडक्टर असतील तर एम अँटनी, एमसीपीओ एमयूएस II आणि वॉरन्ट ऑफिसर अशोक कुमार हे अनुक्रमे नौदलाच्या आणि भारतीय हवाई दलाच्या बँडचे कंडक्टर असतील.
पाईप्स अँड ड्रम्स हा बँड सुभेदार मेजर अभिलाष सिंग यांच्या सूचनांनुसार धुन वाजवेल तर नायब सुभेदार भूपाल सिंग यांच्या नेतृत्वाखाली बिगुलवादक आपले वादन सादर करतील.
Matribhumi Samachar Marathi

