नवी दिल्ली, 28 डिसेंबर 2025. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पश्चिम किनाऱ्यावर पाणबुडी आयएनएस वाघशीरमधून पाण्याखालून प्रवास केला. नौदलप्रमुख ऍडमिरल दिनेश के. त्रिपाठी यावेळी राष्ट्रपतींसोबत होते. त्यांनी आज (डिसेंबर 28, 2025) कर्नाटकातील कारवार नौदल बंदर येथे पाणबुडीमध्ये प्रवेश केला. सुमारे 2 तास चाललेल्या या फेरीदरम्यान त्यांनी पाणबुडीतील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला आणि परिचालनाची पाहणी केली.
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्यानंतर पाणबुडीमध्ये प्रवास करणाऱ्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या दुसऱ्या राष्ट्रपती ठरल्या आहेत.
स्वदेशी कलवरी-वर्गातील पाणबुडीवर प्रथमच करण्यात आलेला हा प्रवास, सर्वोच्च सेनापती म्हणून राष्ट्रपतींचा सशस्त्र दलांशी कार्यकारी स्तरावर असलेला सातत्यपूर्ण संपर्क दर्शवितो. यापूर्वी नोव्हेंबर 2024 मध्ये राष्ट्रपतींनी स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत वर भारतीय नौदलाचे परिचालन प्रात्यक्षिक पाहिले होते.
यानंतर भेट नोंदवहीत राष्ट्रपतींनी आपल्या भावना व्यक्त करत एक संक्षिप्त टिप्पणी लिहिली. त्यामध्ये त्या म्हणाल्या, “आयएनएस वाघशीरवर आमचे नौसैनिक आणि अधिकाऱ्यांसोबत प्रवास करणे, पाण्याखाली जाणे आणि त्यांच्यासोबत वेळ घालवणे हा माझ्यासाठी खरोखरच एक अत्यंत विशेष अनुभव होता. आयएनएस वाघशीर कडून करण्यात आलेल्या अनेक यशस्वी चाचण्या आणि आव्हानात्मक मोहिमा या ‘वीरता वर्चस्व विजया’ या ब्रीदवाक्यानुसार कर्मचाऱ्यांची तयारी आणि समर्पण दर्शवितात. वाघशीर पाणबुडीतील कर्मचाऱ्यांची शिस्त, आत्मविश्वास आणि उत्साह पाहून कोणत्याही धोक्याला आणि सर्व परिस्थितींमध्ये तोंड देण्यासाठी आमच्या पाणबुड्या आणि भारतीय नौदल पूर्णतः युद्धसज्ज असल्याचा मला विश्वास वाटतो.”
Matribhumi Samachar Marathi

