Wednesday, December 24 2025 | 03:09:57 AM
Breaking News

इलेक्ट्रिक वाहन उत्पादन आणि स्वच्छ वाहतूक प्रणाली बळकट करण्यासाठी डीपीआयआयटी आणि एथर एनर्जी यांच्यात सामंजस्य करार

Connect us on:

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाने (डीपीआयआयटी) भारतातील स्वच्छ वाहतूक प्रणाली आणि प्रगत उत्पादन क्षेत्रांच्या वाढीला गती देण्यासाठी भारतीय इलेक्ट्रिक वाहन उत्पादक एथर एनर्जी लिमिटेडसोबत सामंजस्य करार केला आहे. ही भागीदारी स्टार्टअप धोरण मंचाच्या ‘बिल्ड इन भारत’ उपक्रमाचा एक भाग आहे. हा मंच नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करणाऱ्या 50 हून अधिक स्टार्टअप्सचा एक गट आहे.

या सामंजस्य करारान्वये डीपीआयआयटी आणि एथर एनर्जी यांच्यात सर्वसमावेशक भागीदारी उभारली जाणार असून, त्यामध्ये डीप-टेक स्टार्टअप्ससाठी धोरणात्मक मार्गदर्शन, इलेक्ट्रिक वाहन मूल्यसाखळीतील स्टार्टअप्ससाठी पायाभूत सुविधा, भारत स्टार्टअप ग्रँड चॅलेंज यासारखे संयुक्त नावीन्यपूर्ण उपक्रम,  कौशल्य विकास उपक्रम, स्टार्टअप महाकुंभ  यासारख्या कार्यक्रमात सहभाग तसेच प्रत्यक्ष भेटी आदी गोष्टींचा यात समावेश असणार आहे. डीपीआयआयटीचे सहसचिव संजीव सिंग आणि एथर एनर्जीचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी तरुण मेहता यांच्या उपस्थितीत या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या  उपक्रमाततून भारताच्या पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना देण्याबरोबरच उत्पादन-केंद्रित स्टार्टअप्ससाठी सक्षम वातावरण निर्माण करण्यावर भर देण्यात येणार आहे.

भारतीय इलेक्ट्रिक वाहतूक प्रणाली एका परिवर्तनाच्या टप्प्यावर असून, एथर एनर्जीबरोबरच्या या भागीदारीद्वारे स्टार्टअप्ससाठी इलेक्ट्रिक वाहन उत्पादन, बॅटरी नवोन्मेष आणि स्वच्छ ऊर्जा उपाय यामध्ये योगदान देण्यासाठी सक्षम वातावरण निर्माण करणे हा आमचा उद्देश आहे, असे डीपीआयआयटीचे सह सचिव  संजीव सिंग याप्रसंगी म्हणाले. तर डीपीआयआयटीसोबत भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे, असे एथर एनर्जीचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी तरुण मेहता म्हणाले.  हार्डवेअर आणि डीप-टेक स्टार्टअप्ससाठी आधारभूत सुविधा बळकट  करण्याच्या दिशेने हे पाऊल असून , धोरणात्मक पाठबळ आणि उद्योग सहभाग वाढल्यास, या उपक्रमाद्वारे तंत्रज्ञानविषयक मूळ आव्हानांचा सामना करत उच्च दर्जाची उत्पादने भारतातून मोठ्या प्रमाणावर विकसित करता येतील, असे मेहता यांनी सांगितले.

डीपीआयआयटी आणि एथर एनर्जी यांच्यातील ही भागीदारी स्टार्टअप धोरण मंचच्या बिल्ड इन भारत उपक्रमाचे मूर्त रूप आहे, असे स्टार्टअप धोरण मंचच्या अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्वेता राजपाल कोहली यावेळी म्हणाल्या. सहकार्याच्या माध्यमातून भारताच्या उत्पादन क्षेत्राची क्षमता उलगडणे, जागतिक स्तरावरील नाविन्यपूर्ण परिसंस्था उभारण्यासाठी अत्यावश्यक असून, या सहकार्यामुळे ईव्ही आणि उत्पादन क्षेत्रातील स्टार्टअप्ससाठी नव्या संधी निर्माण होतील, असेही त्यांनी सांगितले.  भारताच्या हवामानदृष्ट्या संवेदनशील आणि औद्योगिक उद्दिष्टांशी हे सुसंगत असून, यामुळे भविष्यात आत्मनिर्भर स्टार्टअप परिसंस्थेला बळकटी मिळेल.

About Matribhumi Samachar

Check Also

आर्थिक गुंतवणूक आणि विकासाच्या प्रमुख प्रेरक घटकांपैकी सुरक्षा एक घटक आहे: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

नवी दिल्‍ली, 23 डिसेंबर 2025. राष्ट्रपती  द्रौपदी मुर्मू यांनी आज (23 डिसेंबर 2025) नवी दिल्ली येथे …