मुंबई, 30 जुलै 2025. केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्रालयाने भारतीय आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघ (ट्रायफेड) या संस्थेच्या पाठबळासह मुंबईत जहांगीर कला दालनात “आदि चित्र” नामक राष्ट्रीय आदिवासी चित्रांचे प्रदर्शन भरवले आहे. आठवडाभर चालणाऱ्या या प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याच्या आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे यांच्या हस्ते झाले. मंगळवार दिनांक 29 जुलै 2025 रोजी झालेल्या उद्घाटन समारंभात आदिवासी कलाकार, अधिकारी आणि या कलेचे अनेक जाणकार तज्ञ उपस्थित होते. पद्मश्री पुरस्काराने गौरवलेले तसेच आदिवासी कलेसाठी अनेक राष्ट्रीय मानसन्मान मिळवलेले कलाकार परेश राथवा देखील यावेळी उपस्थित होते. मुंबईत काळा घोडा येथील जहांगीर कला दालनात दिनांक 29 जुलै ते 4 ऑगस्ट या कालावधीत हे प्रदर्शन रसिकांसाठी खुले असेल.
6SMB.jpeg)
उद्घाटन प्रसंगी बोलताना ट्रायफेडचे मुंबई विभागाचे क्षेत्रीय व्यवस्थापक अजित वाच्छानी म्हणाले की हे प्रदर्शन राष्ट्रीय मंचांच्या माध्यमातून आदिवासी कलाकारांना शाश्वत स्वरुपाची उपजीविका मिळवणे शक्य करून देतानाच आदिवासी प्रतिभा आणि संस्कृती यांना प्रोत्साहन देण्याच्या ट्रायफेडच्या बांधिलकीचे दर्शन घडवते.

“आदि चित्र” या प्रदर्शनासाठी देशभरातील 100 हून अधिक आदिवासी कलाकृती एकत्र करण्यात आल्या असून त्यांतून आदिवासी समुदायांचा चैतन्यमय वारसा, अध्यात्मिकता आणि निसर्गाशी निगडीत कथाकथन परंपरा यांच्यावर अधिक भर देण्यात आला आहे. सदर प्रदर्शनात महाराष्ट्रातील वारली चित्रकला, मध्य प्रदेशातील गोंड तसेच भील कला, गुजरातमधील पिथोरा चित्रे तसेच ओदिशामधील सौरा आणि पट्टचित्रे बघायला मिळतील. “आदि चित्र” हे केवळ कलेचे सादरीकरण नसून निसर्ग, अध्यात्मिकता आणि सामुदायिक जीवन यांच्यात रुजलेल्या कथाकथन परंपरांचा उत्सव आहे. यातील प्रत्येक चित्रातून भारतातील आदिवासी समुदायांचे वंशपरंपरागत ज्ञान आणि ओळख यांचे दर्शन घडते.
WDBE.jpeg)
या प्रदर्शनाला भेट देऊन भारतातील आदिवासी वारशाची परंपरेचा शोध आणि उत्सव साजरा करण्यासाठी अभ्यागतांना प्रोत्साहन देण्यात येत आहे.

Matribhumi Samachar Marathi

