Tuesday, December 09 2025 | 10:10:19 AM
Breaking News

नवी दिल्लीच्या प्रगती मैदानावर राष्ट्र, फॅशन आणि परिवर्तन यासाठी खादीचे प्रदर्शन करणाऱ्या केव्हीआयसीचा “नवयुग खादी फॅशन शो”

Connect us on:

मुंबई, 30 नोव्हेंबर 2025

नवी दिल्लीच्या प्रगती मैदानावर 29 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय हस्तकला संग्रहालय आणि हस्तकला अकादमी येथे  नवयुग खादी फॅशन शो आयोजित करण्यात आला होता. यामध्ये “नवीन भारताची नवीन खादी” समकालीन आणि नाविन्यपूर्ण पद्धतीने सादर करण्यात आली. या कार्यक्रमात सर्जनशील आणि दूरदर्शी डिझाइनद्वारे खादीच्या आधुनिकतेवर प्रकाश टाकण्यात आला. संबंधित प्रदर्शनाचे उद्घाटन 28 नोव्हेंबर रोजी करण्यात आले, यात खादी ज्ञान पोर्टलचा दुसरा खंडदेखील लाँच करण्यात आला.

केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे (केव्हीआयसी) अध्यक्ष मनोज कुमार या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी रॅम्पवर प्रदर्शित केलेल्या कपड्यांचे आणि खादी कारागिरांच्या समर्पणाचे, तसेच कारागिरीचे कौतुक केले.

मनोज कुमार यांनी खादीच्या पुनरुज्जीवनाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाला दिले. पंतप्रधानांनी खादीला केवळ एका कापडापासून पुढे नेत देशभक्तीचे प्रतीक, तसेच आधुनिक भारतीय जीवनशैलीचे प्रतीक बनवले आहे असे त्यांनी सांगितले. “राष्ट्रासाठी खादी, फॅशनसाठी खादी आणि परिवर्तनासाठी खादी” – या पंतप्रधानांच्या मार्गदर्शक मंत्राचा त्यांनी पुनरुच्चार केला – यामुळेच खादीला एक नवीन ओळख मिळाली आहे याची त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

“आज खादी ही केवळ पूज्य बापूंचा वारसा पुढे नेत नाही तर समकालीन डिझाइन आणि जागतिक फॅशनमध्येही वेगाने अस्तित्व निर्माण करत आहे. खादी आता फक्त गावांपुरती मर्यादित नाही; ती शहरांमध्ये, फॅशन रॅम्पवर आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वाढत्या प्रमाणात स्वीकारली जात आहे,” असे मनोज कुमार म्हणाले.

नवीन युगातील खादीमध्ये डिझाइन, तंत्रज्ञान आणि परंपरा यांचा समन्वय आहे यावर त्यांनी भर दिला. खादीला तरुण पिढीची पसंती मिळाली आहे आणि ती रोजगार निर्मिती, पर्यावरणीय शाश्वतता आणि देशाच्या स्वावलंबनाच्या प्रवासाशी जोडलेली आहे, असे त्यांनी सांगितले.

हा कार्यक्रम केव्हीआयसी, सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर खादी (सीओईके), नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (एनआयएफटी) आणि फॅशन डिझाईन काऊन्सिल ऑफ इंडिया (एफडीसीआय) यांनी संयुक्तपणे आयोजित केला होता. यावेळी रॅम्पवर खादीचे विविध कपडे आणि उत्पादने प्रदर्शित करण्यात आली होती, ज्याला प्रेक्षकांकडून मोठी दाद मिळाली. भारतातील खादी संस्थांचे प्रतिनिधी आणि कारागीर रॅम्पवर आले, तेव्हा विशेष प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले. केव्हीआयसीचे अध्यक्ष मनोज कुमार हेदेखील कारागिरांमध्ये सामील झाले,-होते. त्यांनी खादीची खरी ताकद त्याच्या विणकरांमध्ये आणि निर्माणकर्त्यांमध्ये आहे हा संदेश दिला – हे निश्चितच “गावापासून ग्लॅमरपर्यंतच्या प्रवासाचे” एक शक्तिशाली चित्रण होते.

केव्हीआयसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, एमएसएमई मंत्रालयाचे सहसचिव (ए अँड आरई), एमएसएमई मंत्रालयाचे आर्थिक सल्लागार आणि केव्हीआयसीचे आर्थिक सल्लागार, सीओईकेचे संचालक आणि इतर वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

खादीला अधिक समकालीन आणि भविष्यासाठी सज्ज बनवण्याच्या दिशेने नवयुग खादी हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. पहिल्यांदाच, एका समर्पित डिझायनर टीमच्या मार्गदर्शनाखाली, देशभरातील खादी संस्थांनी बनवलेल्या साड्या, कपडे, अ‍ॅक्सेसरी आणि गृहसजावटीच्या उत्पादनांचे प्रदर्शन एकाच छताखाली करण्यात आले आहे. या प्रदर्शनात ओडिशातील इकत, आसाममधील एरी सिल्क, गुजरातमधील टांगालिया, कर्नाटकातील सिल्क, बंगालमधील सूती आणि तेलंगणा आणि बिहारमधील पारंपरिक विणकाम यासारख्या विविध प्रादेशिक हस्तकला एकत्र आल्या आहेत- हे पंतप्रधानांच्या “नवीन भारतासाठी नवीन खादी” या दृष्टिकोनाचे प्रतीक आहे. अशा प्रकारे खादीला आधुनिक, सर्वसमावेशक आणि जागतिक स्तरावर संबंधित कापड वारसा म्हणून सादर केले जात आहे

या प्रदर्शनात खादी ज्ञान पोर्टल (खंड II) चे देखील उद्घाटन करण्यात आले. केव्हीआयसी अध्यक्षांनी खादी संस्थांशी संवाद साधून त्यांच्या गरजा समजून घेतल्या आणि केव्हीआयसीकडून त्यांना सदैव पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले.

हा कार्यक्रम 3 डिसेंबर 2025 पर्यंत सकाळी 11:00 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत सुरू राहील, ज्यामध्ये प्रदर्शने, विक्री काउंटर आणि हाताने सूत कातणे, नैसर्गिक रंगकाम आणि साडीचे ड्रेपिंग यावरील कार्यशाळा असतील. या प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांना संवादात्मक सत्रांद्वारे खादीचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.

About Matribhumi Samachar

Check Also

मेटल-जी च्या उत्पादनात आघाडीवर असलेल्या देशांमध्ये भारत समाविष्ट

मुंबई, 8 डिसेंबर 2025 अधिक स्वच्छ, अधिक हरित भविष्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलत, जड पाणी  …