उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन, आज हरियाणातील कुरुक्षेत्र येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (NIT) च्या 20 व्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले. यावेळी बोलताना उपराष्ट्रपती म्हणाले की, कुरुक्षेत्र ही एक पवित्र भूमी आहे, जी आपल्याला आठवण करून देते की अधर्म कितीही शक्तिशाली वाटला तरी धर्माचाच नेहमी विजय होईल.
दीक्षांत समारंभ केवळ एक सोहळा नसून, वर्षांनुवर्षे केलेल्या समर्पणाचे रूपांतर अभिमान, आशा आणि संधींनी भरलेल्या एका नवीन प्रारंभामध्ये होण्याचा तो क्षण असतो, असे त्यांनी नमूद केले. जागतिक परिवर्तनाच्या गतीवर प्रकाश टाकताना त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, नवीकरणीय ऊर्जा प्रणाली, अवकाश तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, सायबर सुरक्षा आणि सेमीकंडक्टर यांसारख्या क्षेत्रांमधील विकासाविषयी सांगितले.
संशोधन, नवोन्मेष आणि भारताशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी सखोल काम करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत, ते म्हणाले की ही दोन इंजिने भारताच्या तांत्रिक नेतृत्वाला चालना देतील. शाश्वत उत्पादन, स्मार्ट गतिशीलता, क्वांटम तंत्रज्ञान, आरोग्यसेवा तंत्रज्ञान, कृषी नवोन्मेष आणि हरित पायाभूत सुविधा यांसारख्या राष्ट्रीय महत्त्वाच्या उदयोन्मुख क्षेत्रांचा शोध घेण्याची युवा नवोन्मेषकांना गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
संस्थेच्या सर्वांगीण शिक्षणावरील संस्थेने लक्ष केंद्रित केल्याचे कौतुक करताना, त्यांनी ‘सेंटर फॉर होलिस्टिक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट’ (CHPD) च्या स्थापनेबद्दल आनंत व्यक्त केला, जे भगवद्गीता, सार्वत्रिक मानवतावादी मूल्ये, संज्ञानात्मक विज्ञान आणि मानसिक आरोग्य यावरील अभ्यासक्रमांद्वारे बौद्धिक, भावनिक आणि नैतिक वाढीला प्रोत्साहन देत आहे.
विकसित भारत @ 2047 च्या राष्ट्रीय दृष्टीकोनाचे वर्णन करताना, एनआयटी कुरुक्षेत्रचे पदवीधर हे उद्दिष्ट साधण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील, असा विश्वास उपराष्ट्रपतींनी व्यक्त केला. संस्थेला आतापर्यंत 64 पेटंट्स मिळाली आहेत, जी संशोधन, नवोन्मेष आणि बौद्धिक संपदा निर्मितीच्या मजबूत संस्कृतीचे प्रतिबिंब आहे, याची त्यांनी कौतुकाने दखल घेतली. अंमली पदार्थांना नकार द्या, असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना शिस्तबद्ध जीवन जगण्याचे देखील आवाहन केले.
आपल्या भाषणाचा समारोप करताना, त्यांनी पदवीधरांना आठवण करून दिली की त्यांची पदवी हा शेवट नसून एका नवीन जबाबदारीची सुरुवात आहे. त्यांनी त्यांना सर्जनशीलता, नम्रता आणि करुणेने समाजाची सेवा करण्याचे आवाहन केले.
Matribhumi Samachar Marathi

