नवी दिल्ली, 29 डिसेंबर 2025. उत्पादन क्षेत्रातील 8.0 टक्के वाढीमुळे, नोव्हेंबर 2025 मध्ये औद्योगिक उत्पादन निर्देशांकाने वर्षांगणिक पातळीवर 6.7 टक्के इतकी वाढ नोंदवली आहे. या वाढीअंतर्गत प्रामुख्याने मूळ धातू आणि धातूच्या उत्पादनांची निर्मिती, औषधनिर्माण आणि मोटार वाहने ही क्षेत्रे आघाडीवर आहेत.
पावसाळा संपल्यामुळे आणि लोह खनिजासारख्या धातू खनिजांच्या उत्पादनात झालेल्या भरभक्कम वाढीमुळे, खाण क्षेत्रातील वृद्धीदराने देखील 5.4 टक्क्यांसह पुन्हा एकदा वेग धरला आहे.
औद्योगिक उत्पादन निर्देशांकाचा त्वरित अंदाज दर महिन्याच्या 28 तारखेला (किंवा 28 तारखेला सुट्टी असल्यास कामाच्या पुढच्या दिवशी) प्रसिद्ध केला जातो. उत्पादन करणाऱ्या कारखान्यांकडून/प्रतिष्ठानांकडून माहिती संकलित करणाऱ्या आणि स्त्रोत म्हणून कार्यरत असलेल्या विविध संस्थांकडून प्राप्त झालेल्या माहितीसाठ्याच्या आधारे हा निर्देशांक मांडला जातो. सुधारित धोरणानुसार, नव्याने प्रकाशित होणाऱ्या या प्राथमिक अंदाजांमध्ये बदल होऊ शकतात.
ठळक वैशिष्ट्ये:
- नोव्हेंबर 2025 मधील औद्योगिक उत्पादन निर्देशांकाचा वृद्धीदर 6.7 टक्के आहे, ऑक्टोबर 2025 मध्ये हा दर 0.4 टक्के (त्वरित अंदाज) इतका होता.
- नोव्हेंबर 2025 साठी खाणकाम, उत्पादन आणि वीज या तीन क्षेत्रांचे वृद्धीदर अनुक्रमे 5.4 टक्के, 8.0 टक्के आणि (-)1.5 टक्के इतके नोंदवले गेले.
- नोव्हेंबर 2024 मधील 148.1 च्या तुलनेत नोव्हेंबर 2025 मध्ये औद्योगिक उत्पादन निर्देशांकाचा त्वरित अंदाज 158.0 वर पोहोचला.
- उत्पादन क्षेत्रामध्ये, राष्ट्रीय औद्योगिक वर्गीकरणाच्या 2-अंकी पातळीवरील 23 पैकी 20 उद्योग गटांनी नोव्हेंबर 2025 मध्ये सकारात्मक वाढ नोंदवली आहे.

वापर आधारित वर्गीकरणानुसार नोव्हेंबर 2025 साठीचे निर्देशांक खाली नमूद केल्याप्रमाणे आहेत:
- प्राथमिक वस्तूमाल : 150.7
- भांडवली वस्तूमाल : 117.8
- मध्यवर्ती वस्तूमाल : 170.1
- पायाभूत सुविधा/बांधकाम विषयक वस्तूमाल : 198.7
नोव्हेंबर 2025 च्या औद्योगिक उत्पादन निर्देशांकाच्या वाढीअंतर्गत पायाभूत सुविधा/बांधकाम विषयक वस्तूमाल, मध्यवर्ती वस्तूमाल आणि ग्राहकोपयोगी बिगर टिकाऊ वस्तूमाल हे सर्वाधिक योगदान देणारे तीन प्रमुख घटक ठरले आहेत.
नोव्हेंबर 2025 च्या प्राथमिक अंदाजासोबतच, ऑक्टोबर 2025 साठीच्या निर्देशांकांची स्त्रोत म्हणून कार्यरत असलेल्या संस्थांकडून प्राप्त झालेल्या अद्ययावत माहितीच्या आधारे अंतिम सुधारणा करण्यात आली आहे.
डिसेंबर 2025 चा निर्देशांक बुधवार, 28 जानेवारी 2026 रोजी जाहीर केला जाणार आहे.
- हे पत्रक (इंग्रजी आणि हिंदी मध्ये ) मंत्रालयाच्या http://www.mospi.gov.in संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
- औद्योगिक उत्पादन निर्देशांकाशी संबंधित तपशीलवार माहिती https://mospi.gov.in/iip आणि https://esankhyiki.mospi.gov.in/ वर उपलब्ध आहे.
Matribhumi Samachar Marathi

