Friday, January 09 2026 | 05:17:46 AM
Breaking News

आयएनएसव्ही कौंडिण्यने आपल्या पहिल्या सागरी प्रवासाला केली सुरुवात

Connect us on:

नवी दिल्‍ली, 29 डिसेंबर 2025. भारतीय नौदलाच्या  स्वदेशी बनावटीच्या, पारंपरिक शिवणकाम केलेल्या जहाजाने ‘आयएनएसव्ही कौंडिण्य’ ने 29 डिसेंबर 2025 रोजी गुजरातच्या पोरबंदरहून ओमानमधील मस्कतच्या दिशेने आपल्या पहिल्या परदेशी सागरी प्रवासाला सुरुवात केली. ही ऐतिहासिक मोहीम भारताच्या प्राचीन सागरी वारशाला पुनरुज्जीवित करण्याच्या, तो समजून घेण्याच्या आणि एका प्रत्यक्ष सागरी प्रवासाद्वारे वारशाचा गौरव करण्याच्या प्रयत्नांमधील एक महत्त्वाचा टप्पा आहे.

पश्चिम नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, व्हाइस ॲडमिरल कृष्णा स्वामिनाथन यांनी या जहाजाला औपचारिकपणे हिरवा झेंडा दाखवला. यावेळी ओमान सल्तनतचे भारतातील राजदूत इस्सा सालेह अल शिबानी, भारतीय नौदलाचे वरिष्ठ अधिकारी आणि प्रतिष्ठित पाहुणे उपस्थित होते.

आयएनएसव्ही कौंडिण्य अनेक शतकांपूर्वी वापरल्या जाणाऱ्या नैसर्गिक सामग्री आणि पद्धतींचा वापर करून, पारंपरिक शिवणकाम तंत्रज्ञानाने बांधण्यात आली आहे. हा प्रवास त्याच प्राचीन सागरी मार्गांवरून होत आहे, जो एकेकाळी भारताच्या पश्चिम किनारपट्टीला ओमानशी जोडत होता तसेच हिंदी महासागरामध्ये व्यापार, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि सातत्यपूर्ण नागरी संबंधांना चालना देत होता.

   

हे सागरी अभियान भारत आणि ओमान यांच्यातील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यात महत्त्वपूर्ण ठरेल, कारण ते  दोन्ही देशांच्या सामायिक सागरी वारशाला अधोरेखित करण्याबरोबरच  सांस्कृतिक आणि जनतेमधील संबंध बळकट करेल. आयएनएसव्ही कौंडिण्यचे मस्कतमधील आगमन हे दोन सागरी राष्ट्रांना शतकानुशतके जोडणाऱ्या मैत्री, परस्पर विश्वास आणि आदराच्या चिरस्थायी बंधांचे एक शक्तिशाली प्रतीक ठरेल. हा प्रवास गुजरात आणि ओमान यांच्यातील सखोल ऐतिहासिक संबंधांवरही प्रकाश टाकतो, जे आजपर्यंत सुरू असलेल्या सहकार्याच्या परंपरेचे प्रतिबिंब आहे.

About Matribhumi Samachar

Check Also

आयुष निर्यात प्रोत्साहन परिषदेने नवी दिल्ली येथे साजरा केला चौथा स्थापना दिन

भारतीय पारंपरिक औषध प्रणाली आणि आरोग्यविषयक उत्पादनांच्या निर्यातीला चालना देण्यासाठी भारताच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून …